माफी मागण्याचा देखील सण असतोय तो म्हणजे जैनांचा “पर्युषण पर्व”

आज लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे,  त्या बरोबरच आज जैन धर्मियांचा देखील सर्वात मोठा उत्सव आहे, संवत्सरी पर्व किंवा पर्युषण पर्व. जैन समाज देशांतील प्रत्येक राज्यांत असणारा समाज आहे. अल्पसंख्याक समाज जरी असला तरी शांतता प्रिय समाज म्हणून जैन समाजाची खास ओळख आहे.

व्यापारी समाज म्हणजे जैन समाज अशी देखील त्यांची ओळख आहे.

पण या बरोबरच जैन समाजाची एक खास ओळख देखील आहे, ती म्हणजे त्यांच्या खास पर्युषण पर्व यासाठी. पर्युषण पर्व म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हणजेच माफी मागण्याचा दिवस,आता तुम्ही विचाराल भिडू माफी मागण्याचा कोणता सण असतो का? तर त्यांचे उत्तर असे आहे, आपल्या भारताला इतकी प्राचीन संस्कृती लाभलेली आहे की त्यामध्ये समोरच्याची माफी मागणे याला देखील अतिशय महत्व आहे.

वर्षभरात आपण केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठी देखील काही खास सण असतात. त्यातला एक म्हणजे जैन धर्मातील पर्युषण पर्व होय. पर्युषण पर्व हा जगभरातील संपूर्ण जैन समाजासाठी सर्व सणांचा राजा आहे. अशा प्रकारे, याला पर्व धीरज म्हणूनही ओळखले जाते.

“मिच्छा् मी दुक्कडं” हि प्रथा या पर्युषण पर्वाची मुख्य प्रक्रिया असते. त्याचा अर्थ म्हणजे, वर्षभर आपल्याकडून कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी पर्युषण पर्वाच्या अंतिम दिवशी म्हणजे, संवत्सरीला मागितली जाते. त्यालाच  “मिच्छा् मी दुक्कडं” असे म्हणतात.

जैन समाजात तर याला एका उत्सवाचे स्वरूप देण्यात आले आहे. वर्षभर आपल्याकडून ज्या काही चुका होतात, त्यांचा लेखा- जोखा या संवत्सरी पर्वामध्ये मांडला जातो.

भगवान महावीर यांच्यासह इतर सर्व जैन तीर्थंकर यांनी सत्य,अहिंसा आणि क्षमा यांचे विशेष महत्व सांगितले आहे. जैन समाज या तत्वावर चालतो.जैन समाज आठ दिवस चालणारे संवत्सरी पर्व किंवा पर्युषण पर्व हा सण म्हणून साजरा करतात.

आषाढ शुक्ल चतुर्दशीला जैन धर्मातील चातुर्मास सुरू होतो. या चार महिन्यांत जैन बांधव तप-साधना करतात. या कालावधी दरम्यानच भाद्रपद महिन्यात संवत्सरी पर्व साजरे केले जाते. जैन धर्मामध्ये मुख्य दोन पंथ येतात, श्वेतांबर आणि दिगंबर पण या दोन्ही पंथामध्ये संवत्सरी पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.

कळत- नकळत वर्षभर मानवांकडून असंख्य चुका झालेल्या असतात, अनेकांना आपण दुखावलेले असते, अनेक जीवांची आपल्याकडून हत्या झालेली असते.या सर्व चुकांची पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे संवत्सरीच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागितली जाते.

पर्युषण पर्वाच्या काळात जैन बांधव, सर्व कंद-मूळ, पालेभाजी यासह अनेक गोष्टीचा त्याग करतात.चोहीयार म्हणजेच सायंकाळ होण्या अगोदर भोजन घेतात. या बरोबरच अनेक जैन बांधव पाणी देखील न घेता कडक उपवास करतात.जैन मंदिर, जैन स्थानक यामध्ये गुरु महाराज यांचे प्रवचन , धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.

पर्युषण पर्व काळात मन, वचन, काया, यांची संपूर्णपणे शुद्धी केली जाते. साधनेद्वारे समस्त जीवांची माफी मागितली जाते. आत्मा शुद्धी हा पर्युषण पर्व यामागील मूळ उद्देश आहे. संवत्सरीच्या दिवशी जैन समाजातील लहान बालकांपासून ते मोठ्या पर्यत सर्व निर्जळी व्रत करतात, स्थानक, मंदिर येथे आलोयना वाचन करतात आणि त्या नंतर ”मिच्छा् मी दुक्कडं” म्हणजेच मी समस्त जीवांची माफी असे म्हणतात.

सायंकाळी जैन बांधव त्यांच्या धार्मिक स्थळी एकत्र येऊन प्रतिक्रमन करतात, यामध्ये ८४ लाख प्राणिमात्रांची क्षमायाचना केली जाते.

भगवान महावीर यांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सुत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे, पर्युषण पर्व सर्वांना काळात या सर्वांचा अंगीकार केला जातो. क्षमा मागणे आणि समोरच्या व्यक्तीला माफ करणे या दोन फार मोठ्या गोष्टी आहेत. जर मनुष्याला या दोन गोष्टी जमल्या तर मानवी जीवन अधिक सुखकर बनते.

त्यामुळे आज भारतासह अनेक देशांमध्ये संवत्सरी पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते, कारण या दिवशी मनुष्य वर्षभर कळत- नकळत झालेल्या चुकांची माफी मागतो, जेव्हा मनुष्य माफी मागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मशुद्धी झालेली असते.

जैन संवत्सरी पर्व याविषयी सर्वसामान्य नागरिक यांच्या मनात अनेक समज- गैरसमज देखील आहेत. अनेकदा यावर काही वाद देखील होतात, पण अपूर्ण माहितीमुळे आपण या गोष्टी घडतात. पर्युषण पर्व हा प्रत्येकाने साजरा करायला हवा, कारण त्यामुळे बिघडलेली कित्येक नाती पुन्हा जुळून येऊ शकतात. दुखावलेली कित्येक मने पुन्हा एकत्र येऊ शकतात, त्यामुळे हा कोणत्या ही एका जाती-धर्मा पुरता मर्यादित राहणारा सण न होता तो समस्त जगासाठी तो क्षमापणा दिन ठरावा. ज्यामुळे शेकडो अवघड वाटणारे प्रश्न सुटतील.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.