गोष्ट “पत्नी पीडित पुरुष आश्रम” उभारण्याची…
आज वटपोर्णिमा. आजच्या दिवशी साता जन्माच्या गोष्टी केल्या जातात. सकाळी वडाच्या झाडाची पुजा केली जाते आणि असे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले जातात.
पण थांबा आज तुम्हाला फक्त वडाचेच पुजन करणाऱ्या महिलांचे फोटो दिसणार नाहीत तर पुरूषांचे पण दिसतील आणि ते पण पिंपळ पुजताना. अस का? तर हे पुरूष आहेत जॉनी डेप कॅटेगरीतले. म्हणजेच पत्नीपिडीत पुरूष…
वास्तविक वटपोर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नीपिडीत पुरूष पिपंळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून पत्नीच्या त्रासातून मुक्त कर अशी प्रार्थना करतात अन् हे काम करणारे पुरूष असतात
औरंगाबादच्या पत्नी पिडीत आश्रमाचे..
२०१७ साली औरंगाबदच्या वाळूज येथे या आश्रमाची स्थापना करण्यात आली. ॲड भारत फुलारे हे या आश्रमाचे संस्थापक. स्वत: आलेल्या अनुभवातून आपण हा आश्रम सुरू केल्याचं ते सांगतात.
याबाबत खुद्द ॲड भारत फुलारेच सांगतात. ते म्हणतात,
माझ्या लग्नानंतर मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यातून मी आत्महत्या करण्यापर्यन्त गेलो. आयुष्याचा बराच काळ या लढाईतच गेला. याच काळात माझ्यासारखेच अनेक पुरूष मला भेटले. त्यातूनच अशा आश्रमच उभा करण्याची संकल्पना डोक्यात आली.
यासाठी मी पुन्हा वकिलीचं शिक्षण घेतलं. आश्रमाकडून दर रविवारी पुरूषांसाठी वर्कशॉप घेण्यास सुरवात केली.
आज तब्बल ९ हजार ६०० पत्नी पिडीत पुरूषांची नोंद त्यांच्याकडे असल्याचं ॲड फुलाचे यांचा दावा आहे. महाराष्ट्रच नाही तर अगदी केरळ, कर्नाटक इथूनही पुरूष त्यांचा आश्रम शोधत येत असतात.
आत्ता या आश्रमात नेमकं काय केलं जातं, तर इथे तीन कॅटेगरी ठेवण्यात आलेल्या आहेत. यातली पहिली कॅटेगरी आहे ती बिनलाजी कॅटेगरी. या गटातले पुरूष जे आहे ते सर्व निर्भिडपणे सांगतात. दूसऱ्या कॅडेगरीत येतात लाजणारे..
हे थेट आंदोलनात येत नाहीत. लोकांच्या समोर येत नाहीत अगदी बायकोला कुठेतरी आपण दिसू म्हणून थेट समोर येत नाहीत. तिसरी कॅटेगरी आहे, ती म्हणजे बायकोसोबत एकाच छताखाली राहून स्वतंत्र मेस, स्वतंत्र खोली असणारे..
आत्ता तुम्ही म्हणालं मलाही बायकोचा त्रास होतो. मी देखील अशा आश्रमात जातो. तर ते तितकं सोप्प देखील नाही. बायकोकडून किमान २० केसेस दाखल झालेल्या असतील. अशा केसेसमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं असेल तरच तुम्हाला या आश्रमाचे दरवाजे खुले आहेत.
सध्या या आश्रमात ५ ते ६ पुरूषच आहेत.
त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च ते काहितरी काम करुन भागवतात व घरगुती हिंसाचाराच्या केसेस लढवत राहतात. अगदी ३२ वर्षांपासून ते ७८ वयापर्यन्तचे पुरूष इथे आहेत. हे पुरूष आपआपसातले दुख, वेदना, झालेला त्रास एकमेकांसमोर मांडतात आणि आत्महत्या करण्याच्या विचारापासून दूर जात लढण्याचं बळ मिळवतात.
इतक्यावरच न थांबता पिंपळ पोर्णिमा, गाढवापुढे निवेदन वाचणं असे जगावेगळे उपक्रम राबवत पुरूषांवर देखील घरगुती हिंसाचार होतात या महत्वाच्या प्रश्नाकडे लोकांच लक्ष वेधून घेतात.
इथे सांगण्यासारखा मुद्दा इतकाच येतो की, प्रत्येक पुरूषावर झालेली घरगुती हिंसाचाराची केस ही जाणीवपुर्वक केलेली असते अस नाही. कित्येक महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. पण आपल्या आजूबाजूला असेही पुरूष आहेत ज्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो.
हे ही वाच भिडू :
- आजही नवरात्र उत्सवामध्ये उगवत्या सूर्याची किरणे थेट या देवीच्या चरणावर पडतात
- कोरोनामुळे बेंदूरची १०० वर्षांची परंपरा खंडित करावी लागली.
- D’Cruz, D’Gama असले आडनाव असेल तर सरकारी लाभ मिळत नाही कारण अतरंगी आहे…