यांच्यामुळे विदर्भातला मराठा समाज दाखल्यावर कुणबी लिहू लागला आणि त्यांना आरक्षण मिळालं
स्वातंत्र्याच्या वेळची गोष्ट. देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरु होतं. संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमांवर खडाजंगी चर्चा सुरु होती. देशाचं भविष्य लिहिलं जात होतं. या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले असनेक सदस्य होते. पण घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
त्या वेळचा एक किस्सा सांगितला जातो. कि एकदा एका सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी संविधान सभेमधले विदर्भाचे प्रतिनिधी डॉ.पंजाबराव देशमुख अचानक प्रगटले.
पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या कृषी व शिक्षण क्रांतीचे जनक. दलितांसाठी मंदिर खुले करण्याच्या आंदोलनावेळेपासून त्यांच्यात व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती. दोघांना एकमेकांच्या आदर व विश्वास होता. पंजाबराव देशमुखांच्या आंतरजातीय विवाहावर टीका झाली होती तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
पण त्या दिवशी बाबासाहेबांना जाणवलं की सकाळ सकाळी भेटायला आलेले पंजाबराव थोडेसे अस्वस्थ वाटत आहेत.
पंजाबरावांना चिंता लागली होती संविधानामधल्या आरक्षणाची. बाबासाहेब आपल्या घटनेमध्ये दलितांना आरक्षण देणार हि तर दगडावरची काळी रेघ होती. पण दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या इतर अनेक मागास जातींचा अभ्यास घटनेने करावा आणि त्यांच्यासाठीही घटनेत काही सवलती असाव्यात अशी पंजाबरावांची इच्छा होती. या विषयावरच बोलण्यासाठी ते बाबासाहेबांच्या घरी आले होते.
आंबेडकरांपुढे त्यांनी हा विषय काढला तेव्हा बाबासाहेब म्हणाले,
मला तुमची कळकळ जाणवते. मात्र अशा जातींची संख्या प्रचंड असल्याने अल्पावधीत त्यांची मोजणी आणि अभ्यास करणे शक्य नाही त्यामुळे विचारपूर्वक घटनेमध्ये ३४० कलम आधीच जोडण्यात आले आहे.
पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेबांच्या शब्दांमुळे दिलासा मिळाला. घटनेच्या ३४० या कलमानुसार असा आदेश दिला गेला कि स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या आदेशाने एक कमिशन नेमावे आणि या कमिशनने देशभर आरक्षणास पात्र अशा सर्व जातींची माहिती काढून सरकारला द्यावी .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीच्या अखेरच्या भाषणात ज्या मान्यवरांची घटनेच्या निर्मितीमध्ये मदत झाली त्या सर्वांचा नावानिशी उल्लेख करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, यात डॉ.पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख होता.
पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा डॉ.पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषिमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी आपले सुरु केलेले प्रयत्न आणखी तीव्र केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार १९५३ साली कालेलकर आयोग आणि त्यानंतर १९७९ ला मंडल आयोग गठीत केला गेला. दुर्दैवाने पंजाबरावाना अपेक्षित असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नव्हते. मराठा समाज बहुसंख्येने शेती करत असल्यामुळे तो मुळात कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदोपत्री कुणबी जात लावावी यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केला.
त्याकाळात पंजाबराव देशमुख केंद्रात मंत्री होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावे म्हणून मुंबईच्या मराठा मंदिर येथे मिटिंग बोलावली. त्यावेळी मराठा समाजातील दिग्गज नेते व अनेक मान्यवर उपस्थित होते. पण यापैकी विशेषतः मराठवाडा व प.महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कस म्हणवून घ्यायच हा मुद्दा उपस्थित केला.
मात्र पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वाने मात्र त्यांचं ऐकलं. तिथल्या कागदपत्रांवर कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली. याचाच परिणाम पुढे जेव्हा ओबीसींसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाज याचा लाभ घेऊ शकला.
गरीब मराठा कुटूंबातील मुले शिक्षण व रोजगारापासून वंचित राहू नयेत यासाठी पंजाबराव देशमुखांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले. विदर्भाने त्याकाळी प्रागतिक विचार दाखवले म्हणूनच आज त्यांना आरक्षणाची लढाई लढावी लागत नाही. याचे श्रेय जाते भाऊराव उर्फ पंजाबराव देशमुखांना.
हे ही वाच भिडू.
- पंजाबरावांच्या एका निर्णयामुळे वऱ्हाडातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचू शकल्या.
- काठ्यांचा वर्षाव झाला तरीही ते मागे हटले नाहीत. पर्वतीचे मंदिर दलितांना खुलं केलंच..
- मराठा आरक्षणाचं नेतृत्व नेमकं कोण करतंय?
- नोकरीच्या शोधात मराठा टू कुणबी होण्याचा असाही एक मार्ग असतो…