पानिपत : हा ऐतिहासिक दुष्काळ संपला पाहिजे.

लहानपणी आपली पिढी राउ, श्रीमान योगी, पानिपत, सुभद्रा कुमारी चौहाण यांची मेरी झांसी कविता आदि वाचत असे. आजकालची पिढी वाचायचे कष्ट घेत नाही. ते बाजीराव- मस्तानी, फत्ते-शिकस्त, पानिपत, मणिकर्णिका, तानाजी असे चित्रपट बघते. नवीन पिढीपर्यन्त इतिहास पोहचण्याचे माध्यम बदलत आहे.

अपेक्षा आहे त्यानिमित्ताने इतिहास वाचला जावा, समजून घेतला जावा. इतिहासाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहण्याची ‘नजर’ लाभावी. इतक जरी झालं तरी पुरेसे.

‘पानिपत’ हे नाव तमाम मराठी घराघरात आहे. वेगवेगळ्या कारणासाठी ते आठवले जाते. वापरले जाते. मग पार पहिल्या पानिपत युद्धापासून इतिहास सांगितला जातो. आपल्याला तिसरं पानिपत युद्ध(14 जानेवारी 1761) आपल वाटत. तो आपला स्वतःचा पराभव वाटतो.

“दोन मोती गळाले, दहा-वीस अश्रफी गेल्या, खुर्दा-रुपयांची तर गणतीच नाही…”

पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याच्या झालेल्या हानीचं हे वर्णन अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे. त्याबद्दल वाईट वाटत असतांनाच किंबहुना त्याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेल्या हिंदवी स्वराज्याचे रोपटे इतके मोठे झाले होते की, उत्तरेतील राजकारण व लढाया यामध्ये मराठा साम्राज्याची भूमिका निर्णायक ठरण्याचा तो काळ होता हे समजल्यावर अभिमान वाटावा अशी परिस्थिति होती.

पहिला बाजीराव (बाजीराव-मस्तानी)(1720-1740) याने मराठा संघव्यवस्था(Maratha Confederacy) निर्माण केली असे म्हटली जाते.  त्यामुळे नंतरच्या काळात देशाच्या विविध भागात मराठा घराणी उदयास आली. जसे इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड. पहिल्या बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब(1740-1761) याने पेशवापद सांभाळले.

नाना साहेबाच्या काळातच पानिपत युद्ध झाले. पण त्याही आधी एक महत्वाचे म्हणजे नानासाहेबांच्या काळातच मराठी सत्ता शिखरावर पोहचली होती.

सिन्द्खेड व उदगीरच्या लढाईत निजामाला हरवले होते. माळवा, बुंदेलखंड यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 1752 ला एक महत्वाचा करार झाला होता. तो करार तेव्हाचा मुघल बादशाह अहमदशाह (1748-54) व पेशवा यांच्यामध्ये झाला होता

ज्यानुसार मराठे मुघल सत्तेचे संरक्षण करतील व त्याबदल्यात त्यांना वायव्यकडील प्रांताची चौथाई व आग्रा व अजमेरचा पूर्ण महसूल दिला जाणार होता.

ही तीच मुघल सत्ता होती जीने आलमगिर औरंगजेबाच्याच्या काळात छत्रपतींना आगर्‍याला बंदी बनवले होते. 1752 मध्ये याच मुघल शासकाची पुढची पिढी संरक्षणासाठी मराठ्यांकडे याचना करत होती. काळाने उगवलेला हा सूड होता असेही म्हणता येईल.

1752 चा हा करार उत्तरेतील सत्ताकरणात मराठ्यांचा सर्वोच्च बिन्दु असला तरी चौथाई व सरदेशमुखी च्या सोबत संरक्षण पुरवणे अर्थात किंग मेकरच्या भूमिकेऐवजी inclusive स्वरूपाचे राजकारण जर करता आले असते तर कदाचित… असो पण इतिहासात जर-तरला अर्थ नसतो.

पुढे दुखावला गेलेल्या नजीबखानने अहमदशाह अब्दाली ला भारतात बोलविले व पुढील पानिपतचा इतिहास घडला.

नुकत्याच आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपतमध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुन कपूर ला सदाशिवरावाच्या रोल मध्ये पाहून आधीच अनेक नेटकर्‍यांनी ट्रोल केलेले होते. संजय दत्त ला सूट होणारा रोल त्याला मिळाल्यामुळे तो अहमदशाह अब्दाली अक्षरशः जगला आहे.

इंटरव्हल नंतर मांडण्यात आलेली युद्धभूमी व एकूणच दृश्य हा दिग्दर्शनाच्या पातळीवर किती व्यापक व कष्टदायक प्रकार असू शकतो ते कळत.  गोवारीकरांनी हे शिवधनुष्य चांगलच पेलल आहे. या महायुद्धाचा इफेक्ट येण्यासाठी तो मोठ्या पडद्यावरच पाहायला हवा. टीव्ही किंवा मोबाइलला युद्धदृश्यांची ग्रॅविटि येणार नाही.

चित्रपटात सैन्याची हालचाल व एकूणच भौगोलिक पार्श्वभूमी दाखवण्यासाठी  आवश्यक तिथे मॅपचा  वापर केल्यामुळे ते अधिक इफेक्टिव वाटत व प्रेक्षकांना सर्व समजून घेण सोप जात.

मुळात आपल्याकडे फॅक्ट व हिस्टोरीकल रेफरन्सचा वापर करून वास्तवाजवळ जाणारे चित्रपट जे एंटरटेन वाटणार नाहीत असे का बनत नसतील देव जाणे? अलीकडच्या काळातले कॅरेक्टर, सर्व पुरावे, कागदपत्र व अनेक नोंदी उपलब्ध असतांना देखील आपल्याला दर्जेदार गांधी चित्रपट पहाण्यासाठी रिचर्ड अ‍ॅटनबरोचा गांधी पहावा लागतो…

हा दुष्काळ संपला पाहिजे.

बाजीराव-मस्तानी, मणिकर्णिका, जोधा-अकबर, पानीपत सारख्या चित्रपटातील मेन कॅरेक्टर एकदम अंगात आल्यासारखी नाचयाला लागतात. अनेक लव्ह सीन मॉडर्न लव्ह स्टोरीज ला फिके पाडतील असे टाकले जातात. तेव्हा कथेच्या मूळ आत्म्यापासून लांब गेल्याचे प्रकर्षाने जाणवत राहते.

हा प्रकार कदाचित सिनेमा पाहायला येणार्‍या सामान्य रसिकांच्या मनोरंजांनासाठी बनवलेला असू शकतो किंवा कदाचित बॉक्स ऑफिस रिकामे असू नये अशीही भूमिका त्यामागे असू शकते. पण हा प्रकार म्हणजे म्हणजे राजकीय पक्षांनी निवडणुका जिंकण्यासाठी केलेल्या लोकप्रिय व सवंग घोषनेसारखा वाटतो किंवा त्यांनी केलेल्या लोकानूनयासारखा वाटतो.

सो बी स्पेसिक व स्टिक अप टू स्टोरी अँड कॅरेक्टर असा सिनेमा बनेल तो खरा इंडियन हिस्टोरीकल सिनेमा असेल.

तोपर्यंत लेकरा-बाळांना सोबत घेऊन त्यांना  समजेल अशा गोवारीकर काका व संजय भन्साळी काका यांनी बनवलेल्या  चित्रपटांवरच समाधान मानू या. निदान इतिहास न वाचनार्‍यांना अस काही तरी घड्लय हे तरी कळेल इतकीच माफक अपेक्षा. 

  • समाधान महाजन

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.