मुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात ?

मिठापासून ते रणगाड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती करणारे टाटा असतील किंवा लस बनवणारे सायरस पुनावाला, बांधकाम उद्योगाचे अग्रणी शापुरजी पालनजी असोत किंवा टेक्स्टाईलचे वाडिया. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे.

ते पारसी समुदायातील आहेत.

संख्येने मूठभर असणारे पारसी लोक भारताच्या उद्योगक्षेत्रावर वर्चस्व गाजवतात. फक्त आत्ताच नाही तर गेली शंभर दोनशे वर्ष हीच परिस्थिती आहे. याचे कारण काय असावे?

सर्वात महत्वाचं म्हणजे पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात ?

पारसी मूळचे भारतातले नाहीत, ते आले इराणवरून. म्हणजेच त्याकाळच्या पर्शियामधून.

जगातील प्राचीन आणि महत्त्वाच्या धर्मांत पारशी धर्माची गणना होते.

या झोराष्ट्रीयन धर्माचा उदय इराणमध्ये इ.स.पू. सातव्या शतकात झाला.मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती.

यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.

अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.

राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता महाला आणखी माणसे नकोत.

तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात चिमुटभर साखर टाकली. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात साखर मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू.

राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.

पारसी लोक बुद्धिमान होते, मेहनती होते. पर्शियामध्ये हजारो वर्षे त्यांनी शेती केली होती. पण गुजरातच्या दुष्काळी भागात ते शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी व्यापाराला सुरवात केली.

व्यापाराच्या निमित्ताने पारसी गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

मध्ययुगात सुरू असलेल्या लढाया, युद्ध यांच्यापासून त्यांनी चार हात लांब राहण्याच धोरण अवलंबले. मुघल, राजपूत, मराठे, शीख या प्रत्येक राजसत्तेशी त्यांनी जुळवून घेण्याचं काम केलं. या सौहार्द समाजाचे कुठल्याच राजाशी वाद झाले नाहीत.

पारसी लोकांचा मुख्य व्यवसाय होता दलालीचा. नम्र स्वभाव,तोंडात साखर, प्रामाणिकपणा, देशभर हिंडून न थकता काम करण्याची मेहनती वृत्ती यामुळे सर्वांचा त्यांच्यावर विश्वास बसायचा. अनेक जण माल त्यांच्या मार्फतच घ्यायचे.

जेव्हा व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची इंग्रजी ही भाषा पारसी लोकांनी चटकन शिकून घेतली.

इंग्रजांना स्थानिकांशी संपर्क करायला पारसिंची मदत घेतली. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये छोट्या मोठ्या नोकरीवर भारतीय पारसी दिसू लागले.

या सोबतच दलालीचा धंदा होताच. ब्रिटिशांच्या आगमनानंतर तर तो आणखी विस्तारला. पारसीनी इंग्रजांच्या मुंबईमध्ये जम बसवला.

ब्रिटिशांना भारत मुख्य करून हवे होते त्याला अनेक कारणे होती. भारत आशियाच्या मध्यवर्ती होते, पुष्कळ सुपीक जमीन, खनिजांनी समृद्ध असलेल्या या देशातून जगभरात आयतनिर्यातीचा व्यापार जोरात चालणार होता.

चीनचा युरोपशी पूर्वापार व्यापार चालत आला होता.

तिथली चिनीमातीची भांडी,चहा, रेशीम व इतर गोष्टींची युरोपमध्ये जोरदार मागणी होती, या व्यापारात इंग्रजांना मोठे नुकसान होत होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी चीनला भारतातील अफू निर्यात करण्यास सुरुवात केली. या कामात त्यांना मदत करत होते पारसी दलाल.

भारतातील हिंदू समाज त्याकाळी मध्ययुगीन मानसिकतेने जखडलेला होता. समुद्र पार करू नये म्हणजेच सिंधू काहीसे विचित्र परंपरा त्यावेळी हिंदूं समाज पाळत होता.

त्यामुळे या व्यापारात पारशी व्यापाऱ्यांनी आघाडी घेतली.

१७९० या एका वर्षात भारतातून चीनला हजारो किलो अफू निर्यात झाले. इंग्रजांनी व पारशी लोकांनी करोडो रुपये कमावले. चीन मध्ये भारतीय अफूचे सेवन करून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले. दर चार पैकी 3 तरुण अफूग्रस्त होते. हे कमी व्हावे म्हणून  चीनच्या सम्राटाने अफू वर बंदी घातली.

यावरून ब्रिटिशांनी चीनशी अफूची युद्धे खेळली व त्यात विजय मिळवला. अफू वरची बंदी हटवली. या अफूच्या व्यापारात इंग्रजांनी व मुंबईच्या पारशी समाजाने करोडो रुपये कमावले.

मुंबईमध्ये जेवढ्या अफूच्या निर्यात करणाऱ्या संस्था होत्या त्यातील निम्म्याहून अधिक पारशी लोकांच्या होत्या.

टाटापासून ते जमशेदजी जिजिभोय यांच्या पर्यंत अनेक पारसी घराणी या उद्योगात होती.

बॉम्बे प्रेसिडेन्सीचे ब्रोकर हाऊस पूर्णपणे पारशी लोकच चालवीत होते. चीनबरोबर लाकूड, अफू, कापूस यांचा व्यापार पारशी लोकांनीच सुरू केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुतेक मालवाहू जहाज कंपन्यांचे मालक पारशीच होते.

फक्त बिझनेसच करत होते अस नाही तर त्यांनी इंग्रजी मधील उच्च शिक्षण घेतले, सरकारी नोकऱ्या पटकावल्या, डॉक्टर, वकील या अतिमहत्वाच्या व्यवसायात त्यांनी प्रवेश केला होता. यात देखील प्रचंड पैसे छापले.

मुंबईत अगदी कुत्रे मारायची कंपनी  उघडून त्यातूनही पैसे कमावले.

पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते.

हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.

मुंबई, पुणे येथे अनेक शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल याची उभारणी पारसी लोकांनी केली. फिरोजशहा मेहतासारखे अनेक पारसी मुंबईच्या राजकारणात व समाजकारणात सहभागी होते.

एकोणिसाव्या शतकात सुरू झालेले शेअर मार्केट, आधुनिक कारखाने, रेल्वे उद्योग, खाणकाम, बांधकाम आशा अनेक उद्योगात पारसी उद्योगपतींनी प्रवेश केला. सोराबजी, कामा, मोदी, वाडिया, जीजीभॉय, रेडीमनी, दादीशेठ, पेटिट, पटेल, मेहता, टाटा वगैरे पारशी उद्योजक घराण्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले.

आज एकविसाव्या शतकातही हे पारसी आपले व्यवसाय सचोटीने टिकवून आहेत. भले त्यांची संख्या कमी असली तरी भारताच्या कितीतरी टक्के व्यापार त्यांच्या हातात एकवटला आहे. नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे हा त्यांचा गुण त्यांच्या यशाचे प्रमुख रहस्य आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.