लावणीसम्राट पठ्ठे बापूराव आणि पवळाबाई यांच्यावर स्वतःचा लिलाव करायची पाळी आली होती.

महाराष्ट्राची लोकधारा लोककला खऱ्या अर्थाने जपायची झाली तर त्यात तमाशा आलाच पाहिजे. हेच खरे महाराष्ट्राचे वैभव म्हणावे लागेल. लावणी ही केवळ मनोरंजनाची बाब नसून लावणीने समाज प्रबोधन सुद्धा केले आहे. सध्या समाज प्रबोधन हीच लावणीची खरी ओळख बनली आहे.

प्रबोधन आणि मनोरंजन करणारा तमाशा अठराव्या शतकात रुजला असला तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळापासून विसाव्या शतकाच्या मध्यकाळापर्यंत खऱयाअर्थी तमाशा बहरला.

याच कालखंडात श्रीधर कृष्णाजीपंत कुळकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव यांचे नाव उदयास आले.

पठ्ठे बापूरावांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६८ रोजी सांगली जिल्ह्यातील रेठेरे हरणाक्ष येथे झाला. लहानपणापासून बापूरावाच्या कानावर पडणाऱ्या ओव्यांवर प्रयोग करायची सवय होती. यातूनच श्रीधरची गाणी म्हणून या ओव्या प्रसिद्ध झाल्या. त्यांची कीर्ती औंधच्या राजापर्यंत पोहचली. त्यांनी बापूरावला शिक्षणासाठी औंधला बोलवून घेतलं.

पुढे सोळाव्या बापूराव बडोदा संस्थानमध्ये गेले. तिथेच यंत्र दुरूस्तीच तंत्र शिकून घेतल आणि नोकरी देखील मिळवली. ही सुखाची नोकरी सुरु होती मात्र याच दरम्यान त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि बापूरावांना गावी परतावं लागलं.

पठ्ठे बापूराव यांना लावणीसम्राट म्हणून ओळख निर्माण झाली.पण, ब्राह्मण आणि कुळकर्णी पदाची जबाबदारी असल्याने या लावणी सम्राटाला पहिल्यांदा लावणी बघायला चोरून जावे लागले होते.

गावी घरासमोर असलेल्या वाडय़ातच तमाशाचा फड चालायचा. ब्राह्मण आणि कुळकर्णी पद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. त्यामुळे ते चोरून तमाशाला जाऊ लागले.

तमाशा बघून इतर लोकाप्रमाणे शांत बसतील ते बापू कसले. म्हणून

`श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !!

मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! `

ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले.

बापूरावांनी तमासगीरांना अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात त्यांच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली.

गावोगावी तमाशाचे फड उभे राहू लागले. त्यातूनच ते पठ्ठे बापूराव म्हणून प्रसिद्धीस आले. कालांतराने बापूराव मुंबईत आले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले.

याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा भेटली. तिला काहीजण मस्तानीची उपमा द्यायचे. बापूरावांचे काव्य अन् पवळाबाईच्या गोड गळय़ाने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांसमोर सादर केली.

बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली. १८९० ते १९०० या काळात पठ्ठे बापूराव प्रत्यक्ष तमाशा फडात उभे राहिले. त्यांनी तमाशात ‘रंगबाजी’ नावाचा स्वतंत्र प्रकार आणला.

त्या काळातील नाटकांच्या प्रभावातूनच पठ्ठे बापूरावांनी रंगबाजीचे लेखन केले. १९१४ ते १९१८ च्या काळात महायुद्ध आणि तापसरी मंदीच्या लाटेत नाटय़सृष्टी हेलकावत होती.

त्या काळात अनेक तमासगीर महाराष्ट्राच्या खेडोपाडी जत्रा, यात्रांमधून तमाशा सादर करून तग धरून होते. पठ्ठे बापूरावांनी याच काळात आपली लोकप्रियता कायम ठेवली. त्या काळात तमासगीर आपल्या जातीपातीचा मोठय़ा गौरवाने उल्लेख करीत.

जातीअंताच्या लढय़ासाठी लढलेला पहिला साहित्यिक असा पठ्ठे बापूरावांचा गौरव अनेकजण करतात. जाती-जातीच्या संघर्षाचे अनेक चटके पठ्ठे बापूरावांनी सहन केले.

पठ्ठे बापूरावांचा आपल्या लेखणीचा आणि वैखरीचा विलक्षण अभिमान होता. त्यांनी लिहिलेल्या गण-लावण्यांवरच आजचा तमाशा टिकून आहे.

‘शुभमंगल चरणी गण नाचला’ सारखे त्यांचे प्रसिद्ध गण आजही तमाशात रंगत वाढवतात. पठ्ठे बापूरावांचे फार्सही पद्यमय असत. त्यात कलावंत मधेमधे संवादाची मस्त परवण करीत असतात.

लावणीला भरभरून देणारे पठ्ठे बापूराव अभिजन आणि बहुजन या दोन्हीही पातळय़ांवर उपेक्षित राहिले. त्यांच्यावर चित्रपट, नाटके आली. त्यांच्या लेखणीवर ढोलकी फडाच्या, संगीत बारीच्या तमाशाचे भरणपोषण झाले.

१९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर `मिठाराणी’ चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला.

पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला.

मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर हालअपेष्ठा सोसणाऱ्या या महान कलाकारचे २२ डिसेंबर १९४५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.

हे ही वाच भिडू.