भारताच्या पॅरा स्पेशल फोर्सेसमधले जवान काच चावून खातात, त्यामागं अभिमान वाटणारी परंपरा आहे…

जवळपास प्रत्येक लहान मुलानं एक स्वप्न पाहिलेलं असतं… मोठेपणी आर्मीत जावं. देशाची सेवा करावी, ज्या वर्दीकडं पाहिल्यावर डोळ्यात अभिमान दाटतो, ती वर्दी परिधान करण्याची संधी मिळवावी. लोकं आपल्याला सॅल्युट करतील, तेव्हा त्यात भीती नाही, तर जिव्हाळा असावा. पण आर्मीमध्ये जाणं काय सोपं नसतं. प्रचंड शिस्त, तितकंच खडतर ट्रेनिंग आणि अपार त्याग करुन सैन्यदलात प्रवेश मिळतो.

काही जण तर असे असतात, ज्यांचं अंतिम लक्ष्य सैन्यदल नाही, तर पॅरा स्पेशल फोर्सेस असतं. इथलं आव्हान खडतर, ट्रेनिंग खडतर आणि जबाबदारीही मोठी. हे पॅरा स्पेशल फोर्सेस असतात तरी काय? आणि ते काच चावून खातात, हे खरं आहे की अफवा? असे कित्येक प्रश्न आपल्याला पडलेले असतात.

सगळ्यात आधी माहिती घेऊ, पॅरा स्पेशल फोर्सेस असतात काय याबद्दल-

भारतीय सैन्यदलातल्या पॅराशूट रेजिमेंटच्या अंतर्गत दोन युनिट्स येतात. पॅरा ट्रूपर्स आणि पॅरा स्पेशल फोर्सेस. पॅरा ट्रूपर्सना पॅराशूटद्वारे शत्रूच्या भागात उतरण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आधी पॅराशूटच्या साहाय्यानं उडी मारुन मग ते पायदळाप्रमाणं काम करतात. पॅराशूट रेजिमेंटच्या ४, ५, ६ आणि ७ या बटालियन्सचा यात समावेश असतो.

तर पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये ९ युनिट्सचा समावेश असतो. पॅरा स्पेशल फोर्सेसच्या डोक्यावर मरून रंगाची काहीशी तिरकी कॅप असते. तर खांद्यांवर स्पेशल फोर्सेस लिहिलेला बॅच असतो. या दोन्ही गोष्ट भारतीय सैन्यदलात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात.

पॅरा स्पेशल फोर्सेसचं ट्रेनिंग प्रचंड खडतर असतं. भारतीय सैन्यदलातल्या सर्वोत्तम युनिट्सपैकी एक असल्यानं, पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये समाविष्ट असलेल्या जवानांना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कुलमध्ये त्यांचं ट्रेनिंग पार पडतं. विशिष्ट युद्धप्रसंगात कसं आणि काय काम करायचं याचं प्रशिक्षण या जवानांना मिळतं. क्रॉस बॉर्डर रेड्स, जोखमीच्या मोहीमा, रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये टार्गेट किलिंग या गोष्टींचं ते विशेष प्रशिक्षण घेतात. त्यांचं प्रशिक्षण इतकं जबरदस्त असतं, की बाहेरुन मिळालेल्या मदतीशिवाय बराच काळ ते शत्रूच्या भागात सर्व्हाइव्ह करु शकतात.

त्यांच्या खडतर ट्रेनिंगमुळे ते शारीरिक आणि मानसिक रीत्याही कणखर होतात. त्यांचं ट्रेनिंग संपतं तेव्हा, ते एक विशिष्ट परंपरा पाळतात. ट्रेनिंगच्या शेवटी त्यांना एक पटियाला पेग देण्यात येतो, आता हा पटियाला पेग म्हणजे ग्लास हातात घेतल्यावर जवळपास चार बोटं उंचीची दारु त्यात भरायची. रम किंवा रेड वाईनचा हा पटियाला पेग, हे जवान एका दमात मारतात.

विशेष म्हणजे, हा पेग संपलाय हे तेव्हाच मानलं जातं, जेव्हा ते काचेच्या ग्लासची कड आपल्या दातांनी तोडतात आणि ती चक्क खातात. काच पोटात गेल्यावर तिचा त्रास होऊ नये, म्हणून हे जवान आपल्या दातांनी काच चावून तिचा अक्षरश: चुरा करतात. त्यांची मानसिक आणि शारीरिक कणखरता कुठपर्यंत गेलीये हे तपासण्यासाठी हि पद्धत सुरू करण्यात आली होती. 

पण खांद्यांवर ‘बलिदान’ हे शब्द लिहिलेला बॅच घालणाऱ्या या ‘ग्लास इटर्स’ जवानांसाठी या पद्धतीला एखाद्या धार्मिक परंपरेप्रमाणं महत्त्व आहे. त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि सामान्य नागरिकांसाठी पॅरा स्पेशल फोर्सेस हे असीम त्यागाचं आणि जबरदस्त शौर्याचं प्रतीक.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.