खरंच कर्नाटक जिंकणारा पक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत होतो का…?

 

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागलंय. येदियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सत्त्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड देऊन सत्तेत परतताना दिसतोय. बहुतांश एक्झिट पोलने दाखवलेलं त्रिशंकू विधानसभेचे अंदाज खोटे ठरवताना भाजप कर्नाटकमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थिस्थित पोहचल्याचं चित्र सध्या तरी तयार झालंय. या निकालाच्या निमित्ताने कर्नाटक निवडणूक निकालासंदर्भातील एक मजेदार पॅटर्न आम्हाला सापडलाय जो आम्ही ‘बोल भिडू’च्या वाचकांशी शेअर करतोय.

कर्नाटकच्या निवडणुका या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या १ वर्ष आधी होतात, त्यामुळेच कर्नाटक निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून बघितलं जातं. वास्तविक पाहता सेमीफायनलमध्ये पराभूत होणारा संघ हा फायनलच्या स्पर्धेतून बाद होत असतो. पण कर्नाटक निवडणुकांना जर लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल मानायचं ठरलं तर कर्नाटक विधानसभा निकाल काहीतरी वेगळंच सुचवतात. कर्नाटक विधानसभेच्या मागील निकालांवर नजर टाकली तर एक लक्षात येतं की, जो पक्ष कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जिंकतो तो पक्ष त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होतो, किंवा याच्याच उलट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत  पराभूत होणारा पक्ष लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकतो.

याआधीच्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका २०१३ साली झाल्या होत्या, त्यात काँग्रेसने कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपचा पराभव करत सत्ता हस्तगत केली होती आणि सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर लगेच २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला.

२००८ सालच्या निवडणुकात देखील हाच पॅटर्न बघायला मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत ११० जागा मिळवत सत्तेत आलेल्या भाजपला २००९ लोकसभा निवडणुकीत पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं. २००४ सालच्या निवडणुकीनंतर  भाजप सत्तेत येऊ शकला नसला तरी  ७९ जागांसह भाजप ही कर्नाटक विधानसभेमधील ‘सिंगल लार्गेस्ट पार्टी’ होती. म्हणजेच  एकाअर्थी कर्नाटक निवडणूक भाजपनेच जिंकली होती. पण त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाला होता आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार दिल्लीत स्थापन झालं होतं.

हीच गोष्ट १९९९ च्या निवडणूक निकालांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३२ जागा मिळवत काँग्रेसने कर्नाटकात सरकार स्थापन केलं आणि याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार केंद्रात स्थापन झालं.

या पॅटर्न बरोबरच अजून एक पॅटर्न कर्नाटक निवडणुकीसंदर्भात बघायला मिळतोय तो म्हणजे कर्नाटक विधानसभा जिंकणाऱ्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीत भलेही पराभव होत असेल परंतु विरोधी पक्षात बसण्यासाठी या पक्षाला सर्वाधिक कुमक कर्नाटकातूनच मिळते. म्हणजेच विरोधी पक्षात बसण्यासाठी या पक्षाला कर्नाटक देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक खासदार निवडून देतं. २०१४ साली काँग्रेसचा देशभरात दारूण पराभव झाला असला तरी त्यांची कर्नाटकातील कामगिरी तुलनेने चांगली होती. काँग्रेसच्या एकूण ४४ खासदारांपैकी ९ खासदार हे कर्नाटकातून निवडून आले होते. हीच परिस्थिती यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील राहिलेली आहे. २००९,२००४, १९९९ या तिन्ही सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षात बसलेल्या भाजप आणि काँग्रेसच्या पदरात  कर्नाटकाने देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक जागांचं दान टाकलं होतं…!!!

Leave A Reply

Your email address will not be published.