३० वर्षांपूर्वी यूपीत सेनेचा आमदार निवडून यायचा. दाऊदपर्यंत त्याची दहशत होती
नव्वदच्या दशकाचा काळ, मुंबई मध्ये एक पत्रकार परिषद सुरु होती. मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. एक मिशीधारी तगडा माणूस बोलत होता,
“अगर बालासाहेब ठाकरे का एक बाला भी बांका हुआ तो मैं कसम खाता हूं की 24 घंटे के भीतर दाऊद इब्राहिम को पाकिस्तान में मार दूंगा.”
पाकिस्तानात घुसून दाऊदला मारण्याची घोषणा करणारा हा माणूस होता, पवन कुमार पांडे. हा कोणी साधा सुधा व्यक्ती नव्हता तर तो शिवसेनेचा उत्तरप्रदेश मधला आमदार आणि बाबरी मशीद पाडण्याच्या कटाचा मुख्य आरोपी.
उत्तर प्रदेश मध्ये शिवसेनेचा आमदार म्हटल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरं होतं. पवनकुमार पांडे कट्टर शिवसैनिक होता आणि बाळासाहेब त्याला आपला मानसपुत्र मानायचे.
उत्तरप्रदेशमधल्या आंबेडकर नगर जिल्ह्यात कोतवा मोहमद्पुर गावचा रहिवासी. हिंदुत्ववादी विचारांनी भारावून गेलेला. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे हे त्याच्या डोक्यात फिट बसलेलं. युपीच्या पूर्वांचल भागात त्याची ओळख बाहुबली अशी होती. त्याच्या शब्दावर रस्त्यावर उतरणारे शेकडो तरुण पवनकुमारच्या सोबत असायचे.
१९८६ साली खुद्द बाळासाहेबांच्या उपस्थितीत त्याचा शिवसेना प्रवेश झाला होता. तिथून त्याची धडाकेबाज राजनैतिक कारकीर्द सुरु झाली. त्याला उत्तरप्रदेश शिवसेनेचा अध्यक्ष करण्यात आलं.
याच काळात बाबरी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला होता. शाहबानो प्रकरणात बॅकफूटला गेलेल्या राजीव गांधींच्या सरकारने हिंदूंची मते आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून विवादित मशिदीला लावलेले कुलूप उघडले आणि तिथे राम मंदिर झाले पाहिजे या मागणीने जोर पकडला. खुद्द काँग्रेस सरकार या मागणीच्या पाठीशी होते पण निवडणुकांचा विचार करत त्यांनी सावधानतेने पाऊल टाकण्यास सुरवात केली.
याचा फायदा उचलला भाजपने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत कारसेवा सुरु करण्यात आली. लाखो लोक अयोध्येला जाऊन विवादित स्थळी कारसेवा करण्यासाठी जाऊ लागले. भाजपच नेतृत्व आक्रमक समजल्या जात असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या कडे आले, त्यांनी प्रमोद महाजन यांच्या सल्ल्याने देशभरात राम रथ यात्रा सुरु केली.
राम मंदिराचा मुद्दा प्रचारात जोर पकडत होता.
पवन पांडे आणि त्यांचे साथीदार पूर्वीपासून या प्रश्नासाठी लढत होतेच. त्यांनी देखील या आंदोलनात उडी घेतली. प्रमोद महाजन यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भाजपमध्ये आक्रमक हिंदुत्व स्वीकारायला लावलं त्याप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती करायला लावली हत्ती. सेनेच्या सोबतीमुळे भाजपच्या हिंदुत्वाला धार आली. बाळासाहेबांसारख्या एक लोकप्रिय व खंदा वक्ता त्यांना हिंदुत्वाच्या प्रसारासाठी मदतीला आला.
साधारण १९८९च्या दरम्यान पवन कुमार पांडे श्रीराम जन्मभूमि न्यास चे अध्यक्ष रामचंद्र परमहंस यांच्या संपर्कात आले. या रामजन्मभूमी आंदोलनाच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पवन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नाव घेतले जाऊ लागले.
ज्यावेळी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येत जमलेल्या कारसेवकांवर गोळीबार केला तेव्हा पवनकुमार पांडे मरता मरता वाचले. त्यांना या आंदोलनाच्या दरम्यान १७ वेळा जेल झाली. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली होती कि १९९१ सालच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कंबरपूर मतदारसंघातून त्यांनी सहज विजय मिळवला.
६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी आंदोलनातील प्रमुख नेत्यांची दिगंबर आखाड्यात जी मिटिंग झाली त्यात अडवाणी, उमा भरती, अशोक सिंघल यांच्यासोबत पवन पांडे देखील हजर होते. तिथे बाबरी मशीद पाडायची कि नाही यावरून बरेच मतभेद झाले.
पण दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालण्यास नेत्यांना जमले नाही. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,गुजरात, महाराष्ट्र या भागातून आलेल्या शेकडो कारसेवकांनी भाले कुदळे खोरी वापरून ती वादग्रस्त मशीद पाडून टाकली. हे चालले असताना नेते मंडळींपैकी फक्त पवनकुमार पांडे स्वतः तिथे हजर होते. त्यांच्या देखरेखीखालीच बाबरी पाडण्यात आली.
ते सांगतात की
“मी स्वतः या कार्यकर्त्यांना चित्रकूट पर्वतावर घुमटावर चढायचं प्रशिक्षण देऊन आलो होतो. जेव्हा कारसेवक पहिल्या घुमटावर चढले तेव्हा सुरवातीला माइकवरून कोणीतरी उतरण्याचं आदेश देत होते पण आम्ही ऐकलं नाही. पहिला घुमत पडल्यावर मात्र माइकवरून आवाज येऊ लागला एक धक्का और दो बाबरी को तोड दो.”
बाबरी पडली आणि देशभरात हलकल्लोळ उठला. संपूर्ण जगभरातल्या वर्तमानपत्रात हेडलाईनला हि बातमी होती. कित्येक विचारवंतांनी देशाच्या सर्वधर्म समभावतेला या घटनेमुळे धक्का पोहचल्याचा दावा केला. कित्येकांनी याचा निषेध देखील केला.
पुढे जेव्हा याबद्दल केस उभी राहिली तेव्हा लालकृष्ण अडवानी व इतर भाजप नेत्यांनी बाबरी पाडण्यात आम्ही नव्हतो अशी भूमिका घेतली. भाजप उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी तर विधान केले की बाबरी भाजपच्या नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाडली.
बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले,
“जर असं असेल तर आम्हाला माझ्या शिवसैनिकांचा अभिमानच वाटतो !”
जेव्हा इतर नेते बाबरीकांडामधून आपले हात वर करत होते तेव्हा बाळासाहेब व शिवसेना हे एकमेव असे नेते होते ज्यांनी खुलेआम मान्य केलं कि आम्ही बाबरी पाडली. त्यांच्या पक्षातल्या पवन कुमार पांडे यांचं नाव प्रमुख आरोपींच्या यादीत वरच्या स्थानावर झळकत राहिलं.
पवन कुमार पांडे यांनी याचा कधी इन्कार देखील केला नाही. त्यांचा दावा होता की मीच बाबरीच्या मीरचा दगड मीच हातोड्याने तोडला. त्याचा एक भाग अजूनही माझ्या जवळ आहे तर उरलेला भाग सीबीआय कडे आहे.
बाबरी मशीद पाडल्या नंतर देशभरात हिंसाचाराचा डोंब उसळला. मुंबईत देखील मोठी धार्मिक दंगल झाली. जाळपोळी मध्ये शहराचे प्रचंड नुकसान झाले. कित्येकांची घरे जाळून खाक झाली, अनेकांना जीव गमवावा लागला. याची परिणीती मुंबईच्या १९९३ सालच्या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये झाली.
अंडरवर्ल्ड गँगस्टरची मदत घेऊन पाकिस्तानच्या आयएसआयने मुंबईत १३ जागी बॉम्बस्फोट घडवून आणले. टायगर मेमन हा प्रमुख आरोपी होता तर मुंबईचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने दुबईत बसून हि योजना आखली होती. मुंबईत मेलेल्या शेकडो निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला दाऊद बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानला पळून गेला व तिथे त्याने आश्रय घेतला.
देशभरातून त्याच्यावर प्रचंड टीका झाली. दाऊदला मुसक्या बांधून आणायच्या घोषणा झाल्या. बाळासाहेबांनी आपल्या सभांमधून दाऊदला देशद्रोही म्हणत प्रचंड झोडपले. दाऊदला सहानुभूती असण्यार्यांवर देखील त्यांनी त्वेषाने टीका केली.
याचा परिणाम त्याकाळी दाऊदच्या गॅंगमध्ये असणाऱ्या छोटा राजनने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांना धमकी दिली.
तेव्हा मुंबईला आलेल्या पांडेनी पत्रकार परिषद घेऊन छोटा राजनला उत्तर दिले की बाळासाहेबांच्या केसाला जरी धक्का पोहचला तरी पाकिस्तानात घुसून २४ तासांमध्ये दाऊदचा खात्मा करेन.
हि पत्रकार परिषद प्रचंड गाजली. हे साध्या कार्यकर्त्याच विधान नव्हतं तर शंभरच्या वर गुन्हे असणारा कित्येक खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाऊन आलेला युपीच्या बाहुबलीची घोषणा होती. असं म्हणतात की युपीच्या आडव्या डोक्याच्या बाहुबलींची दहशत गँगस्टर लोकांमध्ये आधीपासून होती, त्यात पवन कुमार पांडेने थेट दिलेल्या धमकी मुळे पाकिस्तानात दाऊदची सिक्युरिटी वाढवण्यात आली.
दाऊदचं बाहेर पडायचं देखील पूर्णपणे बंद झालं.
पुढे काळाच्या ओघात पवन कुमार पांडे मायावतींच्या बसपामध्ये गेले, मध्यंतरी त्यांनी थेट वरून गांधींच्या विरोधात सुलतानपूर येथून निवडणूक लढवली होती. मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला तरी आजही त्यांचे पूर्वांचल भागात मोठे वजन आहे. त्यांचा भाऊ व पुतणे हे देखील राजकारणात असून त्यांनी देखील निवडणुका जिंकलेल्या आहेत.
आज हे बाहुबली पांडे कुटूंबीय योगींच्या आग्रहामुळे भाजपमध्ये गेलेले आहे. अजूनही तिथल्या राजकारणात पांडेंचा दरारा मोठा समजला जातो. पण पवनकुमार पांडेंची देशाच्या राजकारणाला ओळख बाबरी पाडणारा आणि दाऊदला धमकी देणारा शिवसेनेचा कार्यकर्ता अशीच आहे.
हे हि वाच भिडू.
- देशाच्या पातळीवर शिवसेना कुठे आहे?
- खरंच शिवसेना सेक्युलर बनत चालली आहे का ?
- भिवंडीच्या मोहल्ल्यात छत्रपतींची मिरवणूक निघाली. अग्रभागी होता सेनेचा वाघ साबीर शेख.
- या मुख्यमंत्र्यामुळे भिवंडीमध्ये तब्बल १२ वर्षांनी शिवजयंती साजरी होऊ शकली..