काँग्रेसचा राजीनामा, हार्दिक पटेल हिंदुत्वाच्या वाटेवर कसे चाललेत..?

गुजरात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत, काँग्रेसचंही नुकतंच चिंतन शिबीर पार पडलंय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पाटीदार समाजातले नेते, गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी, काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आपल्या ट्विटर हॅण्डलद्वारे राजीनामा जाहीर करत त्यांनी, ‘गुजरातमधली जनता आणि माझा प्रत्येक साथीदार माझ्या या निर्णयाचं स्वागत करेल.’ असं म्हणलंय. तर सोनिया गांधींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, ‘काँग्रेस पक्षाला गुजरातच्या जनतेसाठी काही चांगलं करायचंच नाहीये.’ असंही नमूद केलं आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलंय.

गेल्या काही दिवसांपासूनच हार्दिक पटेल काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याही पेक्षा जास्त चर्चा होती, हार्दिक पटेल भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या वाटेवर जातील याची. आता काँग्रेसला थेट रामराम केल्यानं या चर्चांना आणखीनच उधाण आलंय.

पण हार्दिक पटेल भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या वाटेवर जातील, अशी चर्चा होण्याची कारणं बघुयात.

१. त्यांचा व्हॉट्सॲपचा डीपी…ज्यामध्ये हार्दिक यांनी भगवी शाल घेतलीये.

तुम्ही म्हणाल व्हॉट्सॲपचे डीपी पाहून जर का लोकांच्या भूमिका कळल्या असत्या तर सगळी राजकीय ‘सूत्रं’ व्हॉट्सॲपवरूनच हलली असती. पण काही सूक्ष्म गोष्टी देखील मोठ्या बदलांचे कारण ठरतात.

मध्यंतरी व्हॉट्सॲपच्या नवीन डिपीमध्ये हार्दिक पटेल यांचा भगवा ‘भगवा’ अवतार दिसत होता. हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सॲपसह टेलिग्रामचाही प्रोफाइल फोटो बदलला. इतकंच नाही तर त्यांच्या WhatsApp Bio मधून काँग्रेसचा इंट्रोच गायब झाला होता. त्यामुळे त्याचवेळी हार्दिक पटेल भगवा अवतार घेऊन भाजपमध्ये जाणार, अशा चर्चांना जोर आला होता.

२. दुसरं म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार

अलीकडच्या काळात हार्दिक पटेल यांनी स्वतःला हिंदुत्वाशी जोडले आहे. एका भाषणात तर त्यांनी जाहीर केलं की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. स्वतःला राम भक्त म्हणवून घेत आपली प्रतिमा देखील बनवण्याचा हार्दिक यांचा प्रयत्न चाललाय. यावरून ते विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हणलं जात होतं. त्यात आता राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण येणं साहजिकच आहे.

३. वडिलांच्या श्राद्धाला ४ हजार भगवत गीता वाटल्यात.

स्वतःला रामभक्त म्हणवून घेत हार्दिक पटेल यांनी आपल्या वडिलांच्या निधनाच्या पश्चात विधीमध्ये स्थानिक जनतेला, आणि आप्तस्वकीयांना ४,००० भगवत गीता वाटल्याचे त्यांनी स्वतःच सांगितलं होतं.

त्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की, आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान आहे.

४. भाजपचं कौतुक

हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. या महत्त्वाच्या पदी असूनही कट्टर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचं कौतुक करण्याचा चान्स त्यांनी सोडला नव्हता. काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर हार्दिक यांनी अनेकवेळा भाजपचं कौतुक केलं होतं.

त्यांनी जाहीरपणे असं विधानही केलं होतं की, ‘भाजप चांगला भक्कम पाया असलेला पक्ष आहे, भाजपच्या अलीकडच्या राजकीय निर्णयावरून हे मान्य करावे लागेल की भाजपमध्ये चांगले राजकीय निर्णय घेण्याची क्षमता आहे. काँग्रेसला बळकट व्हायचे असेल तर पक्षाला आपली निर्णय क्षमता सुधारावी लागेल”.

गुजरात मध्ये हार्दिक पटेलांची भूमिका महत्वाची राहिलीये…

त्यांची राजकारणातली एंट्री तशी मोदींच्या विरोधात मोर्चे, आंदोलनं करून झाली.  २०१४-१५ वर्षाच्या कॉलेजमधल्या निवडणूकीत बिनविरोध महासचिव होत हार्दिक यांनी पहिल्यांदा शहरी राजकारणाला सुरुवात केली.

मग त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे, पाटीदार समाजाचे आंदोलन.

आपल्या समाजातील केवळ गरीबच नाही तर श्रीमंत असलेल्या मुलांना देखील सरकारी नोकरी मिळत नाही, आणि या गोष्टीला केवळ आरक्षण जबाबदार आहे. हेच लक्षात घेऊन त्यांनी पाटीदारांच्या जमिनींचं पण मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण झाले होते पण त्यांना नोकऱ्या दिल्या नव्हत्या हा मुद्दा पुढे आणला.

हार्दिक यांनी ‘पाटीदार अनामत आंदोलन समितीची’ स्थापना केली आणि २२ व्या वर्षी आरक्षणाची मागणी घेऊन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन गुजरातच्या राजकारणात मोठा बदल घडवणारं ठरलं.

याच दरम्यान त्यांना अटकही झाली अन पटेल यांना अवघ्या महिन्याभरात राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. २२ व्या वर्षी मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधांना थेट भिडणारा नेता म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

आणि अशाप्रकारे त्यांनी ९ सप्टेंबर २०१५ ला लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये ‘पटेल नवनिर्माण सेनेची’ स्थापना केली होती.

पुढे वयाची २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यानंतर अवघ्या १९ महिन्यात त्यांना गुजरात काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं गेलं होतं. आज मात्र त्यांच्या नाराजी नाट्यावर राजीनाम्याच्या रुपात पडदा पडला आहे.

पण कधीकाळी भाजपचा आणि मोदींना टोकाचा विरोध करणारे हार्दिक पटेल आता ‘भगवी शाल’ पांघरून, हिंदुत्ववादी भूमिका घेऊन भाजपमध्ये जाणार का? भाजपचं कौतुक त्यांना भाजपच्या वाटेवर नेणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.