ॲग्रो टुरिझम मधून तावरेंनी ५० कोटींची उलाढाल केली तर ६०० शेतकऱ्यांचा फायदा करून दिला

महाराष्ट्र हे शेतीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य. जिथली जमीन आणि हवामान शेतीसाठी एकदम उत्तम मानलं जात.

पण गेल्या काही वर्षांपासून शेतीला पाहिजे तो न मिळणारा हमीभाव, ओला आणि सुक्या दुष्काळामुळं पिकांची होणारी नासाडी, त्यामुळं डोक्यावर झालेलं कर्ज अशा कित्येक कारणांमुळे बरीचशी मंडळी शेती सोडून दुसऱ्या कामा-धंद्याकडे वळतायेत.

पण आपल्याचं शेतातून, आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करून, आपलं उत्पन्न आपल्याला पाहिजे त्या भावात विकून एका सक्सेसफुल शेतकऱ्याचं उदाहरण मांडलंय बारामतीच्या पांडुरंग तावरे यांनी.

ज्यांनी आपल्या शेतीला पर्यटनाची उत्तम जोड दिली, पण यासोबत गावातील बाकी शेतकऱ्यांना सुद्धा शेतीबरोबर उत्पन्नच आणखी एक मोठं साधन उपलब्ध करून दिलंय.

बारामतीतल्या सांगवी गावातील पांडुरंग तावरे ज्यांच्या पिढ्यानपिढ्या शेती करत आल्यात. पण पांडुरंग तावरे कॉम्प्युटर सायन्सच्या अभ्यासक्रमासाठी बाहेरगावी गेले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर जवळपास २० वर्ष पर्यटन क्षेत्रात काम केलं.

पण कितीही केलं तर एकत्र शेतकरी कुटुंबात राहणारा माणूस बाहेरच्या हायफाय नोकरीत मन काही लागेना, त्यात वडिलांच्या इच्छेनुसार कृषी क्षेत्रात डिग्री घेतली नाही म्हणून मन खात होत. त्यामुळं परत आपल्या गावी येऊन  राहण्याचा निर्णय घेतला.

आता परत तर आलो,  शेती करायचीचं होती पण आपल्या पर्यटन क्षेत्रातला अनुभव सुद्धा कामी आला पाहिजे असं कुठेतरी पांडुरंग यांना वाटत होतं. अशात पांडुरंग यांना युरोपातल्या ॲग्रीटुरिझम या कन्सेप्टविषयी कळालं. आता भारतात असं काही याआधी तर नव्हतं, पण तशी पुरेपूर क्षमता मात्र आहे हे पांडुरंग यांना चांगलंच ठेवून होत.

त्यामुळे त्यांनी भारतात ही ॲग्रीटुरिझम कन्सेप्ट आणायची तयारी सुरु केली. 

२००२ मध्ये ते आपल्या गावी परतले. पण आपली ॲग्रीटुरिझम कन्सेप्ट लाँच करण्यापूर्वी पांडुरंग यांनी २००३ मध्ये मार्केट सॅम्पल सर्व्हे केला आणि सगळा डेटा गोळा करून आपली कन्सेप्ट तयार केली आणि फायनली ती ग्राउंड लेव्हलवर उतरवली. यासाठी पांडुरंग यांनी आपल्या गावातल्या शेतकऱ्यांशी सुद्धा चर्चा केली, पण त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट पूर्णपणे वगेळी होती.  

पांडुरंग यांनी अगदी बेसिकपासून सुरुवात केली, म्हणजे शेतीला भेट दिलेल्या लोकांसाठी कुठल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे, त्यांना उत्तम अनुभव देता यावा यासाठी काय करता येईल, त्यांच्या खाण्या-पिण्यापासून राहण्यापर्यंत, त्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसपर्यंत सगळ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या. 

महत्वाचं म्हणजे पांडुरंग यांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमामागची कन्सेप्ट फक्त शहरी लोकांना मेजवानी देणं एवढंच नव्हतं तर त्यांना शेतकऱ्यांच्या जीवनाचा अनुभव द्यायचा होता आणि त्यासोबत शेतीतला माल डायरेक्ट विक्रीसाठी उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा भर पाडायची होती.

पांडुरंग यांनी आपल्या नोकरीच्या बचतीतून जे ६ लाख रुपये जमा केले होते ते सगळे या कन्सेप्टवर लावले. टुरिझमचा सगळा सेटअप उभा केला, त्याच्या जाहिरातीवर मोठा खर्च केला. पण जवळपास महिनाभर त्यांना साधा कुठला कॉल सुद्धा आला नाही. काही महिनेसुद्धा यातचं गेले. यामुळे टेन्शन येणं साहजिकच होत कारण यात  पांडुरंग यांचे फक्त पैसे नव्हते, तर बाकी शेतकऱ्यांची सुद्धा मेहनत होती.

पण काही महिन्यानंतर ऑक्टोबर २००५ मध्ये पांडुरंग यांना पहिला ग्राहक आला. आता इतकी वाट बघतल्यावर पहिल्या ग्राहकांचा आनंद काय होता हे काही वेगळं सांगायला नको. त्यांनतर हळू हळू पर्यटकांची रेलचेल सुरु झाली. बाहेर आपोआप पब्लिसिटी व्हायला लागली.

त्यांनतर २००६ मध्ये जानेवारी महिन्यात पुण्यातल्या ४००० महिलांच्या ग्रुपनं शेतीला भेट दिली. 

या टूरमुळे मोठा फायदा झाला आणि पांडुरंग यांच्यासोबत सगळ्यांच शेकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. त्यांनतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पुढच्या वर्षभरात तर जवळपास १३,००० पर्यटकांनी भेट दिली.

पांडुरंग यांची कन्सेप्ट एकदम सोपी आहे. शेतात या, शेतकऱ्यांप्रमाणं रहा, पारंपरिक कपडे घाला, शेतीतल्या कामांचा अनुभव घ्या, बैलगाडीतुन फिरा, ट्रॅक्टर चालवा, पतंग उडवा, अस्सल  गावरान जेवण खा, इथली संस्कृती समजून घ्या, लोकगीते आणि नृत्याचा आनंद घ्या, शेतातला ताजा माल खरेदी करा. 

पर्यटकांना हा अनुभव घेण्यासाठी एका दिवसाला प्रत्येक व्यक्तीला १००० रुपये आणि रात्री राहायची योजना असेल तर १५०० रुपये लागतात. पांडुरंग यांच्या ॲग्रीटुरिझम या कन्सेप्टचा फायदा असा झाला कि, तिथल्या शेकऱ्यांना आपल्या पिकांच्या बदल्यात पाहिजे तो भाव मिळाला आणि यामुळे त्यांच्या उत्पनात ५ पटीने वाढ झाली.

या कामातून ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय.  

नुकताच आलेल्या शार्क इंडिया शोमध्ये सुद्धा पांडुरंग तावरे यांनी आपल्या ॲग्रीटुरिझम बद्दल माहिती दिली होती. तिथल्या शार्क्सनी त्यांच्या या कन्सेप्टच भरभरून कौतुक सुद्धा केलं. आणि यांनतर  ॲग्रीटुरिझम जास्तचं चर्चेत आला. आज पांडुरंग यांना देशभरात ‘फादर ऑफ ॲग्रीटुरिझम’ या नावानं ओळखलं जात. 

सध्या ॲग्रीटुरिझमला महाराष्ट्र आणि देशभरातूनच नाही तर परदेशातून सुद्धा पर्यटक भेट देतायत. यातून गेल्या वर्षी जवळपास ५० कोटी रुपयांचं प्रॉफिट कमवलंय.

कृषी क्षेत्रात आपल्या या अनोख्या कामासाठी  पांडुरंग यांना कित्येक  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेत. पांडुरंग यांना आपला हा व्यवसाय अख्ख्या देशात पसरवायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पनाचा दुसरा पर्याय उपलब्ध होईल. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.