खुनाच्या केसमध्ये जेल मध्ये जाऊन आलेल्या बाहुबलीला लॉकडाऊन मोडला म्हणून अटक झालीय
उत्तरेत बाहुबली नेता म्हणून राजकारणात येणाऱ्यांची संख्या कमी नाही. विशेषतः बिहार मध्ये शहाबुद्दिन, राजन तिवारी, अनंत सिंह आणि पप्पू यादव यांची नावे बाहुबली नेता म्हणून घेण्यात येते. सामान्य जनतेपासून पासून राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारण्यांपर्यंत त्यांची दहशत असते. त्यांच्यावर कितीही आरोप झाले तरी राजकारणावरची त्यांची पकड ढिल्ली होत नाही.
असाच एक बिहारचा बाहुबली नेता म्हणजे पप्पू यादव.
सुभाष चंद्र बोस, विवेकानंद आणि भगत सिंह हे प्रेरणास्थान असल्याचा सांगणारा बिहारचा बाहुबली नेता पप्पू यादव गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पप्पू यादवला लॉकडाऊनचे नियम मोडल्या प्रकरणी बिहार पोलिसांनी अटक केली आहे.
पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीवप्रताप रुडी यांच्यावर कोरोना काळात ३० पेक्षा जास्त ऍम्ब्युलन्स लपवून ठेवल्याचा आरोप केला होता. राजीवप्रताप रुडी यांच्या कार्यालयासमोर या ऍम्ब्युलन्स उभ्या असल्याचा व्हीडीओ पप्पू यादव यांनी समोर आणला.
त्यातूनच आज पुन्हा पप्पू यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून मारामारी अपहरण दहशत यामुळे कुप्रसिद्ध असणारा पप्पू यादव फक्त लॉक डाऊनचे नियम मोडले म्हणून जेल मध्ये गेला यावरून गल्ली ते दिल्ली चर्चा रंगली आहे.
१९९० पासून बिहारच्या राजकारणात पप्पू यादव एक महत्वाची भूमिका निभवत असल्याचे पाहायला मिळते.
कधीकाळी खुनाचा आरोप असणाऱ्या पप्पू यादवला लोकसभेत चांगली कामगिरी करणारा खासदार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बिहार मध्ये मग ती विधानसभा असो लोकसभा निवडणूक पप्पू यादव चर्चेत असे होत नाही. मागच्या वर्षी झालेल्या बिहारच्या निवडणुकीत पप्पू यादव यांनी बहुजन मुक्ती मोर्चा, भीम आर्मी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आणि इंडियन मुस्लीम लीग बरोबर आघाडी करत निवडणुकी लढविली होती.
संपूर्ण भारताला पप्पू यादवची ओळख लालू यादव यांचा एकेकाळचा राजकीय वारसदार अशीच आहे.
कागदावर तर त्यांचे नाव राजेश रंजन आहे मात्र लोकं त्यांना पप्पू यादव नावानेच ओळखतात. पप्पू यादव यांचा जन्म मोठ्या जमीनदाराच्या घरात झाला. १९७० च्या दशकात जय प्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने देश ढवळून निघाला होता. उत्तरेतील राज्यात नवीन नवीन नेते उदयाला येत होते.
लालू यादवची सावली बनून एक विद्यार्थी नेता फिरत होता. ज्याला उत्तर बिहारमध्ये आपले वर्चस्व तयार करण्यासाठी आपली स्वताची सेना उभी केली होती. तोच हा पप्पू यादव.
मंडल आयोगनंतर बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु होता. ठाकूर भूमिहार आदीचे नेतृत्व आनंद मोहन करत होते. उत्तर बिहार मध्ये आनंद मोहन यांनी आपली खासगी आर्मी तयार केली होती. तर त्यांना उत्तर देण्यासाठी पप्पू यादव मागासवर्गीयांना घेवून याविरोधात लढत होते.
त्याकाळात मुख्यमंत्री होते त्यांचे राजकीय गुरु लालूप्रसाद यादव. लालूंचा त्यांच्या डोक्यावर हात होताच मात्र दोन्ही कडून होणाऱ्या हिंसक घटना पाहता त्यांनी त्या भागात बीएसएफ तैनात केले होते. इथूनच खरे पुढे उत्तर बिहारचे बाहुबली नेते म्हणून पप्पू यादव यांची ओळख देशभरात निर्माण झाली.
पप्पू यादव यांच्या त्याकाळातल्या दहशतीचे अनेक किस्से फेमस आहेत. असं म्हणतात की त्यांनी एकदा भर रस्त्यात एका पोलिसांच्या मिशा त्यांनी कापून टाकल्या होत्या.
सुरवातीला अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेत गेले, पुढे लोकसभा लढवली. १९९१ ते २०१४ पर्यंत ते अनेकदा वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढले आणि २००९ चा अपवाद वगळता जिंकले देखील त्या वर्षी जेलमध्ये असल्यामुळे कोर्टाने त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली नव्हती.
नव्वदच्या दशकात जेव्हा पप्पू यादव उत्तर बिहार मधील ‘बाहुबली’ नेते म्हणून उदयाला आले होते. १९९८ साली कम्युनिस्ट नेते व पुर्नियाचे आमदार अजित सरकार यांची त्यांच्या साथीदारांसह गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात एके ४७ चा वापर करण्यात आला. यात पप्पू यादव यांचे नाव पुढे आले होते.
आमदाराचा दिवसाढवळ्या खून झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. पप्पू यादव यांना वाचवण्यासाठी त्यांचे गुरु देखील काही करू शकले नाहीत. चारा घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पद गमावलेले लालू यादव यांना अजित सरकारना मारलेल्या घटनास्थळी स्वतः येऊन पाहणी करावी लागली.
पप्पू यादव यांना सीबीआयच्या विषेश न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयातून २०१३ मध्ये त्यांची निर्दोष सुटका झाली. २००८ ते २०१३ असे ५ वर्ष ते जेल मध्ये होते.
तस बघायला गेलं तर जेलवारी त्यांच्यासाठी नवीन नव्हती.
१९९८ साली राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत पप्पू यादव यांची रवानगी कारागृहात झाली तेव्हा जेल अधीक्षकाच्या घरासमोरील लॉन मध्ये टेनिस खेळतांना एका मुलीशी ओळख झाली. दोघांच्यात मैत्री वाढली.
पुढे कारागृहातून सुटका झाल्यानंतर सुद्धा बाहुबली पप्पू यादव परत लॉन वर जाऊन त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. तिच्या नकारानंतर पप्पू यादवने झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं हे आगळंवेगळं प्रेम पाहून अखेर रंजिताने प्रेमाला होकार दिला. दोघांनी पुढं लग्न देखील केलं.
जेल मध्ये असतांना लिहिली आत्मकथा
पप्पू यादव कारागृहात शिक्षा भोगत असतांना ‘द्रोह काल का पथिक’ ही आत्मकथा लिहिली. २००८ मध्ये झालेल्या लोकसभा बहुमतावेळी कॉंग्रेस-भाजपने खासदार विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आत्मकथेत केला आहे. यानंतर मोठी खळबळ माजली होती. २०१४ लोकसभेची निवडणूक लढवत मध्ये शरद यादव यांच्यावर मात करत खासदार बनले होते.
लोकसभेत सर्वोत्तम खासदार म्हणून पुरस्कार
लोकसभेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, उपस्थित केले गेलेले प्रश्न यावरून त्या-त्या राज्यातील खासदारांना सर्वोत्तम खासदार म्हणून पुरस्कार देण्यात येतो. २०१५ मध्ये पप्पू यादव यांना लोकसभेतील सर्वोत्तम खासदार म्हणून पुरस्कार दिला गेला.
बाहुबली नेता अशी इमेज असणाऱ्या पप्पू यादव यांची राज्यशास्त्रात ग्रॅज्युएट आहेत. तर आपत्ती व्यवस्थापन आणि मानव अधिकार यांच्यात डिप्लोमा झाला आहे.
२०१५ साली लालूंची साथ सोडली.
पप्पू यादव यांना पहिल्या पासून लालू प्रसाद यादवचा जवळचा समजण्यात येत होते. मात्र पहिल्यांदा अपक्ष निवडून येत पप्पू यादवने आपले इरादे स्पष्ट केले होते. काही जन तर त्यांना लालूचा राजकीय वारसदार म्हणूनही संबोधित करत होते. लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अनेक वर्ष पप्पू यादव नेते होते. अधून मधून त्यांचे वाद चालायचे. कधी समाजवादी तर कधी लोक जनशक्ती पार्टी मधून त्यांनी निवडणूक लढवल्या.
पण असं म्हणतात कि जेव्हा पासून लालूंची मुले राजकारणात आली तेव्हा स्वतःला त्यांचा राजकीय वारसदार म्हणवले जाणारे पप्पू यादव दुखावले गेले.
अखेर २०१५ साली पक्ष विरोधी कारवाई केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी जन अधिकार पक्ष स्थापन केला. मात्र त्यांच्या या नवीन पक्षाला बिहार मध्ये आपले स्थान निर्माण करता आले नाही. २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पप्पू यादव यांना पराभवाला समोर जावे लागले.
बाहुबली इमेज सुधारण्यासाठी प्रयत्न
पप्पू यादव यांनी इमेज सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या पुरात बिहारची राजधानी मध्ये येऊन पूरग्रस्तांना मदत केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या महिन्यापासून पप्पू यादव गरजवंताला ऑक्सिजन, रेमेडीसिवीर मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
याच जनसेवेचे प्रयत्नात पप्पू यादवने राजीव प्रताप रुडी यांच्या कार्यकर्त्यांनी लपवलेल्या ऍम्ब्युलन्सचा व्हिडीओ काढायचा प्रयत्न केला आणि लॉकडाऊनचा नियम भंग केला म्हणून नितीश कुमार सरकारने त्यांना अटक केली आहे.
हे ही वाच भिडू.
- हे तर काहीच नाही एकदा तर अर्णबला बिहारच्या बाहुबलीने किडनॅप केलेलं
- बिहारचा पाब्लो : १३,००० गाड्यांचा ताफा घेवून तो जेलमधून बाहेर पडला.
- लालूंचा तेजस्वी यादव IPL देखील खेळलाय पण..