परवीन बाबी डॅनीला म्हणाली, ‘ आत नको येऊस. तू अमिताभ बच्चनचा एजेंट आहेस !

एक मुलगा लहानपणी आर्मी मध्ये जाऊन देशसेवा करण्याची स्वप्ने पाहायचा. कुणी जर विचारलं, की तुला मोठेपणी काय बनायचं ? तर त्याच्या तोंडून आपोआप निघायचं, सैनिक. त्याच्या घरच्यांना मात्र त्याला सैनिक होऊ दयायची इच्छा नव्हती. खासकरून आई सैनिक होण्याच्या जास्त विरोधात होती.

त्याचं लहानपणी सैनिकाच्या स्वप्नाचं घरच्यांना फार काही वाटलं नाही. कारण लहानपणी फारतर मुलांची स्वप्ने अस्थिर असतात. सतत बदलतात. पण तो मुलगा हट्टी होता. त्यानं मनाचा निश्चय करून ठरवलं होतं की मी बनेन तर सैनिकच.

याचं निश्चयाच्या ठाम प्रतिज्ञेने तो लहानाचा मोठा झाला. मोठं झाल्यावर ही त्यानं सैनिक बनणार, हे घरी कळवल्यावर सगळ्यांचीच धांदल उडाली.

कारण त्याने शाळेत एनसीसी जॉईन केली होती. त्यात त्याला पदक ही मिळालेलं होतं. पण तरीही त्याच्या आईने त्याला शपथ घालून सैनिक सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याची गळ घातली. पण दुसरीकडे नेमकं कुठं जाणार ? तेव्हा आईने त्याला कलाक्षेत्रात जा, खूप संधी उपलब्ध होतील. कारण आई घाबरत होती.

आर्मीत मुलाला काही झालं तर ? याचं एकमेव भीतीने तिनं आर्मीत जायला नकार दिला.

आईचा शब्द कुणाला टाळता येतो ? तसा त्यानं आईच्या शब्दाचा मान राखून कलेकडे मोर्चा वळवला. इकडून तिकडून माहिती गोळा करू लागला. तेव्हा तो चित्रपट इंडस्ट्रीकडे जास्त वळला. त्यात अभिनयाची वाट त्याला सापडली. कारण तो लहानपणीपासून जिगरबाज, बिनधास्त कलावंत गडी होता. फरक एवढाच की त्यानं तेव्हा इकडं काहीच लक्ष दिलं नाही.

हळूहळू अभिनय क्षेत्राची त्याला आवड लागली.

आवडीतुन सवड काढली आणि त्याने पुण्याच्या भारत सरकार संचलित फिल्म आणि टेलिव्हिजन या कॉलेजात अर्ज भरला. परीक्षा पासु होऊन त्याने एफटीआयआय या संस्थेतून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. मुंबईत आला. नशीब आजमावलं आणि साऱ्या देशभरात एक लेखक, दिग्दर्शक, आणि अभिनेता म्हणून ‘ डॅनी डेंजोनग्पा ’ प्रचंड लोकप्रिय झाला.

ठराविक साच्यात अडकलेल्या व्हिलनच्या भूमिकेला योग्य न्याय देऊन कायापालट करणारा हाच तो अभिनेता डॅनी.

मुंबईत आल्यावर त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. त्यात एक अडचण तर इथं चालत असलेल्या कॉपी पेस्ट कामाची होती. म्हणजे काय ? तर जेव्हा शोले रिलीज झाला तेव्हा त्यातील एक ना एक पात्र गाजलं. डाकू गब्बरसिंग तर व्हिलन असून हिरोपेक्षा लोकप्रिय झाला. अश्यात आपल्या भारतीय सिनेमाचं एक दुर्दैव्य असं आहे की एक चित्रपट सुपर डुपर हिट झाला की मग त्याच्यानंतर कॉपी पेस्ट सिनेमांची, त्यातील पात्रांची रांग लागते.

शोले नंतर ही तसेच झालं. डॅनीला जी फिल्म ऑफर होईल त्यात डुप्लीकेट शोले असायचा.

यालाच कंटाळून त्याने काही दिवस दूर जायचा निर्णय घेतला. डॅनी काही दिवसांसाठी मुंबई बाहेर ट्रेकिंग ला गेला. पण तिथून माघारी मात्र तो एक नवा सिनेमा लिहून आला. एन सिप्पी यांनी निर्माता म्हणून तर डॅनी ने दिग्दर्शकाची भूमिका सांभाळली. १९८० साली रिलीज झालेल्या त्या हॉरर चित्रपटाचं नाव होतं ‘ फिर वही रात ’.. जो चित्रपट पाच भारतीय हॉरर सिनेमा म्हणून पाहिलं जातं.

डॅनी ने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि गायक अशी चौरंगी भूमिका बजावलेली आहे.

त्यानं इंटरनॅशनल मध्येही काही चित्रपटात काम केलेलं आहे. त्यात ‘ सेवन इयर्स इन तिबेट, हा एक गाजलेला सिनेमा आहे. त्यानं हिंदी चित्रपट सृष्टीच्या जुन्या व्हिलन ची चौकट मोडून एक नवी चौकट उभी केलेली आहे. ३६ घंटे, बंदिश, जियो और जिने दो, धर्म और कानून, अग्निपथ सारख्या १९० पेक्षा जास्त चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलं आहे.

२२ फेब्रुवारी १९४८ मध्ये सिक्कीम मधील गंगटोक गावात जन्मलेल्या डॅनीला २००३ ला पद्मश्री पुरस्काराने ही सन्मानित केलेलं आहे. त्याचं बरोबर दोन वेळा सहायक भूमिकेसाठी फिल्मफेयर मिळालेला आहे.

कलाकार म्हणून हिट असणारा डॅनी प्रेमाच्या बाबतीत सुद्धा एकदम फीट होता. त्याचं आणि परवीन बाबीचं प्रेम प्रकरण त्याकाळी इंडस्ट्री आणि प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला होता. परवीन बाबी ही भारताची पहिली अभिनेत्री आहे की जिच्या फोटोला ‘ टाईम मॅगझीन ’ मध्ये कव्हरवर जागा मिळाली होती.

ती त्याकाळची चित्रपटासाठी सर्वात जास्त पैसे घेणारी अभिनेत्री सुद्धा होती.

इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री परवीन बाबी सोबत डॅनीचं प्रेम प्रकरण चाललं होतं. हे त्या दोघांनीही कधीच लपवून ठेवलं नाही. आजही कधी डॅनीला परवीन बाबी प्रेम प्रकरणाबाबत विचारलं तर तो सांगतो की ‘ ती एक उत्तम स्वभावाची अभिनेत्री मानतो ’ असं त्यांचं जगजाहीर प्रेम होतं. जे चार वर्षं चाललं.

दरम्यानच्या काळात एक दिवस डॅनी त्याच्या व्यस्त शूटिंग मधून वेळ काढून अचानक परवीन बाबीच्या घरी गेला.

तिथं टेबलवर असलेला शंख वाजवून झोपेत असेलल्या बाबीला मजेत उठवायचा त्याने प्रयत्न केला. पण परवीन बाबी दचकून, घाबरून जागी झाली. हे पाहून डॅनीच्या लक्षात आलं की परवीनचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाहीये. तिला भीती वाटल्यासारखं वाटत होतं.

त्याला कारण असं होतं मानसिक अस्वस्थ असतानाच्या काळात परवीन ने अमिताभ बच्चनची एका मॅगझीन ला दिलेली मुलाखत वाचली होती. त्यात असं लिहिलं होतं की

‘ डॅनी आणि मी म्हणजे अमिताभ बच्चन खूप चांगले जवळचे मित्र आहोत ’

हे वाचून तिच्या मनाला अस्वस्थतेचा जसा की शॉकचं लागला होता.

तिने अमिताभ बच्चन सोबत अनेक चित्रपट केलेले आहेत.

त्यामध्ये दिवार, मजबूर, नमक हलाल, अमर अकबर अँथनी, असे अनेक चित्रपट आहेत. पडद्यावर हिरो हिरोईन यांचं प्रेम प्रकरण पाहिलं की बाहेर सुद्धा यांचं काहीतरी आहे, असा समज – गैरसमज करून अनेक छोटया मोठ्या मॅगझीनला लोकं लिहितात.

अमिताभ परवीन बाबतही लिहून यायला लागलं.

त्यांचं एकमेकांसोबत प्रेमाचं रिलेशन चालू आहे, अश्या प्रकारे गॉसिप होऊ लागलं. परवीन बाबीने या गोष्टीला कधीच दुजोरा दिला नाही. याउलट तिने ‘ अमिताब बच्चन मला मारणार आहे. मला त्याच्याकडून भीती आहे..’ अश्या प्रकारे अनेक आरोप केले होते.

या सगळ्यामुळे ती आधीच अस्वस्थ होती, त्यात तिने डॅनीला पाहिल्यावर अजूनच भीती वाटली. डॅनी तिला समजून सांगायला पुढे झाला, तर तिने किंकाळी फोडली की

‘ जवळ येऊ नकोस. तू अमिताभ बच्चनचा एजेंटयेस !..’ 

तेव्हापासून दोघेही सगळं काही विसरून आपापल्या वाटेनं निघाले.

  • कृष्णा वाळके

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.