‘पाताल लोक’ मधल्या अन्सारीला जमलं नाही पण खऱ्या आयुष्यातला हा कॉन्स्टेबल आता ACP झाला.
तुम्ही मागच्या वर्षी आलेली पाताल लोक सिरीज पाहिली असेलच ?
त्यातला इम्रान अन्सारी आठवतोय का ? हाथीराम चा सहकारी.
त्याच्या मुस्लीम असल्यामुळे त्याला वेगळी वागणूक दिली तरी अत्यंत संयमी, शांत जो गुन्हेगारांकडून कबुली घेतानासुद्धा तो “लाथापेक्षा बातावर विश्वास ठेवणारा”, चांगली इंग्रजी बोलणारा, प्रामाणिक अन्सारी UPSC ची तयारी करायचा. UPSC परीक्षा देऊन त्याला क्लास वन ऑफिसर बनायचं असतं, तो प्री आणि मेन्स क्लिअर करतोही पण इंटरव्हिव्ह बाकी असतो, असो पाताल लोकचा जर दुसरा सिझन आलाच तर त्यात त्याला मोठा ऑफिसर झाल्याचे दाखवतीलही,
परंतु आज आम्ही तुम्हाला रिअल लाइफ मधल्या एका अशा पोलीस शिपाई ची स्टोरी सांगणार आहोत ज्याची स्टोरी अन्सारीच्या स्टोरीशी मिळतीजुळती आहे.
दिल्ली पोलीस मध्ये पीसीआर यूनिट वर कार्यरत असणारा शिपाई फिरोज आलम हा २०१० मध्ये दिल्ली पोलीस सेवेत कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होता. या १० वर्षाच्या काळात या भावाने नोकरी प्रामाणिकपणे पूर्ण केली आणि सोडली ३१ मार्च २०२१ हा त्याचा शिपाई म्हणून शेवटचा दिवस होता.
आणि पुन्हा त्याच पोलीस यंत्रणेत रुजू झाला परंतु या वेळेस शिपाईचा युनिफोर्म घालून नाही तर खांद्यावर स्टार असलेली युनिफोर्म घालून.
ठाण्यातले इतर लोकं त्याला इतके दिवस अरेतुरे म्हणून हाक मारायचे ते आता सर म्हणून अदबीने सॅल्यूट ठोकतात.
आणि ज्यांना फिरोज सर म्हणून हाक मारायचा आज तो बरोबरीने अगदी थाटाने उभा असतो.
कोण आहेत हे फिरोज आलम ?
फिरोज हे मुळचे उत्तर प्रदेशमधील हापुड़ जिल्ह्यातील आजमपुरमधील दहपा गावातले आहेत. पाच भाऊ, तीन बहिणी आणि आई-वडील असं एकंदरीत कुटुंब असलेल्या फिरोज चे वडील भंगाराचा व्यवसाय करायचे. त्यांनी जवळच्याच पिलखुवाच्या मारवाह कॉलेज मधून १२वी पूर्ण केली. आणि त्यावर ते दिल्ली पोलीस मध्ये भरती झाले. आणि त्यादरम्यान त्यांनी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
पोलिस युनिफोर्म चे वेड त्यांना लहानपणापासूनच होते. त्यासाठी ते कष्टही घेत होतेच, २०१४ साली त्यांनी UPSC चा अभ्यास चालू केला.
दिल्ली पोलीस मध्ये शिपाई म्हणून कार्यरत असतांना त्यांना तेथील पोलीस उच्च अधिकाऱ्यांचा थाट, रुबाब पाहून त्यांच्याही मनात ऑफिसर बनण्याची इच्छा आणखीनच दृढ होत गेली.
दिल्ली पोलीस मध्ये कार्यरत असतांना कामासोबतच ते अभ्यासालाही ते वेळ द्यायचे.
सुरुवातीच्या दोन अटेंप्टमध्ये ते प्री देखील पास होऊ शकले नाही. त्यानंतर सलग तीन अटेंप्ट मध्ये प्री पास झाली परंतु मेन्स पर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्या दरम्यान त्यांच्या कानावर एक सकारात्मक बातमी अशी आली कि, राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्याच्या नवलगढ़ तालुक्याचे कांस्टेबल विजय सिंह गुजर यूपीएससी ची परीक्षा पास करून आईपीएस कैडरमध्ये पोहचले होते.
या बातमीपासून फिरोज यांनी प्रेरणा घेतली,आणि पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागले आणि शेवटी २०१९ त्यांच्या ६व्या अटेंप्टला ते यशस्वी झाले. ६४५ वा रँक पटकावला.
कॉन्स्टेबल ते आयपीएस फिरोज…
कॉन्स्टेबल ते एसीपी असा तगडा प्रवास असलेले फिरोज त्यांचे १० ,१२ वी चे मार्क्स हि तितक्याच प्रामाणिकपणे जाहीरपणे सांगतात. १० मध्ये ५१%, १२ वी मध्ये ५८% असे साधारण गुण मिळवलेले फिरोज यांना दिल्ली मध्ये पोलीस सेवेत अगदी शिपाई म्हणून दाखल होणे हे खरेच मोठ्या कौतुकाची गोष्ट होती. त्यानंतर ही नोकरी सांभाळत देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणली जाते अशी यूपीएससी पास करून आयपीएस बनणे म्हणजे असामान्य असे यश म्हणावे लागेल.
बरं फिरोज इतर सिलेक्ट झालेल्या ‘सेलेब्रेटी’ ऑफिसर्स सारखे मोटिवेशनल भाषणं देत फिरत नाहीत एक वेगळाच उपक्रम ते राबवत आहेत.
तर तो उपक्रम म्हणजे, दिल्ली पुलिस यूपीएससी फॅमिली नावाने ग्रुप सुरु केला ज्याद्वारे फिरोज दिल्ली पोलीसमधील इतर कॉन्स्टेबल्सना जे यूपीएससी देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना मदत करत आहेत. यात तब्बल ५८ कॉन्स्टेबल आहेत जे यूपीएससीची तयारी करीत आहेत आणि यांना फिरोज मार्गदर्शन करत आहेत. त्यातल्या काहींनी यूपीएससीची पूर्व परीक्षा पास केली आहे ते पुढील तयारीलाही लागले आहेत. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि नोट्स वेगैरे साठी फिरोज नेहेमीच तत्पर असतात.
फिरोज माध्यमांनाही प्रतिक्रिया देतांना अगदी विनम्रतेने म्हणतात कि,
माझ्यासारखा साधारण माणूस अभ्यास करून हे यश मिळवू शकतो तर तुम्ही का नाही ?
हे ही वाच भिडू,
- हे पण UPSC ASPIRANT होते. पण अधिकारी बनायची संधी सोडून वेगळ्या क्षेत्रात नाव गाजवलं..
- पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !
- पोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर बुलेट