बिहारी पोरांच्या आंदोलनामुळं पंडित नेहरूंना सुद्धा दिल्लीवरून यायला भाग पाडलं होतं

भारताच्या स्वातंत्र्यात सगळ्यात महत्वाचं हत्यार म्हणजे ‘आंदोलन’… या आंदोलनाच्या माध्यमातूनच आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र मिळालं आणि आंदोलनातूनचं आपल्याला आपले स्वतंत्रसैनिक मिळाले, नेतेमंडळी मिळालीत. म्हणजे असं पाहायला सुद्धा काही हरकत नाही कि, आंदोलनामुळेचं भारतीय इतिहास घडला.
या आंदोलनाची साधी व्याख्या सांगायची झाली तर आपल्या हक्क्याच्या किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवणं. अहिंसेचं हे एक मोठं हत्यार मानलं जात. पण कधी कधी हे अहिंसेचं हत्यार हिंसेचं रूप धारण करतं. म्हणजे आत्ताची आपण बिहारची परिस्थती बघितली तर त्याच उदाहरणासकट स्पष्टीकरण सुद्धा मिळेल.
झालं काय बिहारची RRB-NTPC परीक्षेच्या निकालात गडबड झाली, आणि संतप्त विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या. आणि फक्त विद्यार्थीच नाही तर कित्येक राजकीय पक्ष सुद्धा या विद्यार्थ्यांच्या बाजून आंदोलनात उतरलेत. यात राजद, काँग्रेस, जेएपी, सीपीआय, सीपीएम, सीपीआय-एमएल आणि बिहारमधील व्हीआयपी असे ७ राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे वातावरण पेटलं. तसं हे आंदोलन कित्येक दिवसांपासून सुरु आहे. पण आधी साध्या घोषणाबाजीनेचं आंदोलन सुरु होत मात्र, जस बाकीच्यांनी यात उडी घेतली आंदोलन पेटलं.
राजद कार्यकर्त्यांनी दरभंगामध्ये बिहार संपर्क क्रांती ही रेल्वे रोखली. त्याचवेळी जेएपी कार्यकर्त्यांनी भागलपूर आणि सुपौलमध्ये गाड्या रोखल्या. पाटणा येथील डाकबंगला चौकात पप्पू यादव यांच्या पक्ष जेएपीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. त्याच वेळी, एसएफआय म्हणजे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनीही यूपी आणि बिहार पोलिसांच्या क्रूर कारवाईविरोधात नवी दिल्लीतील रेल भवनासमोर निदर्शने केली.
या आंदोलनाने इतकं हिंसक वळण घेतलं कि, सार्वजानिक ठिकाणांवर जाळपोळ करण्यात आली. हाजीपूर-मुझफ्फरपूर, हाजीपूर-छापरा, हाजीपूर-समस्तीपूरसह प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. जाममुळे वाहतूक ठप्प झाली होती. जेहानाबादमध्ये निदर्शनासाठी क्रेनच रस्त्यावर ठेवण्यात आली होती. रेल्वेचे मार्ग बदलण्यात आलेत. त्यामुळे आज सकाळीच बिहार बंदची हाक ऐकायला मिळाली.
आंदोलन भडकवल्या प्रकरणी अनेक विद्यार्थ्यांवर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आलीये. पोलिसांबरोबर मिलिट्ररी सुद्धा तैनात करण्यात आलीये. रेल्वेमंत्र्यांना तातडीने येऊन निवेदन द्यावे लागलं आणि समिती स्थापन करावी लागली. सोशल मीडियावर सुद्धा या आंदोलनाचे पडसाद उमटायला लागलेत. एवढंच नाही तर या आंदोलनाची जेपी आंदोलनाशी तुलना केली जातेय.
आता जेपी आंदोलन तेच त्यामुळे इंदिरा गांधींना आणीबाणी लावावी लागली. या आंदोलनाची सुरुवात बिहार मधुनचं झालेली. पण या बिहारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणखी एक किस्सा नेहमीच चर्चेत असतो. ज्यामुळे दिल्लीची सत्ता सुद्धा हादरलेली आणि खुद्द देशाच्या पंतप्रधानांना बिहारमध्ये यायला लागलं होत.
ते साल होत १९५५ चं. देशाला स्वतंत्र मिळून ७-८ वर्षच झालेली. पंडित जवाहलाल नेहरू पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळत होते. पण याच दरम्यान स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये पहिले विद्यार्थी आंदोलन झाले. या विद्यार्थी आंदोलनाचं कारण फार छोटं होत. म्हणजे राज्य ट्रान्सपोर्ट तिकीट कापण्यावरून विद्यार्थी भडकले होते. त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं.
सुरुवातीला आंदोलन शांतपणेच सुरु होत, पण हळू-हळू याला हिंसेचा रूप मिळालं. आंदोलन इतकं चिघळलं कि, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दीनानाथ पांडे असं या विद्यार्थ्यांचं नाव. खरं तर दीनानाथ रस्त्याच्या कडेला उभा असलेला गोंधळ पाहत होता. जिथे पोलिसांनी गोळी झाडली आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर आंदोलन पेटलं कि, ना पोलिसांना ते कंट्रोल करता आलं ना राज्य सरकारला.
शेवटी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाचं पाटण्याला यावं लागलं. पण तरीसुद्धा आंदोलक विद्यार्थी सहमत झाले नाहीत. नेहरूंना गोळीबाराच्या चौकशीसाठी दास आयोगाची स्थापना करावी लागली, या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री श्री कृष्ण सिंह यांची नापसंती होती. कारण श्रीबाबूंच्या जवळचे मंत्री महेश प्रसाद सिंह यांची गोळीबारात महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात.
यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री महेश सिंह यांना राजीनामा द्यावा लागला होता. महामाया प्रसाद यांनी पुढची निवडणूक महेशच्या विरोधात लढवली आणि मुझफ्फरपूरमधून हा मुद्दा बनवून निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी ‘खादी के चकमक चुनर से, दाग खून का नहीं धुलेगा…’ असा नारा दिला होता. त्यानंतर विद्यार्थी राजकारणाची धामधूम वाढली.
हे ही वाच भिडू :
- कित्येक वर्षांपासून युपी, बिहार गरीबच का राहिले आहेत ?
- ज्यांना शिकवतात त्यांनाच हिंसेसाठी प्रवृत्त करताय म्हणून खान सरांवर गुन्हा दाखल झालाय
- इंदिरा गांधींनी विद्यार्थी आंदोलन काबूत आणण्यासाठी यशवंतरावांना दिल्लीत बोलवून घेतलं.