पवन कल्याणचं स्टारडम बघून खुद्द पंतप्रधान मोदीसुद्धा हैराण झाले होते.

साऊथ इंडियन मुव्हीज हे लोण फक्त साऊथ मधेच नाही तर पूर्ण भारतभर पोहचलय. भारतभरातून दाक्षिणात्य सिनेमाला मिळणारा प्रतिसाद अद्भुत आहे. त्यासोबतच हिरोची ऍक्शन, गाणी,लव स्टोरीज अशा सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असल्याने साऊथचे सिनेमे लोकं आवर्जून पाहतात. म्हणजे इतकी क्रेझ आहे की बॉलीवूड तर साऊथच्या सिनेमांवर जगतं असं म्हणता येईल इतके सिनेमे बॉलिवूडची साऊथचे रिमेक केलेले आहेत. 

रजनीकांत नंतर साऊथमध्ये देव मानण्यात आलेल्या हिरोबद्दल आपण आज जाणून घेऊया. इतकी क्रेझ एखाद्या अभिनेत्याची असू शकते की खुद्द देशाचे पंतप्रधान त्याचं स्टारडम बघून हैराण झाले होते.

तर तो हिरो म्हणजे पवन कल्याण. साऊथचे सिनेमे बघणाऱ्या प्रत्येकाला टॉलिवूडस्टार पवन कल्याण माहिती असतो. पण पवन कल्याण हा असा हिरो आहे की त्याला सगळं येतं. सिनेमा मध्ये येण्याअगोदर तो लाजाळू जास्त होता, मित्रांनी फोर्स करून त्याला सिनेमात उडी घ्यायला लावली आणि पवन कल्याणची ही उडी थेट हनुमान उडी ठरली. याचं कारण म्हणजे पवन कल्याण हा इतर हिरोच्या तुलनेत सगळ्यात कमी सिनेमे केलेला भिडू आहे पण तरीही त्याची फॅन फॉलोइंग त्याचे आपटलेले सिनेमे सुद्धा हिट करतात. त्याला रजनीकांत नंतरचा सगळ्यात मोठा स्टार मानतात.

पण पवन कल्याण सिनेमात आला कसा आणि नंतर पुढं राजकारणात सुद्धा कसा गेला  जाणून घेऊया.

पवन कल्याण हा चिरंजीवीचा भाऊ. आता चिरंजीवी काय चीज आहे हे सांगायला नको कारण जेव्हा चिरंजीवीचा गोल्डन काळ सुरू होता तेव्हा एकही सुपरस्टार चिरंजीवी समोर टिकत नव्हता, उगाच त्याला मेगा स्टार म्हणत नाही. तर मार्शल आर्टमध्ये पवन कल्याणने ब्लॅक बेल्ट मिळवलेला होता. तो कसाबसा सिनेमात आला तो बॉलिवूडचा रिमेक असलेल्या कयामत से कयामतचं तेलुगू व्हर्जन अक्कदा अम्माई इक्कदा अबाईमधून. हा सिनेमा म्हणावा तितका चालला नाही पण पवन कल्याण या हिरोची ओळख सगळ्यांना झाली.

पवन कल्याणचं मूळ नाव आहे कोनीदेला कल्याण बाबू पण त्याची स्टंट करण्याची चपळाई आणि वेग बघून त्याला पवन कल्याण नावाने ओळखलं जाऊ लागलं.

पवन कल्याणच्या आयुष्याला कलाटणी देणारा सिनेमा होता 1998 सालचा थोली प्रेमा. हा सिनेमा इतका गाजला की तरुणाई मध्ये युथ सेन्सेशन म्हणून पवन कल्याणला ओळखलं जाऊ लागलं. या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड आणि बेस्ट तेलगू फिचर फिल्मचा अवॉर्ड मिळाला आणि पवन कल्याण हे नाव सगळ्या टॉलीवुडला कळलं. तांबडू, बद्री आणि खुशी हे बॅक टू बॅक सिनेमे पवन कल्याणला सुपरस्टार बनवून गेले.

या सिनेमांमुळे रजनीकांत नंतरचा सगळ्यात मोठा सुपरस्टार म्हणून पवन कल्याणला ओळखलं जाऊ लागलं. चालण्याची स्टाईल, हेअरस्टाईल आणि कपड्यांची स्टाईल तरुणाई कॉपी करू लागली होती इतकी क्रेझ पवन कल्याणची होती.

पवन कल्याण हा मल्टी टास्कर आहे स्वतःच्या सिनेमाचे ऍक्शन स्टंट तो स्वतः डिझाइन करतो, गाणे लिहितो, गातो, सिनेमाची स्क्रिप्ट लिहितो. सगळं टॅलेंट असल्याने तो तरुणाईचा अजूनही लाडका हिरो आहे. जर सिनेमा चालला नाही तर तो प्रोड्युसरला सगळी भरपाई देतो कारण तो सिनेमाची सगळी जबाबदारी घेऊन चालतो.

 गब्बरसिंग हा पवन कल्याणचा सगळ्यात मोठा हिट सिनेमा होता. या सिनेमाने तेलगू फिल्म इंडस्ट्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले होते.

चिरंजीवीने सुरू केलेल्या प्रजा राज्यम पक्षाचा पवन कल्याण स्टार प्रचारक होता. पुढे चिरंजीवीने पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि पवन कल्याणचा इगो हर्ट झाला. पुढे पवन कल्याणने स्वतःच जनसेवा नावाची पार्टी सुरू केली.

तेव्हा नरेंद्र मोदिंसोबत त्याने अनेक कॅम्पेन केले. तेव्हा लोकं मोदींना नाहीं तर पवन कल्याणला बघण्यासाठी येत असायचे. पवन कल्याणचे चाहते बघून आणि स्टारडम बघून मोदिसुद्धा हैराण झाले होते.

चॅरिटी, जाहिराती आशा अनेक कामांमध्ये पवन कल्याण आघाडीवर असतो. आजही पवन कल्याणला देवाचा दर्जा त्याच्या चाहत्यांकडून देण्यात आला आहे. कमी सिनेमे करूनही इतकी क्रेझ असणं हे रजनीकांत नंतर फक्त पवन कल्याणला जमलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.