मराठी माणसाने १८९० साली सर्कस काढली होती….

एकेकाळी सर्कशीत प्राणी नसायचे. असले तरी शुल्लक गोतावळा असायचा. वाघ, सिंह पाळणं हे खर्चिक होतं आणि त्याहून अधिक धाडसाचं देखील होतं. मुळात सर्कशीत वाघ, सिंह असतात असा विचार देखील कोणी केला नव्हता. भारतातल्या सर्कशीची सुरवात नेमकी कधी झाली याचा शोध घेतल्यानंतर १८७९ साल मिळत. एक दोन करत भारतात मोठ्या प्रमाणात “सर्कस” सुरु झाली होती.

साल १८९०, 

म्हणजे भारतात सर्कस सुरू होवून अवघी ११ वर्ष झाली होती. सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये त्या काळात १६ वर्षाचा एक तरुण होता. त्याची परिस्थिती तशी बेताचीच. शेती करणं म्हणजे फक्त दोन वेळच्या खाण्याची कशीतरी सोय करणं एवढीच शेतीची व्याख्या होती. काहीतरी काम करावं म्हणून १६ वर्षाच्या त्या मुलाने अगदी हातातल्या चार पैशांच्या जोरावर सर्कस सुरू केली. नाही म्हणायला मिरज शहरातले काहीजण सर्कस मध्ये काम करायचे. काम करायच्या ऐवजी या पठ्याने थेट स्वत:ची सर्कस उभा करण्याचा विडा उचलला.

वय वर्ष १६. या वयात या मुलाने सर्कस सुरू केली होती. ते साल होतं १८९० चं. आणि पुढच्या चारच वर्षात त्या मुलाकडे पाचशे लोक कामाला होते. महाराष्ट्रासह देशभरात या सर्कशीचा बोलबाला सुरू झालेला या सर्कशीच नाव होतं, 

परशुराम लायन्स सर्कस. 

जगविख्यात सर्कस म्हणून एकेकाळी गौरव झालेल्या परशुराम लायन्स सर्कसच्या  परशुराम माळी यांची ही गोष्ट.

वयाच्या १६ व्या वर्षी सर्कस सुरू करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. पण हातात भांडवल नव्हतं. तेव्हा स्थानिक व्यक्तिकडून राहत्या घरावर कर्ज काढण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आजही मराठी घरात घर पणाला लावून व्यवसाय करण्याच धाडस नसतं. मात्र परशुराम माळी यांनी घरावर कर्ज काढण्याच धाडस केलं. ते साल होतं १८९० चं.  सर्कशीची लोकप्रियता अवघ्या काही वर्षातच इतकी वाढली की पाच पन्नास लोकांहून हि सर्कस पाचशे लोकांचे कुटूंब पोसणारी झाली.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला परशुराम लायन्स सर्कस भारतासह श्रीलंका, ब्रम्हदेश सारख्या देशांपासून थेट युरोप पर्यन्त पोहचली होती. भारताच्या बाहेर सर्कस घेवून जाण्याच काम ऐन २५-३० च्या वयात परशुराम माळी यांनी करुन दाखवलं होतं.

तरिही काहीतरी कमतरता त्यांना जाणवतच होती,

ती गोष्ट होती वाघ आणि सिंह.

त्या काळात सर्कसमध्ये वाघ आणि सिंह यांचा वापर केला जात नव्हता. तुलनेत कमी हिंस्त्र असणाऱ्या हत्ती, घोडे यांचा वापर सहजमान्य होता पण वाघ आणि सिंह यांना सर्कसमध्ये स्थान दिले जावू शकते याचा विचार देखील कोणी केला नव्हता. मात्र भारताबाहेरील सर्कस मध्ये वाघ, सिंहाचा वापर करण्यास सुरवात झाली होती. ब्रम्हदेशात परशुराम लॉयन सर्कस पोहचल्यानंतर परशुराम माळी यांनी नेमकी ही बाब हेरली आणि आपल्या सर्कशीत देखील वाघ आणि सिंह असावेत हा निर्धार केला.

Screenshot 2019 06 17 at 3.43.08 PM

वाघ आणि सिंह आणले पण त्यांना प्रशिक्षण कोण देणार, त्यांच्यासोबत स्टंट कोण करणार हा प्रश्न होताच. अशा वेळी स्वत: परशुराम माळी यांनी वाघ आणि सिंह यांना प्रशिक्षण देण्याच काम सुरू केले. अवघ्या काही दिवसात त्यांनी वाघ आणि सिंहांना अस प्रशिक्षित केलं की ते स्वत:च तोंड सिंहाच्या जबड्यात ठेवू लागले.

त्यांचा हा पराक्रम पहाण्यास गर्दी होवू लागली. परशुराम लायन्स सर्कसने मोठ्ठे नाव कमवले. इतके की सर्कशीचा नामोल्लेख नसणाऱ्या तासगाव सारख्या छोट्याशा गावात १९२० च्या सुमारास २० हून अधिक सर्कस स्थापन झाल्या.

सर्कशीचे नाव ऐकून एक दिवस खुद्द लोकमान्य टिळक परशुराम माळींचा स्टंट पाहण्यास आले. 

सिंहाच्या जबड्यात तोंड घालणाऱ्या परशुराम माळींना पाहताच लोकमान्य टिळकांनी त्यांचा उल्लेख सर्कससिंह असा केला. त्यांनतर हिच पदवी त्यांना लागली व ते सर्वत्र सर्कससिंह म्हणूनच ओळखू लागले. 

मराठी माणसाने एकोणीसाव्या शतकातच व्यवसायाचं एक नवं क्षेत्र दाखवलं होतं. या व्यवसायात ते इतके तेजीत होते की अस सांगितल जातं की त्यांच्याकडे येणारे पैसै हे पोत्यात भरूनच येत असत. चांदिचे ड्रेस ते वापरत. मिळवलेले पैसे गरिबांमध्ये वाटून देत असत. सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मर्सडिज कंपनीचे ट्रक त्यांनीच घेतल्याच सांगण्यात येत. ऐन तारुण्यात असतानाच आजारपणामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबियांना सर्कशीचा भला मोठ्ठा व्याप संभाळता आला नाही.

१९५५ साली जगभरात नावाजलेली परशुराम लॉयन सर्कस मिरजेत शेवटचा खेळ करुन बंद करण्यात आली. आजच्या पिढीत त्यांचे नाव सहसा निघत नाही. पण मराठी माणूस व्यवसाय करु शकत नाही अस कोणी सांगू लागल की १८९० साली सर्कशीसारखा व्यवसाय उभा करून जगभरात पोहचलेल्या या माणसाचं नाव मात्र मोठ्या अभिमानाने सांगू वाटतं हे नक्की.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Janardan says

    Proud to be Tasgaon kar

Leave A Reply

Your email address will not be published.