अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते

आज भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी यांच्या मुले अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले. यात खरे खोटे करण्यापेक्षा कलामांना राष्ट्रपती करण्याआधीच्या काय काय घटना घडलेल्या त्या बघू.

तारीख होती ४ एप्रिल २००२. स्थळ अहमदाबाद गुजरात.

गुजरातची दंगल सुरू होवून बराच वेळ झाला होता. अखेर वाजपेयी गुजरातला आले होते. त्यांनी दंगलग्रस्तांच्या छावण्यांना भेटी दिल्या. ती अनाथ मुले पाहून त्यांच मन हेलावले. वाजपेयी म्हणाले,

विदेशों में हिंदूस्थान की बहुत इज्जत हैं. उसमें मुस्लिम देश भी शामिल हैं. अब मैं वहां कोनसा मुंह लेकर जाऊंगा ?

दिवसभराचा दौरा आटपून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पत्रकार परिषदेला सामोरे गेले. इथेच त्यांच ते गाजलेलं विधान आलं.

वाजपेयींना विचारण्यात आलं मुख्यमंत्री के लिए आपका क्या संदेश हैं ?

वाजपेयी म्हणाले एकही संदेश हैं,

कि वे राजधर्म का पालन करें. राजधर्म यह शब्द काफी सार्थक हैं. शासन के लिए प्रजा-प्रजा में भेदभाव नहीं हो सकता. न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न धर्म-संप्रदाय के आधार पर.

अटलजींचे हे वाक्य पुर्ण होताच शेजारी बसलेले मुख्यमंत्री मोदी म्हणाले,

हम भी वही कर रहे हैं साहब…

त्यावर आपला सूर बदलत वाजपेयी म्हणाले,

मुझे विश्वास हैं कि नरेंद्रभाई यहीं कर रहें हैं…

पत्रकार परिषद संपली.

पण राजकीय विश्लेषक सांगतात की यावेळी नरेंद्र मोदींनी किमान राजीनामा देण्याची तयारी तरी दाखवायला हवी होती. पण हे मत फक्त वाजपेयी यांच होतं. अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर हिंदूत्वाची धार कमी झाली होती. वाजपेयींच्या राजकारणात ती धार सेक्युलर पणाकडे झुकत होती. या घटनेतून वाजपेयी सेक्युलर आहेत हे सिद्ध झालं असत पण भाजपपासून हिंदूत्व हिरावण्याची देखील शक्यता होती.

गोवा येथे झालेले भाजपचे चिंतन शिबीर मोदींच्या राजीनाम्याच्या विषयावरून जोरात गाजले. अडवाणी यांच्या पासून ते भाजपच्या तरुण नेत्यांपर्यंत अनेकांचा मोदींना पाठिंबा होता. त्यांनी आपला आक्रमक धोरण राबवत मोदींच्या राजीनाम्याचा विरोध केला.वाजपेयींना कळालं पण ते पाहण्याशिवाय दूसऱ्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या.

अखेर वाजपेयीं सायंकाळी संवाद साधत असताना म्हणाले,

भारत प्राचिन काळापासून सेक्युलर आहे.  अगदी इस्लाम व ख्रिस्ति धर्म इथे येण्याअगोदर पासून.  इस्लामची दोन रुपे आहेत. एक आहे शांतीपाठ देणारा आणि दूसरा मूलतत्ववादी व दहशतीला प्रोत्साहन देणारा. जिथे मुस्लीम बहुसंख्य असतात.  तेथे ते शांततामय सहजीवन अशक्य करुन टाकतात.

अटलजी यांनी बहुमताचा सन्मान राखत सामोपचाराचे धोरण स्वीकारलं होतं. एकीकडे अपमान झाल्याची भावना होती मात्र वाजपेयी यांनी पक्षांतर्गत नेतृत्व अधिक मजबूत असल्याची खात्री संध्याकाळच्या दरम्यानच्या भाषणात दिली होती.

तरिही या गोष्टींमधून जात असताना भाजप हा कठोर हिंदूत्ववादी न राहता त्याला सेक्युलरपणाची देखील जोड असल्याचं वाजपेयींना दाखवायचं होतं. त्यासाठी आपलं पक्षातलं नेतृत्त्व देखील क्षीण करायचं नव्हतं.

काही दिवस गेले आणि राष्ट्रपती पदासाठी कोण याची चर्चा चालू झाली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अटलजींना भेटायला आल्या आणि त्यांनी डॉ. पी.सी. अलेक्झांडर आम्हाला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नकोत याची गळ घातली. संघपरिवाराच्या बाहेरची व्यक्ती, त्यातही ख्रिश्चन त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपची सेक्युलर चेहरा दाखवण्याची संधी होती. पण मृदू स्वभावाच्या अटलबिहारी यांनी सोनिया गांधी यांची विनंती ऐकली व अलेक्झांडर यांच नाव मागे पडलं.

अशा वेळी धावून आले ते प्रमोद महाजन. पुढे जावून वाजपेयी यांनी प्रमोद महाजनांना लक्ष्मणाची उपाधी दिली होती याची पाळेमुळे कुठेतरी अशाच घटनांमध्ये असलेली दिसून येतात.

या सर्व पार्श्वभूमीत वाजपेयींनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा शोध चालू ठेवला होता. 

९ जून २००२ रोजी अडवाणी यांच्या घऱी प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडू आणि जॉर्ज फर्नांडिस यांची बैठक बसली. या बैठकीत प्रमोद महाजन यांच्याक़डून एक वेगळ नाव पुढे आलं ते म्हणजे, “अब्दुल कलाम”

चौघेही हे नाव घेवून तात्काळ अटल बिहारी यांच्या घरी आले. त्यांनी अब्दुल कलाम यांच नाव सुचवताच अटल बिहारी वाजपेयी यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळतलं. मोठा पेच महाजन यांनी आपल्या कौशल्याने सोडवला होता. अटल बिहारी वाजपेयींनी अब्दुल कलामांना फोन लावला तेव्हा चेन्नईमध्ये ते विद्यार्थांना शिकवत होते. अटल बिहारी यांनी त्यांची संमती विचारली आणि पुढे कलाम राजधानीत आले.

एक वैज्ञानिक व्यक्ती, संघाबाहेरील व्यक्ती, मुस्लीम व्यक्ती व त्याहूनही अधिक देशप्रेमी व्यक्ती राष्ट्रपती पदाचा उमेदवार करुन भाजपने योग्य डाव साधला होता. अशा गोष्टींच टायमिंग साध्य करण्यात महाजन हूशार होते. त्यांनी लढवलेल्या कल्पनेमुळे अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले आणि अटलजींची सर्वसमावेशक ही प्रतिमा देखील अखंड राहिली. 

याचाच अर्थ नरेंद्र मोदी यांचा अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्यात कोणता सहभाग जरी नसला तरी एकप्रकारे अप्रत्यक्षरीत्या ते या निवडीच्या मागे प्रमुख कारण ठरले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.