पुण्यामध्ये आलेल्या महापुरात यशवंतराव चव्हाणांनी मदतकार्याचा आदर्श घातला होता.

११ जुलै १९६१ ची ती काळरात्र. ढगफुटी झाली होती. न भुतोनभविष्यती असा  मुसळधार पाऊस सुरु होता.  पुण्याजवळील वेल्हे इथे जवानांची एक सबंध तुकडी जीवाचं रान करत होती. आसपासच्या गावकऱ्यांना उंच जागी हलवण्यात येत होतं. नदी दुथडी भरून वहात होती. पण मिल्ट्री बोलवावी असं झालं काय होतं?

पानशेतच्या धरणाला चीर पडली होती.

पानशेत म्हणजेच तानाजीसागर धरण. स्वातंत्र्यापूर्वी पुणे शहराला पाणीपुरवठा खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या लोकसंख्येमुळे  खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागलं होतं. पुणे शहर तसेच आसपासच्या शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून पुण्यापासून पश्‍चिमेला ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले.

१० ऑक्‍टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९६२ पर्यंत बांधून पुरे होणार होते. काम सुरु झाल्यावर एक दोन वर्षांनी बांधकामाचा आढावा घेण्यात आला. तेव्हा लक्षात आले की नवीन टेक्नोलॉजी वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल.

त्या दृष्टीने बदल करण्यात आले. बांधकामाने वेग पकडला. टार्गेटप्रमाणे १९६१चा जून महिना उजाडला पण नियोजनातल्या बऱ्याच गोष्टी अजून पूर्ण झाल्या नव्ह्त्या. याच दरम्यान पाउस सुरु झाल्यामुळे सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र धरण संपूर्ण भरले. पावसाने झोडपायला सुरवात केली होती. ८-९ जुलै पासूनचं पानशेत धरणाच्या असुरक्षिततेच्या बातम्या पोहचण्यास सुरवात झाली होती. पुणेकरांना तो पर्यंत पानशेत ऐकूनही ठाऊक नव्हते. रेडियोवर येणाऱ्या अपडेट्स कडे लक्ष द्यावसही वाटल नाही.

११ तारखेला दिवसभर पाऊस ओकत होता. महापूर आला होता. परिस्थिती हाताबाहेर गेलेली ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी अखेर लष्कराला मदतीला बोलावले.

रात्रभर शूर जवानांनी पुराशी लढा दिला. धरणाला चीर पडली होती तिथे मातीच्या गोणी रचून प्रलयाला थोपवून धरलं. आसपासची गावे खाली केली, त्यांना सुरक्षित जागी हलवलं. शहरी पुणेकर साखरझोपेत होते. निसर्गाबरोबरची लढाई सुरूच होती. पण आभाळचं फाटलेलं, ते कधीवर थोपवणार.

१२ जुलै १९६१. सकाळी ७ वाजून १० मिनिटे झाली होती. पाण्याचा जोराचा लोंढा आला आणि धरणाने शेवटची आच दिली. जोराचा आवाज झाला. पानशेत धरण फुटून नदी अस्ताव्यस्त पणे पुण्याच्या दिशेने धावत होती. रस्त्यात लागणारी गावे कधीच तिने गिळंकृत केली.

पुण्यात हाकारी आली,

 ‘धरण फुटलं, पाणी आलं..पाणी आलं…’

जो तो धावत होता. आपला संसार, आपली पोरबाळ गोळा करून सुरक्षित ठिकाणी हलवली जात होती.  शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा आणि सोमवार पेठ या पेठा पाण्याखाली गेल्या. सदाशिव पेठेतही पाणी घुसल. कर्वे रोड जंगली महाराज रोड लुप्त झाला. डेक्कन जिमखान्याच्या ग्राउंडचं रुपांतर तळ्यामध्ये झाले होते. खडकवासला धरण फोडून पाण्याचा जोर ओसरवण्यात यश आलं होतं.

पण तोवर सगळीकडे हाहाकार उडला होता. मदतकार्य सुरु होतं. तरुण मूले रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होती. अफवांना ही पूर आला होता. लुटालूट सुरु होती. लकडी पूल उध्वस्त झाला होता. बंडगार्डनचा सोडला तर सगळे पूल पाण्याखाली गेले होते.

मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले होते. तेव्हाचे  महापालिका आयुक्त स.गो.बर्वे यांनी २४ तासात पुण्याला उभा करण्यासाठी कंबर कसली होती. 

घरे पडली होती. संसार उध्वस्त झाले होते. सगळीकडे भीषण परिस्थिती होती. नागरिकांना राहायला तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. सर्वप्रथम रस्ते साफ करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. पडलेल्या इमारती परत उभारण्याच काम सुरु झालं. 

दुसऱ्याचं दिवशी १३ जुलैला स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तातडीने पुण्यात दाखल झाले. यशवंतराव स्वतः फिरून त्यांना परिस्थिती दाखवत होते. 

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती. पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू उभे होते.  पण तरी खचलेल्या पूरग्रस्तांना विश्वास देण्याचं काम करावं लागणार होतं. ७० हजार कुटुंबे रस्त्यावर आली होती. गाव पुन्हा उभा राहे पर्यंत पुणे सोडायचं नाही असा निश्चय मुख्यमंत्र्यांनी केला.

यशवंतरावानी सगळ्यात पहिलं काम केलं की शासकीय जमिनी या पूरग्रस्तांना वाटप करण्यास सुरवात केली. उद्योगपतींना मदतीचे आवाहन करण्यात आलं. नवी पेठ, सहकार नगर इथे पूरग्रस्तांच्या इमारती उभ्या राहिल्या. पुणेकरसुद्धा जुन्या पेशव्यांच्या पेठांमधून बाहेर पडले होते. शेजारच्या कोथरूड भागात स्थलांतरीत होऊ लागले. झपाट्याने पुण्याचे केंद्र नदीपलीकडे शिफ्ट झाले होते.

वाताहत झालेले पुणे फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले होते.

पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर ताण पडू नये म्हणून आणखी दोन धरणे उभारण्यात आली. स.गो.बर्वे यांनी केलेल्या जबरदस्त मदतकार्यामुळे प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी त्यांना निवडणूक लढवायला लावून राज्याचा अर्थमंत्री बनवलं.

या आपत्तीने फक्त पुण्यालाच नाही तर संपूर्ण देशाला धडा शिकवला. अनेक चौकशी समिती बसवण्यात आली. पानशेत धरणाचे इंजिनियर असलेल्या एसएम भालेराव यांनी ही घटना म्हणजे आपली चूक समजून भर पुरात आत्महत्या करण्यासाठी उडी मारली होती. तिथ उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्यांना त्यातून बाहेर काढलं.

पूर का आलं याबद्दलचं पुणेकरांच कारण सुद्धा मज्जेशीर होत. त्यावेळी म्हणे पुण्यात जिस देश मे गंगा बेह्ती है हा सिनेमा लागला होता. कोणी तरी अफवा पसरवली की या सिनेमामुळे पुण्यात पूर आला. त्यानंतर कित्येक वर्ष हा सिनेमा पुणेकर पहात नव्हते.

हे ही वाच भिडू

2 Comments
  1. Aditya says

    Pandharpur Che Mahapujeche Maankarina Ashadi Ekadashi Cha cm sobat Maan ksa Milto ?

Leave A Reply

Your email address will not be published.