घोळ घालणाऱ्या गणपतरावांना पानिपतमध्ये मराठ्याचं स्मारक उभारण्याचं श्रेय द्यायलाच हवं

गणपतराव तपासे यांच नाव ऐकलं तर नक्की कोणता प्रसंग लक्षात येतो. सहसा आपल्या लक्षात काहीच आलं नाही तरी इतिहासात त्यांची एक वेगळी ओळख आहे. घोळ घालणारे राज्यपाल ते मुख्यमंत्र्यांची मुस्काड खावी लागलेले राज्यपाल अशी त्यांची ओळख.

गणपतराव तपासे कोण होते, ते कसे होते याच्या खोलात जाण्यापूर्वी आपण त्यांना मुख्यमंत्र्यांची मुस्काड का खावी लागली होती आणि नेमका घोळ काय घातलेला हे प्रकरण पाहूया.

तर ते सालं होतं 1982. हरियाणामध्ये 90 जागेसाठी विधानसभा निवडणुक झाली होती. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस पक्षाला 35 जागा, लोकदल पक्षाला 31 आणि लोकदलासोबत युती केलेल्या भाजप पक्षाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती होती. सगळा निर्णय राज्यपालांच्या हाती होता.

त्यावेळी हरियाणाचे राज्यपाल होते महाराष्ट्राचे जेष्ठ कॉंग्रेस नेते गणपतराव तपासे.

हरियाणा कोण बहुमत सिद्ध करणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं. राज्यात आमदार फोडाफोडीचं सत्र सुरू झालं. दोन्ही पक्षांनी आपले आमदार नजरकैदेत ठेवले होते.

लोकदलाचे नेते होते देवीलाल. ते हरयाणाचे मुख्यमंत्री राहिलेले. त्यामुळे राज्यात त्याचं वजन होतं. राजकारणातला त्यांचा अनुभव दांडगा होता.

तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते होते भजनलाल बिश्नोई. राजकारणात त्याचंही वजन होतं. फोडाफोडीच्या राजकाणात ते पटाईत होते. 1979 साली मुख्यमंत्री असलेल्या देवीलाल यांचे 40 आमदार फोडून ते स्वत: मुख्यमंत्री बनले होते.

त्यामुळे ही लढाई अटीतटीची बनली होती.

देवीलाल आणि भजनलाल यांनी दोघांनीही राज्यपालाची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आपल्याकडं बहुमताचा आकडा असून सिद्ध करण्यासाठी बोलवण्यात य़ावं, अशी शिफारश राज्यपालांना केली.

राज्यपाल आता काय निर्णय घेतात आणि कोणाला सत्ता स्थापनेसाठी बोलवताय हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं.

मात्र राज्यपालांनी भजनलाल यांना बोलवलं. लगेच भजनलाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याचवेळी त्याच्यासोबतच्या काही आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

ही बातमी देवीलाल यांना समजताच त्यांचा पारा चढला. त्यांनी आपल्यासोबतच्या सगळ्या आमदारांना सोबत घेतलं. अन् राजभवनावर पोहचले. त्याच्यासोबत आलेले आमदारही रागात होते. आल्याबरोबर त्यांनी राज्यपालांना सगळे आमदार मोजून दाखवले आणि आपल्याकडं बहुमताचा आकडा असल्याचं सिद्ध केलं.

देवीलालनी राज्यपालांना भजनलाल यांचं स्थापन केलेलं सरकार ताबडतोब बरखास्त करून टाका असं सुनावलं.

मात्र, राज्यपाल तपासे यांनी देवीलाल यांचं ऐकलं नाही.

देवीलाल आणि राज्यपाल यांच्यात बाचाबाची आणखीनच वाढत गेली. आमदारांचाही राग अनावर झाला. एकएकाला गोळ्या घालू, हे हरियाणा आहे, तुम्हाला माहित नाही, अशी भाषा आमदार बोलायला लागले. राजभवनात नुस्ता गदारोळ माजला होता, आरडाओरड सुरू होती. सगळे राज्यपालावर तुटून पडले होते.

मात्र, केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. तसंच राज्यपाल गणपतराव तपासे अगोदर काँग्रेसचे पक्षाचे नेते होते. त्यामुळे केंद्र सरकार आणि भजनलाल यांच्यामध्ये राज्यपाल बळीचा बकरा बनले होते.

त्यामुळे राज्यपाल देवीलाल यांचं ऐकून घेत नव्हते, मात्र त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द देखील नव्हते. देवीलाल यांचा पारा आणखी चढला. त्यांनी राज्यपालाची यांची काॅलर पकडली आणि ओरडून म्हणाले,

तुम्ही इंदिरा गांधीचे चमचे आहात, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही या देशाच्या लोकशाहीचं काय केलं आहे ते!

तेवढ्यात राज्यपालांनी काॅलवरचा देवीलाल यांचा हात झटकला, हात झटकताच देवीलाल यांनी राज्यपालांच्या जोरदार कानफडात वाजवली. अन् ते तिथून रागारागात निघून गेले.

हे प्रकरण झालं मुस्काड मारण्याचं, पण याच व्यक्तिने हरियाणाचे राज्यपाल असताना एक भारी काम केलं, आपण त्या कामासाठी त्यांना ओळखत नाही. ते काम म्हणजे जिथे मराठ्यांचा पराभव झाला, जिथे मराठे लढले त्या पानिपत येथे मराठ्यांच स्मारक उभा करण्याचं काम. 

दिल्लीला गेलेला माणूस पानिपत येथे असणाऱ्या कालाआम ठिकाणी जायचा. गवतातून मार्ग काढून तो या ठिकाणी पोहचायचा आणि तिथली माती कपाळावर लावायचा. कालाआम कडे जाणाऱ्या लोकांच प्रमाण कमी असल्याने ही जागा तशी दूर्लक्षीतच होती. जेव्हा एखादा जिज्ञासू व्यक्ती महाराष्ट्रातून या ठिकाणी पोहचायचा तेव्हा इथे आल्यानंतर त्याला वाईट वाटायचं. कारण इथे वेगळं अस काहीचं नव्हतं.

मराठ्यांच्या शौर्याने रक्तरंजीत झालेल्या भूमीवर एक दगड देखील बसवण्यात आलेला नव्हता.

अशा वेळी कोल्हापूरचे तत्कालीन खासदार उदयसिंग गायकवाड कालाआमला भेट देण्यासाठी गेले होते. आपल्या आयुष्यात त्यांनी प्रथमच पानिपतची ती युद्धभूमी पाहिली. तिची अवस्था पाहिली आणि ते थेट हरियाणाचे राज्यपाल गणपतराव तपासे यांना भेटण्यासाठी गेले.

राज्यपाल, मुख्यमंत्री भजनलाल आणि उदयसिंग गायकवाड यांच्या भेटीत कालाआमच्या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभारण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी जो खर्च येईल त्यातील ठराविक वाटा महाराष्ट्र सरकार देईल अशी खात्री उदयसिंग गायकवाडांनी मुख्यमंत्री भजनलाल यांना दिली.

लागलीच राज्यपालांनी इंजिनियर्स बोलावून घेतले व याठिकाणी स्मारक उभारण्याचे नियोजन बनवण्यास सांगण्यात आले. काही काळातच भजनलाल, राज्यपाल गणपतराव तपासे आणि उदयसिंग गायकवाड यांच्या पुढाकारातून इथे स्मारक उभारलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.