अर्थमंत्र्यांकडून मध्यरात्री सही आणली आणि प्रत्येक तालुक्यात ITI उभारण्याचा निर्णय पास केला

देशाच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक म्हणजे मंत्रालयाच्या इमारतीमध्ये बंद ऑफिसच्या आड बसून मोठमोठ्या चर्चा करणारे, बघू नियमात बसत का ? फाईल द्या, सचिवांकडे निरोप द्या म्हणणारे ड्रॉईंग रूम पॉलिटिशन  आणि दुसरे म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथं निर्णय घेणारे, नियमात बसत नसेल तर नियम वाकवणारे, तळागाळाची जाण असणारे लोकनेते.

पतंगराव दुसऱ्या प्रकारात मोडायचे. त्यांची भाषा रांगडी होती. त्यांचा कामाचा झपाटा कित्येकांना न झेपणारा होता. ते मुख्यमंत्रीपदापर्यंत कधी पोहचले नाहीत पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हि उपाधी कधी कोणी काढून घेऊ शकलं नाही.

 पतंगरावांनी अनेक क्षेत्रात काम करून आपला ठसा उमटवला. मात्र शिक्षण क्षेत्र हि त्यांची हळवी बाजू होती. 

‘माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिला. पुण्यात आलो आणि जेथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो, अशा सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली,’

डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना हमखास अशीच सुरुवात करीत. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना कदम यांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले.

सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पापीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक.

त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली.

१९६१ मध्ये ते पुण्यात आले. ‘रयत’च्याच एका हायस्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी ‘१९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या’ या विषयावर डॉक्टरेट मिळविली. केवळ विशीत असताना त्यांनी १९६४ मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली.

आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. 

हे सगळं सुरु असताना राजकारणातही आपले पाय घट्ट केले. यशवंतराव मोहिते, शंकरराव मोरे या नेत्यांच्या मदतीने त्यांनी समाजकारणात पाऊल टाकले. आपल्या हरहुन्नरी कार्यक्षमतेमुळे एसटी महामंडळापासून ते मंत्रिपदापर्यंत वेगाने पोहचले. मात्र या प्रवासात तळागाळाशी असलेली नाळ तुटू दिली नाही.

पतंगराव शाळेत असताना त्यांना गावात शाळा नाही म्हणून दररोज केलेला ५-६ किलोमीटरचा प्रवास ते कधी विसरू शकले नाहीत. आपण इथं पर्यंत पोहचलो ते शिक्षणामुळे आणि हेच शिक्षण ग्रामीण भागातील मुलामुलींना मिळालं कि त्यांचंही आयुष्य बदलून जाईल याची त्यांना खात्री होती.

स्वतःचे शैक्षणिक साम्राज्य असूनही ग्रामीण भागातील मुलांना स्वस्त व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सरकारी शिक्षण संस्था उभारल्या गेल्या पाहिजेत यासाठी ते आग्रही होते. विशेषतः रोजगाराच्या संधी मिळवून देणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन सारख्या संस्थांची गरज तालुका पातळीवर आहे असं त्यांचं मत होतं.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असावेत. पतंगराव कदम राज्याचे शिक्षण मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात आयटीआय उभं करायचं मनावर घेतलं. यामुळे रोजगार निर्मिती तर होणार होतीच पण नव्याने उभे राहत असलेल्या औद्योगिक कारखान्यांना कुशल हात मिळणार होते.

पतंगराव कदमांचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे होते. प्रचंड मोठ्या निधीची आवश्यकता लागणार होती. अनेकांनी हि योजना ऐकल्यावर त्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला.

लोक म्हणायचे,

तुमचा भारती विद्यापीठाचा भलामोठा पसारा आहे, त्याच्या फायद्याचं बघा. हे कुठं शासकीय आयटीआयच्या मागं लागत बसलाय.

पण पतंगराव कदम मागे हटणाऱ्यातले नव्हते. त्यांनी जिद्दीने पाठपुरावा सुरु केला. अगदी मंत्रालयातल्या क्लार्क पासून वरच्या लेव्हल पर्यंत फिरणारी फाईल कशी मार्गावर आणायची याचा त्यांना अनुभव होता. आयटीआयच्या मार्गातले सगळे खडे त्यांनी स्वतः लक्ष घालून बाजूला केले.

आता शेवटचा अडथळा राहिला होता तो म्हणजे राज्याचे अर्थमंत्री.

निधी उपलब्ध करायचा तर अर्थमंत्र्यांची सही पाहिजे. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. त्याच्या आधी काहीही करून ही सही होणे महत्वाचं होतं.

पण त्याकाळी अर्थमंत्री होते रामराव आदिक. ते राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वात जेष्ठ नेते होते. गेली पन्नासभर वर्ष त्यांनी राज्यच राजकारण जवळून बघितलं होतं. ते गाजलेले कायदेपंडित होते. प्रत्येक गोष्टीच्या खाचाखोचा याची त्यांना जाणीव होती. पतंगरावांना वाटत होत कि आदिक आपल्या प्रस्तावाला मान्यता देणार नाहीत. पण प्रयत्न करायचं सोडायच नाही म्हणत ते आदिकांच्या पाठी लागले.

त्या दिवशी योगायोग म्हणजे रामराव आदिक पतंगरावाना भेटतच नव्हते. काही ना काही कारणामुळे त्यांची भेट चुकत होती. पतंगराव देखील हट्टी स्वभावाचे होते. त्यांनी पाठपुरावा थांबवला नाही. अखेर रात्री ११ वाजता त्यांची भेट झाली. पतंगरावांनी आपला प्रस्ताव ग्रामीण भागातील गोरगरीब वंचीत मुलामुलींना रोजगार मिळवून देण्यासाठी कसा महत्वाचा आहे हे पटवून दिलं.

अखेर रामराव आदिकांनी मध्यरात्री १२ वाजता पतंगराव कदमांच्या प्रस्तावावर सही केली.

महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात आयटीआय उभे करण्यासाठी तब्बल २५० कोटींचा निधी मंजूर झाला. 

आज राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व 4४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.

हे सोडून ५००च्या वर खाजगी आयटीआय संस्था देखील आहेत. या सगळ्या संस्थांमधून दरवर्षी लाखो आयटीआय तरुण शिकून बाहेर पडतात. काहीजण पुढे इंजिनियरिंग देखील करतात. बरेच जण एमआयडीसी व इतर ठिकाणी नोकरी करत आहेत, अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केलाय. लाखो मराठी हातांना काम मिळल हे सगळं झालं पतंगराव कदम या एका जिद्दी माणसाने पाहिलेल्या स्वप्नामुळं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.