चित्रपट माध्यमाच्या विकासासाठी पंडित नेहरूंनी NFAI ची स्थापना केली

भारतात चित्रपट सृष्टीचा अनोखा इतिहास आहे. अनेक दिग्गज कथा, कलाकारांची देणगी भारतीय चित्रपटश्रुष्टीने जगाला दिलीये. त्यामुळे या देणगीचं जतन करणं भारतीय चित्रपटांचा पद्धतशीरपणे संग्रह करणं आणि त्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करणं, या प्रमुख उद्देशांनी केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या आधिपत्याखाली ‘नॅशनल फिल्म अर्काईव्हज ऑफ इंडिया’ अर्थात ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ या स्वायत्त संस्थेची पुणे येथे फेब्रुवारी १९६४ मध्ये स्थापना करण्यात आली. चित्रपट माध्यमाच्या अभ्यासासाठी ही संस्था म्हणजे राष्ट्रीय आणि आशियाई स्तरावरील महत्त्वाचा स्रोत ठरली.  या संस्थेच्या स्थापनेमागचाच आजचा हा किस्सा

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना समाजप्रबोधनाच्या दृष्टीने चित्रपट माध्यम आणि या माध्यमाचा विकास महत्त्वाचा वाटत होता. त्यांच्या प्रोत्साहनातून स्वातंत्र्योत्तर काळात आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचे आयोजन दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पुरस्कार प्रदान करणं, ‘फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ची स्थापना करणं, फिल्म्स सोसायटीच्या फेडरेशनची स्थापना करणे असे अनेक उपक्रम केंद्र शासनाने प्रत्यक्षात आणले.

याच धोरणांतर्गत १९६४ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आणि  पुढे कलात्मक चित्रपटाला अर्थसाहाय्य करण्यासाठी ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ची (NFDC) स्थापना केली गेली. एकंदरीत उपरोक्त उपक्रमांप्रमाणे संग्रहालय स्थापनेमागेही देशात सुजाण चित्रपट संस्कृती निर्माण करणं, हा व्यापक हेतू होता.

पुण्याच्या बॅरिस्टर जयकर यांच्या बंगल्याच्या परिसरात या संस्थेची स्थापना केल्यावर या संस्थेने आपलं कार्य सुरू केलं. चित्रपटइतिहासाचे अध्यापक व चित्रपट संग्राहक पी. के. नायर यांच्या पुढाकाराने माध्यमाच्या उदयापासून भारतभरात निर्माण झालेल्या अनेक मूकपटांचा, लघुपटांचा, बोलपटांचा, हिंदी व विविध प्रादेशिक चित्रपटांचा माग काढणं, त्यांचा ताबा मिळवणं आणि त्यांचं जतन करण्याचं कार्य सुरू केलं गेलं. 

फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII ) परिसरात ‘फिल्म लायब्ररी’च्या रूपानं ही संस्था उभी राहिली. एफटीआयआयचे तत्कालीन संचालक जगत मुरारी आणि प्रा. सतीश बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात आणि काही मोजक्या चित्रपटांच्या संग्रहाने हे ग्रंथालय सुरू झाले.

भारतात यापूर्वी चित्रपटाची रिळं जतन करण्याची संस्कृतीच नसल्याने चित्रपट व लघुपटांच्या प्रिंट्स मिळवणं हे मोठं जिकीरीचं काम ठरलं होतं. चित्रपटांच्या प्रिंट्सप्रमाणेच चित्रपटनिर्मिती व उद्योगा-संदर्भातील दुर्मीळ साहित्य, ग्रंथ, वृत्तपत्रं, नियतकालिकं, छायाचित्रं, दस्तऐवज यांच्या संग्रहासाठी अर्काइव्हजने एक सुसज्ज असं वाचनालयही उभारलं. 

अशी सर्व व्यवस्था झाल्यानं चित्रपट-इतिहासाच्या व चित्रपट- माध्यमाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी अभ्यासू चित्रपटनिर्मात्यांसाठी, समीक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ही संस्था म्हणजे एक मोठी पर्वणीच ठरली. पुढील काळात या संस्थेने चित्रपट क्षेत्रातील संशोधनासाठी विविध उपक्रम सुरू केले. बेंगळुरू, कोलकाता व तिरुअनंतपुरम इथे आपली प्रादेशिक कार्यालय स्थापन करून संस्थेची कार्यव्याप्ती वाढवली.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था कार्यरत आहे. आज या संस्थेद्वारे अनेक चित्रपट महोत्सव, लघुपट महोत्सव, शॉर्स्ट फिल्म फेस्टिवल चालवले जातात. जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या चित्रपटांच्या प्रती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये संग्रहित करण्यात आल्या आहेत. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.