पॉल अॅडम्सची बेडूक अॅक्शन बघून बॅट्समनला चक्कर यायची.
जगात लोकं बॅटिंगचे कितीही मोठे भक्त असले तरी मॅचचे खरे हिरो बॉलर असतात. जर बॉलर गंडला तर टीम हरली हे साध सोपं गणित असत. म्हणूनच खरा फॅन असतो म्हणतो की,
बॉलिंग हे एक आर्ट आहे तर बॉलर हा क्रिकेटचा आर्टिस्ट!
बॉलिंगमध्ये तुम्ही बॉल कसा टाकता याबरोबरच तो कसा प्रेझेंट करता हे देखील महत्वाच असत. शोएब अख्तर जेव्हा २२ यार्ड धावत येतो तेव्हा त्याचा अंगार बघूनच फलंदाजाची फाटलेली असे. झहीर खान, चामिंडा वास यांची उंच मारलेली उडी, मुरलीने बॉल टाकल्यानंतरचे डोळे, कुंबळेने बॉल टाकण्या आधी एकदा हवेत चेंडू फिरवणे(पण बॉल टाकल्यानंतर तो न फिरवणे) अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी बॅट्समन सोबतची निम्मी लढाई जिंकलेली असते.
अॅक्शन हा बॉलिंगचा आत्मा आहे.
पण काही काही बॉलर असे असतात ज्यांची अॅक्शन म्हणजे बॅट्समनला विचारलेला क्वेश्चन असतो. ढिम्म कळत नाही की हा बॉलर कसा बॉल टाकतोय. अशाच आपल्या चिवित्र अॅक्शनसाठी फेमस झालेलं नाव म्हणजे
पॉल अॅडम्स.
नव्वदच्या दशकातला काळ.
प्रत्येकाच्या घरात टीव्ही पोहचलेले, काहींच्या घरात रंगीत टीव्हीच देखील आगमन झालेलं. यापूर्वी सुनील गावसकर, कपिल देव, व्हिव रिचर्डस कसे खेळतात आपल्या आधीच्या पिढीने रेडीओवर ऐकलेलं, व्हिस्परींग विंड मायकल होल्डिंगच्या चर्चा ऐकलेल्या.
पण आता टीव्ही मुळे सगळ समोर दिसत होत. सचिनने शेन वॉर्नला डोक्यावरून मारलेला स्ट्रेट सिक्स, वसीम आक्रमचा रिव्हर्स स्विंग, जॉण्टीने मारलेला डाय हे आपण अनुभवत होतो. अशातच आगमन झाल पॉल अॅडम्सचं.
पॉल अॅडम्स जन्मला केप टाऊन दक्षिण आफ्रिका मध्ये. त्याला आधी बॅट्समन बनायचं होत. एकदा शाळेतल्या शिक्षकांनी पॉलला खाली वाकून बॉलिंग टाकताना बघितलं. सुरवातीला त्यांना वाटलं की हा गंमत म्हणून करतोय. पण नंतर चौकशी करताना जाणवल की पॉलची अॅक्शनच तशी आहे.
पॉलच्या बॉलिंगवर त्यांनी मेहनत घेतली. तेव्हा पासून पॉलच बॅटिंगच खूळ जाऊन तो लेफ्ट आर्म अनओर्थोडोक्स स्पिनर बनला.
पॉलची अॅक्शन खूपच गंमतीदार होती. तो धावत यायचा आणि खाली जमिनीकडे बघत वाकून उलटा बॉल टाकायचा. सुरवातीला अनेकांनी त्याला खुळ्यात काढलं.
तो बॅट्समन कडे न बघता अंदाजपंचे बॉल टाकतो वगैरे वगैरे टीका केली.
पण पॉलने आफ्रिकेच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विकेट्सची रांग लावली त्यामुळे टीकाकारांचे तोंड बंद झाले. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हे करणारा तो सर्वात लहान आफ्रिकन खेळाडू ठरला.
जागतिक क्रिकेटमध्ये सुद्धा आल्या आल्या पॉल अॅडम्सची हवा झाली.
त्याची उलटी अॅक्शन बघून बॅट्समनना चक्कर यायची. बॅट्समन सोडा अंपायरना सुद्धा त्याच्या चायनामनची गुंतागुंत कळायची नाही. टीव्हीवर बघणारे प्रेक्षक तर वेडे व्हायची वेळ आली होती. त्यांनी त्याला अनेक टोपणनावे पडली. सगळ्यात फेमस होत बेडूक बॉलर
इंग्लडचे माजी कप्टन माईक गॅटिंग यांनी त्याला frog in a blender अस म्हणून हे नाव फेमस केलं होतं.
विशेषतः भारताविरुद्ध पॉल अॅडम्स चांगलाच गाजला. आपल्या इथल्या पाटा पीच वर त्याचे अनपेक्षित वळणाऱ्या बॉलनी बॅट्समनची भंबेरी उडवली. १९९६ साली भारत दौऱ्यामध्ये कानपूरच्या कसोटीवेळी त्याने द्रविड,सचिन, अझरूद्दीन या महत्वाच्या विकेट्स सकट एका इनिंगमध्ये ६ बळी घेतले.
ती मॅच आपण जिंकली पण भारतीय प्रेक्षकांमध्ये चर्चा बेडूक बॉलरचीच होती.
त्याच वर्षी शारजामधल्या वनडेमध्ये त्याने आपल्या एका स्पेलमध्ये मॅच फिरवली आणि भारताला हरवल. या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने असाच पराक्रम केला होता.
पण पॉल अॅडम्सची काळी जादू फार काळ टिकली नाही.
त्याच्या अॅक्शनची एकदा सवय झाल्यावर बॅट्समन हळूहळू त्याला व्यवस्थित खेळू लागले. पुढे पुढे तर गांगुली, सचिन यांनी त्याची प्रचंड धुलाई करून त्याची पिसे काढली. काही वर्षांनी पॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नाहीसा झाला.
पण तरीही त्याच्या नावावर टेस्टमध्ये १३४ बळी आहेत. तर फर्स्ट क्लासमध्ये तर त्याने ४१२ विकेट्स घेतले आहेत. अंदाजपंचे बॉलिंग टाकत असता तर हे झालं नसत.
२००६ मध्ये त्याला भारत दौऱ्यासाठी परत बोलवलं होत पण पॉलला कोणताही चमत्कार करता आला नाही. अखेर वयाच्या ३० व्या वर्षी त्याने निवृत्ती घेऊन टाकली. पुढे हा बेडूक बॉलर कधीही दिसला नाही. अस म्हणतात की तो अज्ञातवासात गेला होता. मध्यंतरी तो कुठल्याशा लोकल टीमचा कोच आहे हे कळल.
जगात अनेक बॉलर येतात आणि जातात पण लक्षात काहीच जण राहतात. पॉल अॅडम्सच्या अॅक्शनने त्याला अजरामर करून सोडलं. आजही अनेक बॉलर त्याची कॉपी करायचा प्रयत्न करतात. भारतात ही आयपीएल मध्ये शिवील कौशिक हा नवा पॉल अॅडम्सम्हणून फेमस झाला होता.
पण कोणी काहीही म्हणो, एका इनिंगमध्ये ९ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा असा बेडूक बॉलर पुन्हा होणे नाही.
हे ही वाच भिडू.
- पुण्याच्या नाडकर्णींंना जगातला सर्वात कंजूष बॉलर म्हणून ओळखले जायचे.
- सचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची
- बॉम्बे डक म्हणून कितीही हिणवले तरी आगरकर एवढ्या विकेट घेणं कोणाला शक्य नाही.
- तो भारतीय बॉलर दिसला तरी सईद अन्वरची टरकायची !!