सातशे वर्ष जुन्या या रहस्यमयी मंदिरावरून इंग्रजांनी भारतीय संसदेची रचना केली

काल बातमी आली की भारतीय संसद भवनाची इमारत जुनी झाली असल्यामुळे नवीन संसद भवन बांधले जाणार असून याची जबाबदारी टाटा ग्रुपकडे सोपवण्यात आली आहे.

भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. देशाचं हे कायदे मंडळ. इथेच भारताचं संविधान तयार झालं. आपण निवडलेले खासदार इथेच बसून देशाचा कारभार कसा चालवला जावा याच्या रूपरेषा आखतात.

भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसदेची निर्मिती इंग्रजांनी एका पुरातन मंदिरावरून केली होती.

मध्यप्रदेशच्या चंबळ खोऱ्यातील चौसष्ट योगिनी मंदिर.

इसवी सणाच्या तेराव्या शतकात ग्वाल्हेर जवळच्या मितावली गावात या मंदिराची निर्मिती झाली. तेव्हाचा गुर्जर प्रतिहार राजा देवपाल हा शाक्त पंथाचा होता. मंत्रतंत्रावर त्याचा विश्वास होता.

ही तांत्रिक पद्धतीची पूजा करण्यासाठी त्याने चौसष्ट योगिनी मंदिर उभे केले.

योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता आहेत. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुग्रेने ६४ रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वाच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्याचा पराभव केला.

चंबळच्या घनदाट जंगलामध्ये एका उंच टेकडीवर हे मंदिर उभे आहे.

इकंतेश्वर महादेव मंदिर  असे ही याला म्हटले जाते.

तिथे जाण्यासाठी २०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. वर गेल्यावर १०१ स्तंभावर उभे असलेले विस्तीर्ण गोलाकार मंदिर दिसते. ६४ देवीच्या ६४ छोट्या खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक शिवलिंग स्थापन केलेले आहे.

पूर्वी प्रत्येक खोलीत योगिनींची मूर्ती होती अस म्हणतात.

पुरातत्व खात्याच्या अभ्यासानुसार हे मंदिर तांत्रिक विद्या जाणणाऱ्याचं मुख्यकेंद्र होतं. देशभरातून अनेक तांत्रिक येथे तंत्रविद्या शिकायला येत असत.

आजही या मंदिराला तंत्रिकांच विद्यापीठ म्हणतात.

यामुळे या मंदिरात रात्री मुक्काम करता येत नाही. माणसेच काय पण पक्षीहि रात्री येथे राहत नाहीत असे सांगितले जाते.

गूढ भयाण चंबळच्या खोऱ्यात वसलेल्या या रहस्यमयी मंदिरात अजूनही काही तांत्रिक आपली पूजा, यज्ञ करताना पाहायला मिळतात. अनेक परदेशी पर्यटक उत्सुकतेने या मंदिराला भेट देतात. पण भारतीय पर्यटक तिथे जाण्यास घाबरतात.

याच मंदिरावर प्रभावित होऊन एडविन ल्युटन्स याने संसदेची रचना केली.

ब्रिटिशांच्या काळात भारताची राजधानी कलकत्ता ही होती. १९११ साली पंचम जॉर्जच्या राज्यरोहनाच्या निमित्ताने इंग्रजांनी मुघलांच्या दिल्लीला राजधानी बनवलं.

गेली अनेक वर्षे उद्धवस्त असलेल्या या शहराला पुन्हा उभारण्याच काम इंग्लंडमधील सर्वोत्तम आर्किटेक्ट म्हणवल्या जाणाऱ्या ल्युटन्स याला देण्यात आले. ल्युटन्सने आपला सहकारी हरबर्ट बेकर याच्या मदतीने राष्ट्रपती भवनापासून ते राजपथ, इंडिया गेट पर्यंत अनेक इमारती उभारल्या.

नवी दिल्ली उभारताना युरोपियन गॉथिक स्टाईल आणि भारतीय पुरातन स्थापत्यशैली यांचा मिलाफ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संसद. चौसष्ट योगिनी मंदिरावरून प्रेरणा घेतलेल्या या गोलाकार इमारतीला २७ फूट उंचीचे १४४ स्तंभ आहेत. फक्त बाहेरूनच नाही तर आतल्या बाजूला देखील संसद चंबळच्या तांत्रिक मंदिराची प्रतिकृती आहे.

राष्ट्रपती भवनाच्या जवळ असलेली ही इमारत ग्रॅनाईटच्या दगडात बनवलेली आहे.

संसदेच बांधकाम पूर्ण होण्यास जवळपास ६ वर्षे लागली. १९ जानेवारी १९२७ रोजी या इमारतीचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड आयर्विनच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

तेव्हा पासून गेली नव्वद वर्षे ही इमारत भारतीय लोकशाहीच्या चढउतारांची साक्षिदार आहे.

स्वातंत्र्यानंतर वेळोवेळी याच्यात सुधारणा करण्यात आल्या. लोकसभा राज्यसभा असे दोन सभागृह बनवण्यात आले. मात्र येत्या भविष्यात हा लोकशाहीचा भार या म्हाताऱ्या इमारतीला झेपेल अस नाही.

म्हणूनच नव्या संसदेचा घाट घातला जात आहे. आता टाटांनी त्याची रचना देखील भारतीय संस्कृतीला मध्यवर्ती ठेवून करावी अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pratik says

    काही देवळ्यांमध्ये अजूनही योगिनींच्या खंडीत मूर्त्या आहेत.आणि जवळच्या दतिया इथं बगलामुखीचं मंदिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.