तर भारताला गोव्यावरचा आपला अधिकार कायमचा गमवावा लागला असता.

त्यांच्याजागी हे पंतप्रधान असते तर किंवा त्यांच्याजागी ते पंतप्रधान असते तर किंवा या सगळ्यांच्या जागी मीच पंतप्रधान असतो तर, अशी जर-तर ची चर्चा आजकाल आपल्या देशात जोरात चालू आहे. या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांचे स्थान हे एकमेवाद्वितीय राहिले आहे त्यामुळे अशा चर्चा निष्फळ ठरतात.

विशेषतः भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या या देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय पटलावर एक असा अमित ठसा आहे जो. गोवा मुक्ती च्या लढ्यात जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मुत्सद्दीपणाची जी झलक अंतरराष्ट्रीय स्तरावर दाखविली ते पाहणं गरजेचं आहे. 

नाटो सारख्या संघटनेला शह.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी गोवा भारताच्या स्वाधीन करावा यासाठी गोवा मुक्तीच्या लढ्याला जोर चढला होता. भारताने लष्करी कारवाई करून गोवा काबीज करावा असा दबाव सरकार वर होता आणि त्यामुळे नेहरू सरकारला लोकांच्या रोषास सामोरे जावे लागत होते. कारण वर वर जरी फक्त तीन चार हजार स्क्वेअर किमीचा छोटासा पट्टा दिसत असला तरी त्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. असे सैन्य घुसवून फार गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले असते. १९४५ नुकतेच दुसरे महायुद्ध संपले होते, जग त्यानंतर दोन ध्रुवांमध्ये विभागले होते, भारतासारख्या नवस्वातंत्र्य मिळालेल्या राष्ट्राने  दोन्ही बाजूंची युद्धाची खुमखुमी टाळून आपल्या वेगळ्या मार्गाने जाणे पसंत केले होते.

जगाची विभागणी नाटो(NATO) आणि वॉर्सा पॅक्ट च्या आधारावर झाली होती. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राष्ट्रे नाटो या संघटनेत सामील झाली होती तर सोव्हिएत रशिया च्या नेतृत्वाखालील देश वॉर्सा पॅक्ट अंतर्गत एकत्र आले होते. आणि गोव्यात सैन्य घुसवाने म्हणजे सरळ नाटो शी वैर पुकारणे, कारण पोर्तुगाल चा हुकूमशहा अँटोनियो सालाझार म्हणत असे कि गोवा हा आमचा अविभाज्य भाग आहे. आणि नाटो संघटनेच्या नियमावली प्रमाणे नाटोच्या कुठल्याही सदस्याच्या सार्वभौमत्वावर हल्ला म्हणजे नाटो वर हल्ला. अशा आक्रमक देशाविरुद्ध मग नाटो ने युद्ध पुकारलेच पाहिजे. 

पण सालाझार काहीही म्हणाला तरी गोवा हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि पोर्तुगालची गोव्यावरील सत्ता ही दंडुकेशाही च्या आधारावर टिकलेली होती हे सत्य सर्वानांच माहिती होते. पण गोवा घेण्यासाठी नुसती नैतिक हक्क उपयोगाचा नव्हता त्यासाठी अजून काहीतरी विशेष हवे होते. अखेर भारत सरकारने निर्णय घेतला आणि १८ डिसेंबर १९६१ ला भारतीय सैन्य सर्व बाजूनी गोव्यात घुसले, त्यांच्या मदतीला भूमिगत क्रांतिकारकांच्या गोवा आणि उर्वरित भारतातल्या फौजा हि होत्याच. ३६ तासाच्या आत गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल वसालो इ सिल्व्हा याने शरणागती पत्करली. १९ डिसेंबर १९६१ ला गोवा, दिव दमण स्वतंत्र झाले. लष्करी बळावर भारताने गोवा काबीज केला पण खरी लढाई तर यापुढे होती. 

खरंतर अशा वेळी भारतावर नाटो ने हल्ला करून गोवा परत पोर्तुगाल च्या हवाली करणे अपेक्षित होते पण असे झाले नाही. कारण नाटो चे नेतृत्व हे अमेरिकेकडे असते. अमेरिका म्हणेल त्याप्रमाणे नाटोचे धोरण ठरते. १९६१ ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. जॉन एफ केनेडी. डेमोक्रॅटिक पक्षाचे केनेडी हे उदारमतवादी विचारांचे होते. त्यात भारताविषयी त्यांच्या मनात एक ओलावा होता. त्यांनी नुकताच राष्ट्राध्यक्ष पदाचा भर उचलला होता. सालाझार ह्या पोर्तुगालच्या हुकूमशाहाबद्दल त्यांचे मत चांगले नव्हते. शिवाय सालाझार म्हणतो त्याप्रमाणे गोवा हा पोर्तुगाल चा अविभाज्य भाग नसून ती त्यांची एक वसाहत आहे असे अमेरिकेला वाटत होते.

नाटो मधील इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशाचेही असेच मत होते. आपण वसाहतवादाचे रक्षणकर्ते आहोत असा संदेश अमेरिकेला जाऊन द्यायचा नव्हता. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे केनेडींशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि हे संबंध केनेडी राष्ट्राध्यक्ष व्हायच्या अगोदरपासून होते. गोव्यावर हल्ल्याच्या 6 आठवडे अगोदर नोव्हेबर १९६१ मध्ये नेहरू अमेरिका दौऱ्यावर होते आणि त्यांची आणि केनेडींची दीर्घ चर्चा बऱ्याच मुद्द्यावर झाली होती. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने कदाचित लष्करी कारवाई टळली. 

मग तेव्हा का भारताने लष्करी कारवाई केली नाही ?

मग प्रश्न असा पडेल कि यातल्या कित्येक गोष्टी तर केनेडींच्या पूर्वीही अशाच होत्या. मग तेव्हा का भारताने लष्करी कारवाई केली नाही? १९६१ च्या कारवाई चा जो परिणाम झाला तसेच बोटचेपेपणाचे प्रत्युत्तर त्यापूर्वीच्या कारवाईला मिळाले असते याबाबत शंका आहेत. कारण १९४७ पासून १९६० पर्यंत अमेरिकेत हॅरी ट्रुमन आणि आयसेनहॉवर राष्ट्राध्यक्ष होते. केनेडींच्या तुलनेत हे दोघेही आक्रमक होते आणि कदाचित त्यांनी पोर्तुगाल च्या दबावाखाली भारतावर आक्रमण केलेही असते. 

पण जग तेव्हा शीत युद्धाच्या टोकावर होते, केनेडींच्या पुढे ‘बे ऑफ पिग्स’ सारखे इतर विषय होते. त्यांच्यापुढे जगाचे राजकारण होते आणि आपल्या एका नाटो सदस्याला दुखावणे त्यांना परवडणारे नव्हते. युद्धाचा पर्याय जरी त्यांनी टाळला असला तरी त्यांनी दुसरा मार्ग चोखाळला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत त्यांनी ठराव आणला कि ‘भारताने गोव्यावर आक्रमण करून बळकावलेला प्रदेश पुन्हा पोर्तुगालच्या स्वाधीन करावा आणि गोव्यातुन सैन्य माघारी घ्यावे.’ या अशा बिकट वेळी भारताचा जुना मित्र भारताच्या मदतीला आला.

सोव्हिएत रशिया ने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून हे विधेयक हणून पाडले. आणि खऱ्या अर्थाने गोवा मुक्त झाला.

कारण हा ठराव स्वीकारला गेला असता तर भारताला गोव्यावरचा आपला अधिकार सोडावा लागला असता. 

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे भारत जरी अमेरिका किंवा रशिया यांच्या कुठल्याही गटात नसला तरी तो नेहमीच रशियाकडे कललेला राहिला आहे त्याला कारण म्हणजे अर्थातच जवाहरलाल नेहरू. नेहरूंनी जरी अलिप्ततावादी चळवळ चालवली आणि तिचे नेतृत्व केले तरी त्यांच्या परराष्ट्र धोरणात सोव्हिएत रशियाला झुकते माप होते. आणि म्हणूनच अशा बऱ्याच बिकट प्रसंगी आपला व्हेटो वापरून भारताला मदत करत आलाय.

गोव्याच्या प्रश्नावर नकाराधिकार वापरण्यात रशियाचा स्वतःचा काहीच स्वार्थ नव्हता असे समजण्याचा भाबडेपणा मात्र आपण करू नये कारण नाटो च्या गटातील एका राष्ट्राला मात देण्याची तसेच अमेरिकेवर डाव उलटवण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी ती घेतली हाही मुद्दा आहे. 

आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाच वेळी दोन्ही दगडावर हात ठेऊन चालणे ही अतिशय अवघड कसरत आहे. १९६१ च्या डिसेंबर महिन्याचे टायमिंग साधून एकीकडे अमेरिका आणि एकीकडे सोव्हियेत रशिया दोघांनाही सांभाळून नेहरूंनी गोवा आपल्या पदरात पाडून घेतला. एकीकडे त्यांना त्यांच्या वैयक्तिक संबंधांचा उपयोग करता आला तर एकीकडे आपल्या राष्ट्रीय धोरणाचा. आंतरराष्ट्रीय राजकारणात कशाला मास्टरस्ट्रोक जर म्हणत असतील तर गोवा मुक्ती हे त्याचं उदाहरण आहे.

References…

  1. http://www.ibtimes.com/john-f-kennedy-india-tale-jfk-jackie-nehru-indira-chinese-nuclear-strike-goa-saris-1482736
  2. https://web.stanford.edu/group/tomzgroup/pmwiki/uploads/1074-1962-03-KS-b-RCW.pdf
  3. https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_vetoed_United_Nations_Security_Council_resolutions
  4. https://en.m.wikipedia.org/wiki/Annexation_of_Goa
  • रणजीत यादव

Leave A Reply

Your email address will not be published.