पांडुरंग हजारेंनी नरसिंहरावांना पाडलंच असतं..

नागपूर जिल्ह्यातील रामटेक.  या गावाची पुरातन काळापासूनची ओळख म्हणजे सीतामातेच्या शोधासाठी निघालेले प्रभू रामचंद्र याच ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते. महाकवी कालिदास देखील याच भागात आपली काव्य रचना करायचे असं देखील म्हणतात.

पण सध्याच्या राजकारणाच्या युगात रामटेक म्हटलं की एकच गोष्ट आठवते. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचा मतदारसंघ.

खरं तर नरसिंह राव मूळचे आंध्र प्रदेशचे. हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या काळापासून त्यांच आणि महाराष्ट्राचं जिव्हाळ्याचं नातं राहील आहे. नरसिंह राव यांचं महाविद्यालयीन शिक्षण देखील पुण्यात फर्ग्युसन कॉलेज आणि एलएलबी नागपूर विद्यापीठातून झाली. स्वतः बहुभाषा कोविद असलेले पी.व्ही.नरसिंह राव हे मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या रावांना त्यांच्याच राज्यातून मोठा विरोध होता.  त्यामुळे बराच काळ ते दिल्लीतच राजकारण सांभाळत होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे ते मंत्री होते. त्यांची ओळख काँग्रेसचे चाणक्य अशी बनली. इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे खास विश्वासू नेते होते त्यात नरसिंह राव यांचं होतं.

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि भारताच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं.

अनपेक्षित धक्क्यामुळे अननुभवी राजीव गांधी  सत्तेत आले. जेव्हा तिकीट वाटप चाललं होतं.  नरसिंह राव यांना त्यांच्या नेहमीच्या हनमकोंडा मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता होती. पण राजीव गांधींना नरसिंह राव लोकसभेत आणि आपल्या मंत्रिमंडळात हवे होते. त्यांना आंध्र प्रदेशच्या ऐवजी वेगळीकडे उमेदवारी द्यायचं ठरलं. यावेळी मतदारसंघ ठरला रामटेक.

रामटेक काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ होता. निवडून येण्याची खात्री असल्यामुळे नरसिंह राव यांनी तिथून अर्ज भरला. त्यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसने  शंकरराव गेडाम यांना तिकीट दिलं. पण पी. व्ही. नरसिंहराव हे १ लाख ८५ हजार ९७२ अशा विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले. राजीव गांधी यांनी नरसिंह राव यांना संरक्षण मंत्री बनवलं. त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या अनुभवाच्या जोरावर रावांनी चांगली कामगिरी बजावली.

पुढे १९८९ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या. बोफोर्स घोटाळा, शाहबानो प्रकरण, रामजन्मभूमी आंदोलन या गोष्टी काँग्रेसच्या विरोधात जाऊ लागल्या होत्या.  

नरसिंह राव यांना पुन्हा रामटेकमधून उभं करण्यात आलं. मागच्या वेळी प्रमाणे यंदा देखील सहज निवडून येऊ असं रावांना वाटत होतं. त्यांच्या विरोधात जनता दलाने तिकीट दिलं रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांना.

रामटेकच्या गांधी चौकात १९५२ ते ८६ पर्यंत हजारे यांचे हॉटेल होते. ते हॉटेलवाले हजारे म्हणूनच परिचित होते. विदर्भवादी बापूजी अणेंच्या मार्गदर्शनात १९५७ साली हजारे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते देखील वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते. त्यामुळे जांबुवंतराव धोटे यांच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात ते सक्रियतेने सहभागी होते.

१९६७ साली त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार गुंडेराव महाजन यांच्याविरोधात पहिली निवडणूक नाग विदर्भ समितीकडून लढविली, परंतु ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. पुढे अनेक वर्ष निवडणूक जिंकेपर्यंत लढत राहिले. जनता दलाच्या तिकिटावर त्यांनी १९८४ आणि १९८९ साली विधानसभा निवडणूक जिंकली. एकवेळा त्यांना विधान परिषदेमध्येदेखील भाजपाकडून पाठविण्यात आले.

१९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या आदेशानुसार त्यांनी थेट काँग्रेसचे चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या पी.व्ही.नरसिंह राव यांच्याशी टक्कर घेण्याचं धाडस दाखवलं.

पांडुरंग हजारे हे राजकारणात मोठं नाव नव्हतं पण स्थानिक पातळीवर रामटेकच्या विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी  केलं होतं. याचा त्यांना फायदा झाला.

आपल्या घरोघरी जाऊन केलेल्या प्रचारामुळे हजारे यांनी नरसिंहराव यांना या निवडणुकीत घाम फोडला. रामटेक मधून तेव्हा ५ लाख ८९ हजार ९७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी नरसिंहराव यांना २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली होती. तर पांडुरंग हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० मते मिळाली . नरसिंहराव यांचा ३४ हजार ४७० मतांनी निसटता विजय झाला होता.

तिसऱ्या क्रमांकावर खोरिपचे पृथ्वीराज बोरकर होते, त्यांना २१ हजार १४० मते मिळाली होती. बसपाचे मा.मु.देशमुख यांनी १५ हजार ८५१ मते मिळवीत काँग्रेसच्या मताधिक्क्याला येथे ब्रेक लावला होता, हे विशेष.

रामटेक मध्ये नरसिंह राव यांचं घटलेलं मतदान राजीव गांधी यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली. वयोमान झालेल्या नरसिंह राव यांना राजकीय अडगळीत टाकण्यात आलं. १९९१ साली आलेल्या निवडणुकीत तर त्यांना रामटेकमधून तिकीट देखील दिल गेलं नाही. हे सगळं झालं पांडुरंग हजारे यांच्यामुळे.

पण दैव म्हणावे कि योगायोग राजकीय संन्यास घेतलेले नरसिंह राव पुढच्या दोनच महिन्यात देशाचे पंतप्रधान बनले. मात्र यावेळी त्यांनी रामटेकच्या ऐवजी आंध्र प्रदेश मधून लोकसभा लढवली आणि तब्बल ५ लाख मतांनी निवडून आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.