बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.
मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.
पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.
अस म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.
अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.
राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता महाला आणखी माणसे नकोत.
तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात चिमुटभर साखर टाकली. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात साखर मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.
पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.
ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवल. पैसा कमावला.
पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.
पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.
त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.
पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. अफूचा व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीजीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.
पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.
१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.
एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.
याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.
या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.
१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.
याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी
बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.
अशीच कथा केईएमची.
पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी
एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.
काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र केईएम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.
बनू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.
डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं.
आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे. या सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.
प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.
संदर्भ- पुण्यभूषण दिवाळी अंक राजीव साबडे यांचा लेख
हे ही वाच भिडू.
- मुंबईतल्या त्या रोगाच्या साथीत लाखों हिंदू मृत्यूमुखी पडले पण पारशी वाचले कारण
- चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते
- माधवराव पेशव्यांनी चर्च बांधून ख्रिश्चन बांधवांना पुणेकर करुन घेतलं..!
- पुणेरी पोरांना खेळताना बघून इंग्रजांना बॅडमिंटनचा खेळ सुचला.
खूप सुंदर माहिती. पारशी समाजाने पुण्याच्या वैभवात फार मोठे योगदान दिले आहे, पुणेकर त्यांचे योगदान विसरणार नाहीत, आजही हा समाज पुण्याच्या मध्य भागात क्रियाशील आहे, पुणेकरांचे सर्व सण उत्सव या समाजाच्या सहभागाने साजरे होत आहेत. सलाम त्यांच्या दूर दृष्टीच्या नेत्यांना.