…असे पठ्ठे बापूराव निर्माण होण्यास हाच प्रसंग कारणीभूत ठरला

डॉ. अंकुश जाधव यांनी संपादन केलेल्या व प्रसिद्ध स्वातंत्र सैनिक ज्ञानदेव बाळाजी जाधव उर्फ जाधव मामा यांच्या “सोनहिरा” आत्मचरित्रात असणारी महाकवी पठ्ठे बापूराव यांची ही आठवण. 

डॉ. अंकुश जाधव यांनी ६० ते ७० हून अधिक मराठी पुस्तके, तसेच मराठीसह, हिंदी, इंग्लिश अशा विविध भाषेतून पुस्तके लिहली आहेत. केंद्रीय आयुर्वेदीय अनुसंधान संस्थानमध्ये ते नोकरीस होते. आयुर्वेद या विषयावर लेख लिहणारे डॉ. अंकुश जाधव हे मुळचे सांगली जिल्ह्यातील आसद या गावचे.

आपल्या गावासंबधीत असणाऱ्या ज्ञानदेव बाळाजी जाधव यांच्या आठवणी या पुस्तकात आहेत. या पुस्तकातून अनेक मोठी लोकं नेमकी माणूस म्हणून कशी होती हे समजतं.  त्यांच्या छोट्या छोट्या अनुभवातून लोकांच जगणं कळतं.

महाकवी पठ्ठे बापूराव यांचे मूळ गाव रेठरे हरणाक्ष हे असले तरी त्यांचे बालपण व बरेचसे आयुष्य हे आमच्या आसद गावात गेलेले आहे. त्यांनी कवने, भेदीक गाणी, लावण्या रचनाची सुरुवातही आसद गावातच केली. माझ्यावर त्यांचा खूपच प्रभाव पडला आहे. मी कवने करू लागलो, त्याला पठ्ठे बापूराव खूप प्रमाणात कारणीभूत आहेत.

पठ्ठे बापूराव लहानपणापासूनच लहरी होते. एकदा विहिरीत पोहण्याची शर्यत लागली. पोहण्यास सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. शर्यतीत एकूण आठ मुलांनी भाग घेतला होता. त्यातील सहा मुले दुपारी बारा वाजेपर्यंत बाद झाली.

शर्यत पाहण्यासाठी पूर्ण गाव आला होता. लोक शर्यतीत भाग घेणाऱ्यांना उत्तेजन देत होते. दुपारी दोन वाजता शर्यतीत राहिलेला गडी बाद झाला व आपोआप ती शर्यत बापूरावने जिंकली.  लोकांनी त्यांची गावातुन मोठी मिरवणूक काढली. त्यांना कुस्तीचाही नाद होता.

पठ्ठे बापूराव यांचे पूर्ण नाव श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी असे होते. त्यांचे इंग्रजी ४ थी पर्यंत शिक्षण झाले होते. त्यांनी आसद गावातच शाळा काढली व मुलांना शिकवू लागले. त्याचवेळी त्यांनी सोनारवाड्यात किराणा मालाचे दुकान काढले. अशी बापूंची चार-दोन वर्षे गेली. बापू जवानीत आला होता. त्यावेळी गावात मेदीक गाणाऱ्यांचा अड्डा होता.

त्यात पांडूतात्या, सखाराम अण्णा, अब्दुलभाई, तातोबा चांभार अशी भेदीक गाणारी मंडळी होती आणि ते गुरुवर्य महाकवी हैबती कलगीवाले यांची भेदीक गाणी व कवने म्हणत. पठ्ठे बापूराव ही बैठकीला जात असत. त्यानंतर त्यांनी भेदीक गाण्यांच्या लावण्या रचल्या. त्यांनी भगवद्गगीता, ज्ञानेश्वरी यावर कवने केली. रामायणातील लंका दहन, अहि महि वध अशा त्यांच्या लावण्या प्रसिद्ध आहेत.

WhatsApp Image 2020 08 03 at 3.41.02 PM

 

ही सर्व कवने करताना आसद गावचे दत्तोपंत कुलकर्णी (अप्पा) हे त्यांना मदत करीत. दत्तोपंत कुलकर्णी पट्टीचे विद्वान होते. त्याचवेळी आसद गावचेच माधव बडवे यांची मुलगी मुलगी तिसऱ्या इयत्तेत शिकत होती. तिचे नाव सावळी असून वय १२ वर्षे होते. सावळीच्या आईचे नाव नागूताई असे होते व ती बापूंची मावळण होती. तेव्हा अत्यंत सोवळे जपणाऱ्या बडवे घराण्यातील सावळीचे लग्न बापुशी झाले.

बापूचा कवित्व व भेदीक गाणी करण्याचा नाद वाढतच चालला होता. गावोगावी जत्रेत तमाशे येत असत. त्यावेळी तमाशात बायका नाचत नव्हत्या तर बायकांची कामे पुरुषच करत होते. आमच्या भागात कडेगावचे धावराव (महार) हे तमाशात नाच्याचे काम करीत होते. ज्या गावात तमाशा असे त्या गावातील कोणासही तमाशात गाणे म्हणण्याची संधी दिली जात असे.

बापू आता तमाशात गाऊ लागला होता. एके वर्षी पवळी  नावाची तमासगिरीन आसदच्या यात्रेला आली होती. पवळी ही आमच्या माहितीप्रमाणे तमाशात नाचणारी पहिली बाई होय.  पवळी शरीराने व आवाजाने अतिशय सुंदर होती. तिने बापूरावाला गाण्याचा आग्रह केला. बापूरावाने हलगीवर थाप टाकून गाणे म्हटले व तो फडच गाजवला.

यावेळेपासून बापूरावाच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. ज्यांचे नाव घेतल्याशिवाय तमाशाची सुरुवात होत नाही असे पठ्ठे बापूराव निर्माण होण्यास हाच प्रसंग कारणीभूत ठरला.

बापूराव  पवळीच्या तमाशात काम करू लागले, गाऊ लागले. तिच्या पूर्णपणे प्रेमात पडले. परंतु यामुळे बडवे कुटुंबावर आकाश कोसळले. कारण बापूराव शुद्ध ब्राम्हण तर तमाशातील दुसरे लोक महार असत, त्यामुळे बापूराव त्यांच्यात पूर्णपणर ‘बाटले’ होते.

यामुळे महादू बडवे बेचैन झाले. ते बापूरावचे सासरे होते. आपल्या मुलीचे सावळीचे काय होणार म्हणून चिंता करू लागले. तेव्हा गावातील अत्यंत प्रतिष्ठित व आमचे वडील बाळकू पाटील यांना महादू बडवे म्हणाले, ‘आता त्या बाप्याला समजावून आणायचे झाले तर तो ऐकेल तर तुमचेच; म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चला.’ बाळकू पाटील तयार झाले.

खेडपुंदी या सांगली जिल्ह्यातील गावी  पवळी व बापूराव यांच्या तमाशाचा मुक्काम होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक लहानसा रेडा कापून त्यांनी शिजत ठेवला होता. तो शिजला होता. लोक जेवणाच्या तयारी होते. त्याचवेळी महादू बडवे व बाळकू पाटील त्या गावातील महारवाड्याच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. ते पुढे जाऊ शकत नव्हते कारण ते सोवळे मानणारे.

तेथून महारवाड्यात जाणाऱ्या पोराला जवळ बोलावून महादू बडव्यांनी त्याला सांगितले, ‘तो बाप्या आहे का? असेल तर त्याला इकडे पाठवून दे.’ तो पोऱ्या गेलं व त्याने बापूरावाला निरोप सांगितला व पाहुण्यांचे वर्णन केले. त्यावरून बापूरावांनी जाणले जाणले की आलेत ते आपले सासरे व बाळकू पाटील.

त्यांची खोड मोडायची असे ठरवून त्यांनी एक युक्ती योजली. एक मोठा मासाचा गोळा खात खात ते लिंबाच्या झाडाकडे निघाले. हे थोडे दुरूनच बाळकू पाटील व महादू बडवे यांनी पाहिले . तेव्हा महादू बडवे बाळकू पाटील यांना म्हणले, ‘पाटील आता आपण गावाला जाऊया. आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. अगदी शेवट झाला हाये.’ ते परत फिरले. बापूरावांची युक्ती सफल सफल झाली.

पुढे पठ्ठे बापूराव तमाशे करू लागले त्यांचे नाव फार गाजले. 

फिरून फिरून म्हातारपणी बापूराव आसदला आले. सर्व गाव त्यांना पाहण्यासाठी ब्राम्हण वाड्यात जमा झाला होता. बापूरावांना ओसरीच्या खालीच बसवले होते. तेव्हा पठ्ठे बापूराव दत्तोपंत कुलकर्णींना म्हणले, ‘ किलो कापूर घेवून या व त्याची ज्योत लावून समाधीला बसा, पंचमुद्रा, ध्यानधारणा करा त्याच्यामध्ये अलक्ष्यामुद्रा लागल्यानंतर तुम्हाला समाधी लागेल. तोपर्यँत कापराची ज्योत जळतच राहील.’ परंतु हा प्रयोग काही कारणाने होऊ शकला नाही.

गुरवाकडून पत्रावळी व द्रोण आणुन त्यावर पठ्ठे बापूरावांना जेवायला वाढण्यात आले. ताटात त्यांना जेवायला वाढणे शक्य नव्हते. कारण ते ‘बाटले’ होते. दत्तोपंतांची पत्नी त्यांना जेवायला वाढत होती. आनंदीबाई कुलकर्णी पठ्ठे बापूरावांना म्हणाल्या, ‘ अरे बापू, चांगली कढी आहे परंतु खाणार कशात’ त्यावेळी बापूराव म्हणाले, ‘तुम्ही कढी तर आणा’ त्या घेऊन आल्या, त्यावेळी बापूरावांनी आपला चामड्याचा बूट काढला, धुतला व त्यात कढी वाढा असे म्हणाले. आनंदीबाईंनी बुटात कढी वाढली. बापूराव खाऊ लागले सर्व गावकरी हसू लागले.

दत्तोपंत बापूरावांना म्हणाले, ‘बुटात कढी खातोस’ तेव्हा पठ्ठे बापूराव म्हणाले, ‘माणसाचे मन शुद्ध असले पाहिजे त्यालाच परमेश्वर भेटतो.’ तुमच्यासारख्या केवळ गीता पाठ करणाऱ्यांना नव्हे. तेव्हा मी व माझे वडील बाळकू पाटीलही तेथे होतो.

बाळकू पाटील बापूरावांना म्हणाले, ‘बापू तू नावलौकिक कमविलास पण तू बाटला नसतास तर तुझ्या धर्मपत्नीचे हाल झाले नसते. तिचे हाल आम्हास पाहावे लागले नसते.’ त्यावर बापूराव म्हणाले, ‘बापू, आपण दोघे दूरवर जेथे आपणास कोणीही ओळखत नाही. अशा ठिकाणी गेलो तर तेथील लोक म्हणतील का, की हा मनुष्य बाटला आहे व हा मनुष्य बाटला नाही? तुम्हाला मी माहित आहे म्हणून मी बाटलो आहे.’ याचे उत्तर बाळकू पाटलांना देता आले नाही.

मी माझी काही कवने पठ्ठे बापूरावांना दाखवून घेतली होती. वयोमानाने आज मला माझी बरीच कवने लिहून न ठेवल्यामुळे आठवत नाहीत.

डॉ. अंकुश जाधव

फोन नंबर : 8085724449 

1 Comment
  1. Vijay Avdhute says

    सर नमस्कार, पठ्ठे बापूरावांची कहाणी खुपच भावनात्मक, आव्हानात्मक होती. धन्यवाद सर, मला माहीत नव्हते, सर मला या कथेचं ईसवी स.न.कीती होतं कळेल काय❓ आमच्या नाभिक समाजातील बिहार मध्ये असाच एक कलावंत घडून गेला, त्याकाळी तेथे तमाशामध्ये स्त्रिया नाचत नव्हत्या, तेव्हा ”लौंडानाच”हा प्रकार तेथील कलेमध्ये आणला, त्यांना तेथे कलेचे शेक्सपियर म्हणून ओळखल्या जाते. धन्यवाद सर🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.