औरंगजेबाला दहशत बसावी म्हणून घाटगेंनी मुघल सैन्याची मुंडकी गडाच्या बुरूजावर रचली…

शिवराय दर्ग संरक्षण आणि बांधणीविषयी म्हणतात,

“राज्यरक्षणाचे मुख्य कारण किल्ले देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्या समुदई असो नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरुंगास असाध्य असा असला तरी तोही जागा मोकळा न सोडिता बांधून मजबूत करावा.”

या दुर्गबांधणीच्या तत्त्वानुसार बांधलेला दुर्ग म्हणजे पन्हाळ्याचा जोडकिल्ला किल्ले पावनगड होय. जोडकिल्लाच नाही तर पावनगडची निर्मिती सुद्धा पन्हाळ्यामुळेच झाली आहे. 

किल्ल्याचा इतिहास तसा खूपच विस्तृत आहे. ज्या डोंगराच्या माथ्यावर हा किल्ला बांधला, तो डोंगर ‘मार्कडेय’ डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. मार्कंडेय ऋषींची तपोभूमी म्हणून हा परिसर ओळखला जायचा. 

सिद्दी जोहरने १६६० मध्ये पन्हाळगडाला वेढा घातल्यावर पन्हाळ्याशेजारील मार्केडेय डोंगरावर इंग्रज वखारवाल्यांच्या मदतीने सिद्दीने तोफांचा मारा केला होता. त्यातील काही गोळे गडावर आले होते. १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकल्यावर मार्केडेंय पर्वतावर कल्पक इंजिनीअर अर्जोजी यादव, हिरोजी फर्जंद यांच्याकडून पावनगड किल्ला बांधला. या किल्ल्यावर हणमंत दरवाजा व दक्षिण दरवाजा बांधला. पावनगडामुळे पन्हाळा किल्ल्याला बळकटी आली. 

औरंगजेब ज्यावेळी मराठ्यांचे राज्य जिंकायला आला तेव्हा १७०१ मध्ये छत्रपतींच्या सर्जेराव घाटगे या किल्लेदाराने मुघल सैन्यावर छापे टाकून मोगलांची ​कत्तल केली. मोघलांवर दहशत बसावी म्हणून मुघल सैन्याची मुंडकी बुरूजावर रचली होती. औरंगाजेबाने दिलेली मोठी मनसबी घाटगे याने नाकारली होती. 

अखेरीस मोठ्या निकराने औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ‘रसूल गड’ ठेवले.

संरक्षणाकरिता आवश्यक तेथे बांधलेल्या तटबंदीचे अवशेष आजही सड्याच्या कडेने दिसतात. किल्ल्याच्या मुख्य प्रकारात दुर्गस्थापत्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेले अनेक अवशेष पाहावयास मिळतात.

त्यातही “तुपाची विहीर” ही दुर्मीळ रचना महत्त्वाची आहे. 

महाराष्ट्रातील फारच थोड्या किल्ल्यांवर अश्या तुपाच्या विहिरी आहेत. तुपाची विहीर म्हणजे काय ? यात तूप साठविले जायचे, पण ते खाण्यासाठी नाही. युद्धात झालेल्या जखमांवर लावण्यासाठी तूप हे उत्तम औषध म्हणून प्राचीन काळापासून भारतात वापरले जाते. त्यास ‘पुराणघृत’ म्हणतात. अशा तुपाच्या साठवणुकीची ही विहीर. 

मिरजेच्या लढ्यात जखमी सैनिकांच्यावर उपचारासाठी तुपाची मागणी करण्यात आल्याचा उल्लेख असून पावनगडावरून तूप पाठविण्यासंबंधी संभाजी महाराजांनी आज्ञापत्रात उल्लेख केला आहे. 

या व्यतिरिक्त शिवकालीन पाणी साठवणुकीचा उत्तम नमुना असलेली आडव्या बांधणीची विहीर (टाके), ज्यात नैसर्गिक झऱ्यांबरोबर पावसाचे वाहून जाणारे पाणी साठते आणि किल्ल्यावरच्या शिबंदीची पाण्याची गरज भागते. तुपाची विहीर, पाण्याचे टाके यानंतर आणखी एक महत्त्वाची रचना म्हणजे प्राचीन दगडी बांधणीचे अत्युत्कृष्ट पण मूर्तिविहीन मंदिर. 

मंदिर नेमके कोणत्या देवतेचे आहे ते सांगणे अवघड आहे, परंतु मंदिराच्या समोर जी रचना आहे तिला ‘नंदीचा चौपाळा’ म्हणतात. त्यात पूर्वी नंदीची मूर्ती असावी, म्हणजे कदाचित हे महादेवाचे मंदिर असावे. याव्यतिरिक्त इतर दोन-तीन मंदिरे आणि दीपमाळ, तसेच दैवतांचे भग्न अवशेष गडावर जागोजागी आढळतात. 

त्यातील काही मंदिरे इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांत रूपांतरित झाली आहेत. मूर्तीविहीन मंदिरापासून पूर्वेकडे तटबंदीच्या रोखाने गेल्यास मुख्य तटबंदीपासून वेगळा बांधलेला चौकोनी बुरूज लागतो. भक्कम बांधणीच्या या बुरूजास ‘चाँद- सूरज’ बुरूज म्हणतात. कारण या बुरूजाच्या तटबंदीच्या आतील भागावर दगडांच्या चौथ्या रांगेत चंद्र व सूर्याच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. याव्यतिरिक्त असाच एक भक्कम बुरूज गडाच्या पश्चिम टोकाला आहे.

गडावर एक मशीद आहे. त्याच्याजवळ जी गुहा आहे, ती म्हणजे ‘मार्कडेय ऋषींची गुहा’, त्यांचे तप:स्थान. आज मात्र ती ‘लुगडबंद फकिराची कबर म्हणून ओळखली जाते. मशिदीजवळच महाद्वाराचे अवशेष आहेत. याव्यतिरिक्त गडाला पन्हाळ्याच्या बाजूकडे एक भव्य दरवाजा होता. 

पुढे सन १८४४ साली गडकऱ्यांच्या बंडावेळी इंग्रजांनी पन्हाळगड गडकऱ्यांच्या ताब्यातून घेतला, त्यावेळी गडक-यांनी या पावनगड किल्ल्यावर आश्रय घेऊन इंग्रजांशी झुंज दिली. अखेरीस इंग्रजांनी या किल्ल्याचा पाडाव केलाआणि महाद्वार, मंदिराशेजारचा राजप्रासाद या सर्व वास्तू किल्ला भग्न केला. 

इतिहास आणि स्थापत्याच्या पवित्र स्फूर्तिदायी खुणा जपत आजही पावनगड पन्हाळ्याच्या साथीला उभा आहे.

हा किल्ला शिलाहार भोज राजाने बांधला असे मानले जाते. कारण त्याने निर्मिलेल्या किल्ल्यांच्या यादीत पावनगडाचे नाव आहे. ते काही का असेना, पण साधारण १६७३ च्या आसपास पन्हाळगड जिंकल्यानंतर शिवरायांनी हा गड पूर्णतः नव्याने बांधून घेतला हे निश्चित ! 

अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जद यांनी शिवरायांच्या आज्ञेने हा दुर्ग बांधला, असे उल्लेख ताराबाईंच्या काळातील अस्सल कागदपत्रांत उपलब्ध आहेत.  दुर्गबांधणीसाठी दोघांनाही महाराजांनी पाच-पाच हजार होन बक्षीस दिले होते.

पन्हाळा व पावनगड हे दोन किल्ले वेगळे असले तरी पावनगड हा पन्हाळाचाच एक भाग असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. पन्हाळागडाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असले तरी पावनगडाला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.

इतका मोठा इतिहास लाभलेला पन्हाळ्याचा हा सोबती आज मात्र उपेक्षेचे जिणे जगतोय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.