पतंगराव म्हणाले, “चमचाभर पाणी काढलं तर समुद्र आटत नाही !”

निसर्गाचा प्रकोप हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर्षी कोरोना साथीने छळले आणि पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून काढले. महाआघाडी सरकारने मदत जाहीर केली मात्र सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आणि या मदतीमध्ये अडथळा आला.

सध्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवरर यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भातून पत्र पाठवलेले आहे, लवकरच मदत वाटपाची परवानगी मिळेल असा आशावाद व्यक्त केला जातोय. पण शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का प्रश्न अजूनही अधांतरी आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात मात्र असे काही नेते होऊन गेले ज्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नियम अटी वाकवल्या प्रसंगी मोडूनही टाकल्या पण संकटग्रस्तांना आधार मिळवून दिला.

यात प्रमुख नाव येते स्व. पतंगराव कदम यांचे.

पतंगराव कदम हे स्वतः सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातल्या शेतकरी कुटुंबातुन आलेले नेते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची, त्यांच्या हलाखीची जाणीव त्यांना होती. अस्मानी आणि सुलतानी संकट आल्यावर शेतकरी कुटुंबे देशोधडीला लागतात हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं.

नियम आणि कायदे करणारे, त्याची अंमल बजावणी करणारे शहरी वातावरणात वाढलेले असतात, त्यांना शेतकऱ्यांचे दुःखाची दाहकता माहिती नसते याचा त्यांना अनुभव होता. यामुळेच शक्य तिथे यातून मार्ग काढायसाठी त्यांची धडाडीने निर्णयक्षमता कमी यायची.

गोष्ट आहे मार्च २०१४ ची. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस व अभूतपूर्व गारपीट झाली.

त्यामध्ये मोठे नुकसान झाले. पिके जमीनदोस्त झाली. घरा-दारांचे नुकसान झाले. पशु-पक्ष्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. जनावारानाही गारपिटीचा फटका बसला. रब्बी पिकांचा हंगाम नस्तानाबूत झाला.

गहू, हरबरा, कांदा, मका, करडई पीकच शिल्लक राहिले नाही. झाडांची पानेही गारपिटीने झडून माळरान निष्पर्ण झाले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तोंडी आलेला घास अचानक आलेल्या आपत्तीने हिरावून नेला. जनावारांना चारा राहीला नाही.

तेव्हा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तालुक्याच्या पाहणीसाठी येण्याची विनंती केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुर्नवसनखात्याचे मंत्री पतंगराव कदम व इतर अनेक बडे नेते सिल्लोड तालुक्याच्या पाहणीला आले.

“अवकाळी पाऊस, वादळी गारपिटीने आम्हाला रस्त्यावर आणलं. या संकटाने आमचं होत्याचं नव्हतं झालं. डौलानं डोलणारी आमची पिकं डोळ्यादेखत वाहून झाली. जनावारांना चारा नाही. रानोमाळ उजाड झाली. हाताला काम नाही. आता काय करावे अन् जीवन कसे जगावे. तुम्हीच आता या संकटातुन आम्हाला बाहेर काढा”

असे साकडे सिल्लोड तालुक्यातील गारपीटग्रस्तांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घातले. शेतकरी, शेतमजूर, महिला यांच्या व्यथा ऐकून सर्व नेते थरारून गेले होते. लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या आणि आचारसंहितेचा अडथला होता.  प्रसंगी राज्य शासन कर्ज काढण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकर्‍यांशी बोलताना स्पष्ट केले.

त्यावेळी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे पतंगराव कदमांना तेथील खंडाळा या गावी घेऊन गेले. त्यावेळी त्यांच्या सोबत पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचे सचिव झालेले प्रविणसिंह परदेशी देखील होते.

खंडाळा गावात गारपीटीमुळे सर्वाधिक नुकसान झाले होते. पतंगराव कदमांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. जेव्हा मदत जाहीर करण्याचा विषय आला तेव्हा काही अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमावर बोट ठेवून का-कुं करू लागले. अडचणी चा पाढा वाचला. पतंगराव कदमांना राग आला. ते म्हणाले,

“मला नियम सांगू नका. शेतकरी अडचणीत आहे. त्याला मदतीची गरज आहे. चमचा भर पाण्याने समुद्र आटत नाही. आजच्या आज जीआर काढा. सह्या मी नंतर करेन. “

शेतकऱ्याच्या बांधावर चालता चालता त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला. ४२ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

आमदार अब्दुल सत्तार सांगतात, वेळप्रसंगी नियम बाजूला ठेवून मदत करण्याची आणि चालता बोलता निर्णय घेण्याची पतंगराव कदम यांची कार्यपद्धती होती. त्यांच्यामुळेच सिल्लोड तालुक्याला अवघ्या २४ तासात मदत पोहचवण्यात आली.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.