चार्ली चॅप्लीन नेहरूंमुळे घाबरला होता..

पंडीत जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान. परदेशात शिकलेले, जगाला कळावा म्हणून भारताचा इतिहास लिहिलेले आणि स्वतःचं ऐश्वर्य त्यागलेले नेहरू. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना त्यागाच्या गप्पा मारणं सोपं असतं. पण अलाहाबादच्या राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या माणसाने सगळा त्याग करून देशासाठी तुरुंगवास स्वीकारणं साधी गोष्ट नसते. नेहरू त्यातले होते. 

मुख्य म्हणजे नेहरू सुपरहिरो नव्हते. त्यांची प्रचारयंत्रणा नव्हती. ते जसे प्रेमळ होते म्हणून इतिहास सांगतो तसंच ते संतापी होते हे सुद्धा इतिहास सांगतो. 

ते पहाटेपर्यंत काम करत बसायचे असं इतिहास सांगतो तसं ते स्वतःच्या बायकोला मात्र पुरेसा वेळ देऊ शकले नाही हे सुद्धा इतिहास सांगतो. नेहरूंची सिग्रेट कोणती ते सुद्धा आपल्याला माहित असतं. नेहरू आणि लेडी माउंटबॅटन बद्दल आपण खूप ऐकून असतो. थोडक्यात नेहरू आदर्श आहेत एवढच इतिहास मांडत नाही. चीन आणि काश्मीर प्रश्नात नेहरूंच्या चुका झाल्या हे सुद्धा आपल्याला माहित असतं. 

नेहरू माणूस म्हणून आपल्यासमोर असतात. तरीही नेहरू आपल्या देशात समजून घेतले जात नाहीत. 

लेडी माउंटबॅटन वारल्या तेंव्हा त्यांच्या बिछान्यावर नेहरूंनी लिहिलेली पत्रं पसरून ठेवलेली होती अशी आठवण सांगितली जाते. सरोजिनी नायडू यांच्या मुलीला म्हणजे पद्मजाला नेहरूंनी लिहिलेली पत्रं आदर्श पत्रं मानली जातात. पण नेहरू एवढेच नसतात. आपल्याला त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल एवढी माहिती आहे म्हणून आपण एवढच म्हणू शकतो की ते सच्चे होते. माणूस होते. 

त्याकाळात मिडिया त्यांच्या ताब्यात नाही पण प्रेमात नक्की होता. ते आश्वासन देऊन हिरो झालेले नव्हते. स्वातंत्र्यलढ्यातले हिरो होते. ते सांगतील तसा त्यांचा इतिहास आपल्यापुढे आला असता. पण सुदैवाने नेहरूंनी तसं काही केलं नाही.

इंग्लंडचे नेते लॉर्ड पेथिक लॉरेन्स यांनी नेहरूंच्या भाषणशैलीविषयी लिहिलंय की, युरोपिअन किंवा अमेरिकी वक्त्याप्रमाणे ते त्यांच्या भाषणाची सुरुवात एखाद्या धाडसी किंवा जोरदार वाक्याने करत नाहीत अथवा काजीपुर्व्क तयार केलेल्या अलंकारिक वाक्यांनी भाषणाचा समारोपही करत नाहीत.’ लॉरेन्स काही नेहरुंना फार चांगला वक्ता मानत नव्हता. फक्त तो एक गोष्ट लिहितो, ‘ श्रोते त्यांच्या सच्चेपणाने व संयमाने भारावून जातात.’ ही खरंतर नेहरूंची खूप मोठी कमाईच होती.

नेहरूंची सगळ्यात महत्वाची गोष्ट फारशी बोलली जात नाही. 

नेहरूंनी १९५८ साली स्वतःहून राजीनामा द्यायची इच्छा जाहीर केली. पण कॉंग्रेसने त्यांना तसं करू दिलं नाही. नेहरू राजीनामा देऊ इच्छित होते याचं कारण होतं वय. राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त करताना त्यांचं वय होतं ६८. पण त्यावेळी फक्त कॉंग्रेस नाही तर अमेरिकेचे आयसेनहॉवर आणि रशियाचे ख्रुश्चेव यांनी नेहरुंना पत्र लिहून पद सोडू नये अशी इच्छा व्यक्त केली. शेवटी नेहरू सुट्टीवर गेले. 

विश्वास बसणार नाही पण ६८ वर्षांचे नेहरू पर्वतराजीत १३ हजार ६०० फूट चढून गेले. आपल्याकडे नेहरूंना नेहमी चाचा नेहरू म्हणायचं आणी बालदिन साजरा करायची पद्धत आहे. पण ही तरुणांनी आदर्श घ्यावी अशी गोष्ट आहे. बाकी आज फिटनेसचे व्हिडीओ एवढे चर्चेत आहेत. पण नेहरूंचा म्हातारपणातला शिर्षासनाचा फोटो बघितला की जाणवतं, नेहरू फक्त मुलांचे नाही, तरुणांचे नाही या देशाचे आदर्श आहेत. फक्त आपण त्यांचा आदर्श घ्यायचा हे ठरवलं पाहिजे. 

नेहरू फिटनेसच नव्हे तर आक्रमकपणा आणि संस्कार याबाबतीत पण आजही चॅलेंजिंग वाटतात. नेहरूंनी लिहिली तशी संस्कार आणी इतिहासाबद्दल अभिमान आणी भान असणारी पुस्तकं आपल्या एकूण साहित्यात पण फार कमी सापडतात. 

प्रचारसभेत त्यांच्यावर हल्ला झाल्यावर त्याचं भांडवल न करता थेट भिडणारे पण नेहरुच. चीनच्या युद्धात त्यांना सपशेल हार घ्यावी लागली. अपयश त्यांना कमी आलं नाही. पण त्यांनी जे आहे ते स्वीकारलं. इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला नाही. खोटी आकडेवारी दिली नाही. त्यामुळे नेहरू गुणदोष यांच्यासहित मोठे आहेत. अशा माणसाविषयी परदेशातली माणसं पण भरभरून लिहितात. आपलीच माणसं गोळा करून कौतुकसोहळा करावा लागत नाही. 

चार्ली चॅप्लीन सांगतो १९५३ ची गोष्ट. 

स्वित्झर्लंडमध्ये. नेहरुंसोबत प्रवास करत असताना चॅप्लीन एकदम घाबरून गेला होता. स्वित्झर्लंडच्या डोंगराळ भागात नेहरूंचा ड्रायव्हर त्याकाळी ताशी ७० मैल वेगाने गाडी चालवत होता. चार्ली घाबरून बसला होता. आणी नेहरू निवांत गप्पा मारत होते. चार्लीसाठी हे आश्चर्य होतं. नेहरू जगभरातल्या कलावंत, लेखक, नेते आणि विचारवंत यांच्या संपर्कात होते. नेहरुंबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी एवढ्या देशांना भेटी दिल्या पण नेहमीच भारताबद्दल कौतुकाने बोलत असायचे. नेहरुंबद्दल जगातल्या महत्वाच्या माणसांनी लिहिलेल्या गोष्टी एकत्र केल्या तर एक उत्तम ग्रंथ तयार होईल. आज अफवांच्या राज्यात नक्कीच प्रेरणा देणारा ग्रंथ असेल तो.  

2 Comments
  1. सिद्धार्थ गंगावणे says

    आपण सांगितले की नेहरू किती महान होते त्यागमूर्ती होते. पण आपण हे नाही सांगितले की नेहरू चे सिगरेट पाकीट 555 त्यावेळेस किती रुपयाला होते. त्यांचा मुक्काम कोणत्या हॉटेल मध्ये असायचा.आणि आत्ता नवीन बातमी आलीये लेडी माउंटबॅटन ह्यांच्या कन्येच्या नुसार नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांचे प्रेम संबंध होते

  2. Ranjeet Patil says

    नेहरू लोकांना जास्तीत जास्त कळाले तरच आजचा भारत तरेल. बोल भिडू च्या टिमचे खूप खूप अभिनंदन। अशीच खरी माहिती नेहरूजी, गांधीजी, इंदिराजी, राजीवजी व मनमोहनसिंगजीं बद्दल भारतीयां पर्यंत पोहोचवा।

Leave A Reply

Your email address will not be published.