काठ्यांचा वर्षाव झाला तरीही ते मागे हटले नाहीत. पर्वतीचे मंदिर दलितांना खुलं केलंच..

हिंदू धर्म हा प्राणी मात्रावर दया करावी, सर्व माणसं ही ईश्वरांची लेकरे अशी शिकवण देतो. परंतु याच हिंदू धर्मात देवाची पूजा करणासाठी देखील बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी एकेकाळी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती.

मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतीलही प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली.

म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी वेळोवेळी सत्याग्रह केला.

हा संघर्ष समानतेचा होता. हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता.

२६ जून १९२७. अमरावती येथील प्राचीन ‘अंबादेवी मंदिरात’ अस्पृश्यांना प्रवेश मिळावा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह चालू झाला. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.

अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते.

हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम. एम. जोशी, ना. ग. गोरे, र. के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला.

परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्र्स्टने अर्ज फेटाळला.

यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) काका गाडगीळ, विनायक भुस्कुटे, वाणी साठे, केशवराव जेधे हे होते. तसेच न. चि. केळकर, आप्पासाहेब भोपटकर म. माटे यांची मंदिर प्रवेशाला अनुकूलता होती. मात्र त्यासाठी सत्याग्रह करण्याची गरज नाही असे वाटत होते. आणि त्यातुनच सत्याग्रह मंडळाचे सदस्य ढोंगी असल्याची टिका आंबेडकरांनी केली.

९ ऑक्टोंबर १९२९ला अस्पृश्यांचे पुढारी शिवराम कांबळे, पांडूरंग नाथूजी राजभोज आणि युवक संघाचे अध्यक्ष न. वि. गाडगीळ या तीन जणांचे एक शिष्टमंडळ पुण्याच्या तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. १३ ऑक्टोंबर १९२९ ला दसरा असल्याने पर्वती देवायलात जाणार असल्याचे त्यांनी कलेक्टरना सांगितले.

रविवारी १३ ऑक्टोंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर सत्याग्रह सुरु झाला. त्यादिवशी सत्याग्रही सकाळी सात वाजण्याच्या आधीच पर्वतीच्या टेकडीकडे निघाले होते. श्रावण महिन्यातील सोमवारी जेवढी गर्दी नसते तेवढी गर्दी त्यादिवशी होती. साडे आठ – नऊ पर्यंत सर्व सत्याग्रही मंडळी जमण्यास सुरुवात झाली. त्याच सुमारास अस्पृश्य समाजातील काही स्त्रीया भजनी दिंडी बरोबर येवून पोहचल्या.

सत्याग्रही मंडळी दगडी पायऱ्यांचा बहुतेक भाग चढून अगदी शेवटच्या वळणाजवळ आले. तिथे मात्र सनातन्याचा विरोध फारच वाढल्यामुळे तिथून बाहेर पडण अशक्य झालं. यात शिवराम कांबळे, काका गाडगीळ, स्वामी योगानंद इत्यादी कार्यकर्ते मिळून २५० स्त्री-पुरुष सत्याग्रहात सहभागी होते.

मात्र याच वादात सत्याग्रहींना मारहाण झाली.

सवर्णांनी सत्याग्रहींवर शिव्या व काठ्यांचा वर्षाव केला. व सत्याग्रहींना मंदिरात जावू दिले नाही.

सर्वांना पोलिस बंदोबस्तामध्ये खाली आणण्यात आले. पुढे १८ ऑक्टोंबरला शेट जमनालाल बजाज यांचे सेक्रेटरी आनंद स्वामी यांनी रुग्णालयात जावून सत्याग्रहींची भेट घेतली आणि वाटाघाटी करुन काही दिवसातच मंदिर अस्पृशांना खुले केले गेले.

या सर्वांनी १३ ऑक्टोंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर सत्याग्रहास सुरुवात करुन सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी केलेला हा एक क्रांतिकारी प्रयत्न इतिहासात चिरकाळ राहिलं. शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेकांनी यासाठी काट्या कुऱ्हाडी खाल्ल्या.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.