पारलेवर चोरीचा आळ आणणारा ओरिओ स्वतःचं बिस्किटांचा ‘अन्नू मलिक’ आहे.

जगात दोन टाईपचे लोक असतात. एक म्हणजे नाईन्टीज किड्स जे चहात पारले बिस्कीट बुडवून खातात आणि दुसरे मिलेनियल्स जे दुधात ओरियो बुडवून त्यातील क्रीम चाटून खातात. दोन नंबरची जमात इन्स्टाग्रामवर रिल्स बनवताना आढळून येते. तर पहिली फेसबुक वर राजकीय चर्चा करताना दिसते. असो. आपल्याला या दोन्ही जमातींच्या भांडणाबद्दल बोलायचं नाही.

खरा वाद ते खात असलेल्या बिस्किटांचा आहे. पारले विरुद्ध ओरिओ.

झालंय असं की सध्या भारतात ओरिओ विक्रीचा हक्क असलेल्या कॅडबरीने पारलेवर आरोप केलाय की त्यांनी आमच्या बिस्किटंच डिझाईन ढापलंय. विषय सुरु झालाय पारलेच्या फॅबिओ बिस्कीट वरून. आता तस बघायला गेलं तर दोन्ही बिस्कीट डार्क आणि आत मिल्क क्रीम असलेले आहेत. दोन्हीच्या किंमती सारख्या आहेत, टेस्ट सेम आहे. दिसायला देखील सेम आहेत. नावात देखील बरच साम्य आहे.

ओरिओवाल्यांचा दावा आहे की आम्ही शंभर वर्षांपूर्वीचे आहोत आणि आत्ता परवा आलेल्या पारले फॅबिओने आमचं डिझाईन कॉपी केलं. आता तस वरून बघितलं तर ते खरं देखील वाटतं. बिस्किटाच्या जगात हि घडलेली पहिली घटना नाही. असा प्रकार या पूर्वी देखील बऱ्याचदा झालाय. मार्केट मध्ये ब्रिटानिया पासून ते सनफिस्ट पर्यंत असलेल्या मारी बिस्किटाचा विषय घ्या. तेव्हा कधी कोणी काही बोललं नाही पण आता ओरिओवाल्यानी हा कॉपीचा विषय ऐरणीवर आणलाय.

6346 500x500 1

फक्त ऐरणीवर आणलाय असं नाही तर त्यांनी पार्लेला थेट कोर्टात खेचलंय. आता तिथं जो काही योग्य असेल तो निकाल लागेलच पण तत्पूर्वी आम्ही एक विषय तुमच्या नजरे खाली आणू इच्छितो.

जगाला नावे ठेवत आपण भारी असल्याचा माज करणाऱ्या ओरिओचा इतिहास हा ढापाढापीचाच आहे.

गोष्ट सुरु होते १८८२ साली.

जेकब लूज नावाचा अमेरिकेच्या मिसूरी प्रांतात राहणारा एक व्यापारी होता. त्याचा फटाके बनवण्याचा बिझनेस होता. त्याच्या बायकोला लहान मुलांची आवड होती. त्यांची दोन्ही मुलं जगली नाहीत त्यामुळे इला लूज हि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांना गोळा करून एक छोटं पाळणाघर टाईप मुलांना संभाळायची, त्यांच्याशी खेळायची. त्यातूनच तिने नवऱ्याला चॉकलेटबिस्किटांचा बिजनेस सुरु करायचा सल्ला दिला.

जेकबने आपल्या भावासोबत एक कँडी कंपनी विकत घेतली आणि तिला नाव दिले अमेरिकन बिस्कीट कंपनी.

त्यात ते बिस्कीट बनवायचे आणि विकायचे. तस त्यांचं बर चाललं होतं. खूप मोठा फायदा नाही, खूप मोठा तोटा नाही. ठीकठाक बिजनेस होत होता. साधारण १९०२ साली त्यांनी विल्स नावाच्या एका कंपनी बरोबर टायप करून एक नवीन बिस्कीट जन्माला घातलं, नाव ठेवलं सनशाईन.

सनशाईन बिस्कीट चालू लागलं. दोन्ही भावांनी बक्कळ पैसा कमवला. त्यांनी एक नवीन प्लांट देखील टाकला. या भल्या  मोठ्या कारखान्यात बिस्कीट बनू लागले.

१९०८ साली त्यांनी एक नवीन बिस्कीट बनवले, याच नाव होत हायड्रॉक्स.

download 3

हे डार्क बिस्कीट होते. ज्यू लोकांच्या कोशर कुकीज वरून ते इन्स्पायर झालेले. त्याची चव भन्नाट होती. बिस्किटाच्या जगात या हायड्रॉक्सने नवीनच क्रांती केलेली. फक्त या बिस्किटाचा एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे नाव. हायड्रॉक्स हे नाव एखाद्या औषधासारखं वाटायचं. त्यात ते काळं बिस्कीट त्यामुळे लहान मुले या बिस्किटापासून थोडीशी लांबच राहायची. म्हणावं तेवढं यश त्यांना मिळालं नाही.

अशातच १९१२ साली अमेरिकेच्याच नॅबिस्को उर्फ नॅशनल बिस्कीट कंपनीने ओरिओचा “शोध” लावला. पण त्याकाळच्या सगळ्यांना माहित होतं कि हे डिझाईन आणि टेस्ट हायड्रॉक्स वरून ढापलं आहे. त्याला चकचकीतपणा आणला, नाव देखील एन्शियन्ट ग्रीक वाटेल असं दिलं. ६ मार्च १९१२ रोजी पहिलं ओरिओ बिस्कीट विकलं गेलं.

या बिस्किटाने जगभरात इतिहास घडवला. पुढच्या आठवडया भरात नॅबिस्कोने आपला ट्रेडमार्क रजिस्टर केला.

जेकब लुजच्या सनशाईन कंपनीने मोठा विरोध केला कि हे बिस्कीट आमच्या हायड्रॉक्स वरून ढापलेलं आहे पण कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. गेली शंभर वर्षे हा वाद चालतच राहिला. जेकबच्या मृत्यू  हायड्रॉक्स बिस्कीट विकलं जात होतं. ज्यू समाजात हट्टाने हेच बिस्कीट  खाल्ले जात होते.

download 2

अनेक कोर्ट कचेऱ्या झाल्या. सन शाईन कंपनीने हात टेकले.मध्यंतरी त्यांची कंपनी बंद देखील पडली होती. गेल्या काही वर्षात हायड्रॉक्सला पूर्वजन्म देण्यात आला आहे.

तर इकडे ओरिओ श्रींमताचं बिस्कीट हे बिरुद मिळवत संपूर्ण जगात फेमस झाला आहे. अजूनही हि कंपनी नॅबिस्कोच्या मालकीची आहे मात्र भारतात त्याचे डिस्ट्रिब्युशनचे अधिकार कॅडबरीकडे आहेत. न्यूयॉर्कमध्ये जिथे ओरिओ पहिल्यांदा निर्माण झाला तिथे त्या गल्लीच नाव ओरिओ देण्यात आलंय. आज न्यूयॉर्क ते नायगाव सगळीकडे हे बिस्कीट प्रतिष्ठा म्हणून खाल्ले जाते.

पण यावेळी त्यांनी पंगा जगातील सगळ्यात जास्त खपल्या जाणाऱ्या बिस्कीट बरोबर म्हणजे पारले बरोबर घेतलाय. जी माने जिनियस असणाऱ्या पारलेला हरवणं वाटतं तितकं सोपं नाही हे अमेरिकन कंपनीला लक्षात येईलच. असो.

हे ही वाचा भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.