शाहू महाराजांनी कोल्हापुरात पाटलांचं ट्रेनिंग स्कुल सुरू केलं होतं

पाटील म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो रांगडा, घरंदाज, करारी, गावचं नेतृत्व करणार पुढारी, आकडेबाज मिशा, टोपी-धोतर, पायात कर्रकर्र वाजणाऱ्या चामड्याच्या चपला. जुन्या सिनेमामुळे पाटलांचे हेच चित्र आपल्या मनात फिट्ट बसलंय.

पाटील म्हणजे गावचा राजा!  प्रत्येक गोष्टीत पाटलाचा मान पहिला असायचा.

आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावात ही पद्धत दिसते. अनेक जण अभिमानाने आपल्या आडनावापुढे पाटील लावतात. अनेकांचे आडनावच पाटील आहेत.

पण तुम्हाला माहीत आहे का की मराठेशाहीच्या प्रशासन व्यवस्थेत पाटील ही एक पदवी होती.

गावचा शेतसारा वसूल करणारा अधिकारी म्हणजे पाटील. गावातला न्यायनिवडा करणे, शांतता राखणे ही महत्वाची कामे त्याच्याकडे असायची.

अगदी मुघलांपासून ब्रिटिशांच्या पर्यंत प्रत्येक राजसत्तेला गावच्या कारभारासाठी पाटलांवर अवलंबून रहावं लागत होतं.

कालांतराने प्रशासन व्यवस्था बदलली गेली.आज याच पाटलांची मुले पुण्याला येऊन mpsc/upsc चा अभ्यास करत आहेत. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री ट्रेनिंग सेंटरला जाण्याची स्वप्ने बघत आहेत.

पण भिडू, याच महाराष्ट्रात पाटलांच्या ट्रेनिंग साठी एक ट्रेनिंग सेंटर होतं? तेही कोल्हापुरात? खुद्द राजर्षी शाहू महाराजांनी याची सुरवात केली होती.

शाहू महाराज आधुनिक विचारांचे होते. इंग्लंड सारख्या युरोपियन देशामध्ये प्रशासन कसे चालते हे त्यांनी पाहिलं होतं. पाटील म्हणजे राजाचा गावातील शेवटचा प्रतिनिधी. त्याच्यावर राज्यकारभाराचा मुख्य भार अवलंबून असतो. रयतेशी त्याचा थेट संपर्क असतो.

या पाटलांचे प्रबोधन व्हावे, तो आपल्या कामात तरबेज व कर्तव्यदक्ष राहावा म्हणून महाराजांनी त्यांच्या ट्रेनिंग साठी एक संस्था स्थापन केली. नाव होतं,

“दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कुल”

1911 मध्ये ब्रिटिश सत्तेचा राजा पंचम जॉर्ज याच्या पदारोहणाचा कार्यक्रम दिल्ली येथे झाला होता. याला दिल्ली दरबार असे म्हणत. त्याचदिवशी दिल्लीला भारताची राजधानी जाहीर करण्यात आलं होतं. याची आठवण म्हणून शाहू महाराजांनी आपल्या या ट्रेनिंग स्कुल ला दिल्ली दरबाराचे नाव दिले.

या संदर्भातील करवीर रियासतीचा जाहीरनामा तेव्हाचे एज्युकेशन इन्स्पेक्टर अण्णासाहेब लठ्ठे यांनी 2 फेब्रुवारी 1912 रोजी जाहीर केला आहे. यात शाळेचे स्वरूप कसे असेल याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे.

या शाळेत शिकवले जाणारे विषय

१. गाव पोलीस, डिस्ट्रिक्ट पोलीस यासंबंधी कायदे व फौजदारी कायद्याची मुख्य तत्वे.
२. गावचा जमाखर्च, त्या संबंधी नमुने वगैरे मुलकी कामे.
३. खेडेगावातील आरोग्यासंबंधी वगैरे माहिती. त्या संबंधाने गावकामगारांची कर्तव्ये.
४.रिपोर्ट वगैरे लिहिणे यास, जरूर इतका भाषाविषयी व्याकरणासह.
५. कोल्हापूर राज्याचा इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्थेची माहिती.

ही पाटलांची व तलाठ्यांची शाळा चालवण्याची जबाबदारी पंडित आत्माराम शास्त्री यांच्याकडे देण्यात आली होती.

सदर क्लासचे टीचर बाळासाहेब गायकवाड यांनी पुरवावे असे आदेश होते. दरवर्षी या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले की त्यांची परीक्षा घेण्यात यावी असं महाराजांनी सांगितलं होतं.

ही परीक्षा एज्युकेशनल इन्स्पेक्टर, राजाराम कॉलेजचे विज्ञानाचे प्राध्यापक आणि सरसुभे नेमतील तो मुलकी कामगार यांच्या कमिटीकडून घेण्यात येईल व त्या परीक्षेत पास होणाऱ्यास पाटीलकीच्या कामावर रुजू करून घेण्यात येईल असा स्पष्ट आदेश त्या जाहीरनाम्यात लिहिला होता.

एवढेच नाही तर 23 नोव्हेंबर 1912च्या जाहीरनाम्यात त्या वर्षीच्या पाटील स्कुलच्या वार्षिक परीक्षेचा निकाल देखील जाहीर केला आहे.

गंमत म्हणजे या परीक्षेत पास होऊन करवीर संस्थानात पाटील होण्याचा मान मिळवणाऱ्यामध्ये एक ब्राम्हण आणि एक मुसलमान व्यक्ती देखील आहे.

महंमद मोहद्दीन पाटील हे मिणचे,पेटा आळते येथून तर महादेव आप्पाजी कुलकर्णी हे कडलगे पेटा गडहिंग्लज येथून पाटीलकीची परीक्षा पास झाले होते असं या जाहीरनाम्यात दिसतं.

याचाच अर्थ शाहू महाराजांनी पाटीलकी ची परीक्षा सर्व समाजासाठी खुली केली होती. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे कोल्हापूर हे एक पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारे शहर बनले. आधुनिकता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत कोल्हापुरात लवकर आली. आजही कोल्हापूर भागात सर्व जातपंथातील पाटील दिसून येतात.

संदर्भ- राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे, संपादक जयसिंगराव पवार

हे ही वाच भिडू.