पटणार नाही पण पारशी लोकांच्या देखील वाटमारी करणाऱ्या टोळ्या होत्या

पारशी लोकं म्हणजे शांत, सभ्य. अगदी इतिहासाच्या पोतडीत जाऊन पाहिलं तरी पारशी लोकांमुळे कुठे काही राडा झालाय, युद्ध वगैरे झालेत अशी उदाहरणं मिळत नाहीत. कधी धर्मांतराची चळवळ राबवली नाही का कधी दूसऱ्यांच्या फाटक्यात पाय टाकला नाही. आपण बरे आपला धंदा बरा आणि आपली गाडी बरी, हेच त्यांच्या जगण्याचं सुत्र राहिलय.

हॉटेलसारखा व्यवसाय करणारे पारशी, एखादी कंपनी चालवणारे पारशी म्हणून पारशी लोकं आपणाला माहित असतील. पारशी लोकांच्या नावाने दंगली देखील झाल्या पण त्याची उदाहरणं खूप कमी आहेत.

खालील लिंकवर गेल्यानंतर पारशी दंगलीत भाग घेण्यासाठी मुंबईतील भटकी कुत्री कशी जबाबदार होती हे तुम्हाला वाचता येईल.

मुंबईतली पहिली दंगल कुत्र्यांमुळे झाली होती, ती पण खऱ्याखुऱ्या!!!

पण हे उदाहरण सोडलं तर भांडण, मारामाऱ्या यापासून पारशी समाज लांबच राहिला. पण मॅटर असा आहे की इतिहासाच्या पुस्तकात पारशी लोकांच्या चक्क वाटमारी करणाऱ्या टोळ्यांचा रेफरन्स मिळतो.

१९०१ च्या सुमारास के.एन.काब्रा नावाचे एक लेखक होते. त्यांचे REMINISCENES OF FIFTY YEARS AGO नावाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकात पारशी लोकांच्या लुटमार करणाऱ्या टोळीबाबत वर्णन करण्यात आले आहे. 

१८५७ च्या सुमारास मुंबई शहरात फोर्जेट नावाचा पोलीस अधिकारी आला. त्या सुमारास मुंबई मध्ये राहणं हे भयानक होतं. सर्वत्र चोरांचा सुळसुळाट झाला होता. खून, दरोडे ही सामान्य गोष्ट होती. अशा वेळी फोर्जेट अधिकारी आला आणि त्याने या सर्व गोष्टींना पायबंद घातला. काब्रा लिहतात की या सुमारास मुंबईत वाटमारी करणारी, लोकांना रस्त्यात अडवून लुटमार करणारी पारशी लोकांची एक टोळी सक्रीय होती. त्यांची दहशत खूप मोठ्ठी होती.

या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत देखील अफलातून होती.

रस्त्यांवर एखाद्या उंच ठिकाणावर, खांब अथवा एखादं झाडं पाहून ते त्यावर बसत असत. खालून माणूस चालू लागला की वरून उडी मारून त्याला लुटत असत. प्रसंगी खून करून, मारहाण करुन सर्व ऐवज लुटून नेत असत. घोडागाडी असेल तर वरून दोर टाकून घोडा पाडण्याचा पराक्रम ही टोळी करायची. घोडागाडी थांबली की त्यावर उड्या मारायच्या. वाटलच तर चालत्या घोडागाडीवर उड्या मारून देखील गाडीत प्रवेश करायचा.

बर आत्ता तुम्ही म्हणालं मुंबईच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ही टोळी सक्रीय असेल, तर भिडूंनो काब्रा यांना या टोळीचा सामना करावा लागला होता. काब्रा यांची देखील सोन्याच्या जरीची टोपी या पारशी गॅंगने लंपास केली. ही घटना झाली ग्रॅंट रोडला.

ग्रॅंटरोड, फॉकलंड रोड, खेतवाडी या भागात पारशी टोळीची दहशत होती. अगदी आजच्या CST ते साऊथ बॉम्बेच्या सर्व रस्त्यांवर यांची दहशत होती. 

पण पुढे फोर्जेट आला आणि सगळं बदललं. मुंबईच्या पोलीस यंत्रणेला शिस्तबद्ध करण्याच श्रेय त्याला दिलं जातं. त्यानेच ही पारशी टोळी उधळून लावली. आणि इतिहासात पारशी लोकांची वाटमारी करणारी टोळी गडप झाली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.