काय आहे, पवनराजे निंबाळकर खून खटला..!
गेल्या चार दिवसात पुन्हा पवनराजे निंबाळकर खून खटल्याचे नाव माध्यमांमधून झळकू लागले. यावेळी कारण ठरलं ते अण्णा हजारेंची साक्ष. कोर्टात साक्ष देण्यासाठी अण्णा हजारें उपस्थित राहणार अशी ती बातमी. यानिमित्ताने पुन्हा या प्रकरणाने वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जागा मिळवली.
२००६ च्या जून महिन्यात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर कळंबोलीच्या ठिकाणी पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळी झाडण्यात आला. या हत्येने फक्त उस्मानाबाद जिल्हाच नाही तर संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता. दबक्या आवाज चर्चा चालू झाली ती हा खूनातील आरोपीची. गेल्या काही वर्षात चुलत भावांमधील गेलेले विकोप्याच वातावरण या हत्येला कारणीभूत आहे अशी ती चर्चा.
काय होता पवनराजे निंबाळकर खून खटला ?
हा प्रश्न पडण्याअगोदर “डॉक्टर” समजून घ्यायला हवेत.
२००४ सालची विधानसभा इलेक्शन. डॉ. पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर. मतदानाचा दिवस उजाडला. यावेळी काट्याची लढत होती. सकाळ सकाळी पेपरचे गठ्ठे पोहच झाले. ज्यांच्याकडे जनप्रवास नव्हता अशा लोकांच्या घरात देखील तो पेपर पोहचला. पेपरमध्ये बातमी होती पवनराजे निंबाळकरांचा डॉ. पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ?
बातमीसमोर प्रश्नचिन्ह होतं. पण अशा दिवशी प्रश्नचिन्ह वाचलं जात नाही. चर्चा सुरू झाली. पवनराजेंचे कार्यकर्ते दिसेल त्या बसवर पाठिंबा दिला नाही म्हणून लिहू लागले. तरिही इलेक्शन काट्यातच झालं. पवनराजे निंबाळकर अवघ्या ४८४ मतांनी पराभूत झाले. विधानसभेसाठी फक्त ४८४ मते. (संदर्भ लोकसत्ता दिवाळी अंक २०१४ उस्मानाबादेतील भयपर्व)
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात जाण्याची हिंम्मत तशी कुणाच्यातच नव्हती.
बुलेट आणि घोडा ठरलेला असायचा. आजही बुलेट आणि घोडा हे समीकरण आहेच. डॉक्टर म्हणजे बॉडीबिल्डर माणूस. त्यांची नजरच खूप गोष्टी सांगून जायची. उस्मानाबादच्या वातावरणात जी दहशत होती ती डॉक्टरांचीच. डॉक्टर बुलेटवर चालले तर कधी कोणी त्यांना आडवं गेल अस आजही ऐकीवात नाही. उस्मानाबाद मधली हि दहशत फक्त उस्मानाबाद पुरती मर्यादित नव्हती. अगदी मुंबईच्या दरबारात देखील डॉक्टरांची हिच दहशत होती. अस सांगतात की जेव्हा भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिक भुजबळांच्या मागावर होते. तेव्हा भुजबळांची सोय करण्याची जबाबदारी डॉक्टरांकडे होती.
डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. उर्जामंत्री, गृहमंत्री अशा पदावर ते राहिले तेव्हा जिल्ह्यातला कारभार आपसुक पैपाव्हण्याकडे आला. पण हे सर्व डॉक्टरांच्या मर्जीतले होते. राज्याच्या राजकारणात डॉक्टरांच चालत होतच पण जिल्ह्याच्या राजकारणात देखील फक्त डॉक्टरांचच नाव घ्यायला लागायच. याच काळात डॉक्टरांचे चुलतबंधु पवनराजे निंबाळकर यांच्याकडे जबाबदारी टाकण्यात आली. लोकं अस सांगतात की,
डॉक्टर मुंबईत असायचे आणि इकडे कुणाच्या घरात मयत झालं, कुणाच्या घरात लगीनकार्य असलं तर पैसै द्यायची जबाबदारी पवनराजे निंबाळकराकडे असायची. पवनराजे यांच्या हातात हळुहळु संपुर्ण कारभार आला. याच कारभारातला मुख्य कणा होता तो तेरणा कारखाना.
तेरणा कारखाना हा पद्मसिंह पाटलांचा कणा होता.
हळुहळु संस्थाचा कारभार पाहण्यास सुरवात झाली. कालांतराने भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर येवू लागली आणि पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यात वैमनस्य सुरू झाले. डॉक्टरांचे कारखाने, दुधसंस्था, सहकारी संस्था यांचा कारभार पवनराजेच पहाच होते. तेरणा कारखान्याचा साखर निर्यात घोटाळा, कारगिल निधी घोटाळा, तेरणा बॅकेचा होम ट्रे़ड घोटाळा, भूकंप निधी घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिकाच होती.
कारगिल युद्धासाठी सहाय्य करण्यात येणार होते. त्यासाठी सर्व सहकारी साखर कारखान्याकडून रक्कम गोळा केली जात होती. तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांकडून देखील अशी रक्कम गोळा करण्यात आली. मात्र ती कारगिल सहाय्यता निधीत गेलीच नाही. या प्रकरणावर न्या. सावंत आयोग नेमण्यात आला तेव्हा साक्षीदारांना धमक्या देण्यात आल्या. त्याचवेळी तेरणा साखर कारखान्यात साखर निर्यात घोटाळा झाला होता. त्यामध्ये पवनराजे निंबाळकर मुख्य आरोपी होते. ३० कोटी रुपयांच्या होम ट्रेड घोटाळ्यात देखील पवनराजेच मुख्य आरोपी होते. एकामागून एक भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत होती. हे भ्रष्टाचार डॉक्टरांच्या संमतीशिवाय होणं अशक्य असल्याच मत लोकांमध्ये निर्माण होत होतं.
या प्रकरणातूनच पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर यांच्यात उभी फूट पडली होती.
भ्रष्टाचाराचं स्वरुप पाहून या विरोधात मैदानात उतरले ते अण्णा हजारे. भ्रष्टाचाराच्या विरोधात २००३ सालापासून अण्णा हजारेंनी नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन याच्याविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. अण्णांनी त्या विरोधात मुंबईत उपोषण देखील केले. यावेळी पद्मसिंह पाटलांच्या विरोधात आणि प्रामुख्याने तेरणा कारखाना, बॅंक, कारगिल निधी या संबधित सर्व इंत्यभूत माहिती पवनराजेंकडूनच जात असल्याचा संशय वाढत गेला. अण्णांच्या आंदोलनानंतर जिल्ह्यात पडलेली फूट राज्यभर चर्चेचा विषय होवू लागली.
२००४ च्या विधानसभा निवडणुका लागल्या. ज्या डॉक्टरांनी आजपर्यन्त दहशत बसवली होती त्याचा खिंडार पाडण्याच काम पवनराजेंची केलं. पवनराजेंचा अवघ्या ४८४ मतांनी झालेला पराभवच पद्मसिंह पाटलांना दिलेली टक्कर सांगून जातो.
दोघांमध्ये तापलेलं वातावरण कायम होत. अशातच २००६ चा जून महिना उजाडला. पुणे मुंबई हायवेवर कळंबोळी नजीक काही गुडांनी पवनराजे निंबाळकरांवर गोळ्या झाडल्या.
ताणलेल्या संबधातून पवनराजेंच्या खूनाचा संशय डॉक्टरांकडे गेला. महाराष्ट्र पोलीसांकडे हि केस होती. मात्र डॉक्टरांची चौकशी देखील करण्यात आली नाही. निंबाळकर कुटूंबाने हत्येची CBI चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दोन वर्षांनंतर तपासाची सुत्रे CBI कडे देण्यात आली.
CBI च्या आरोपपत्रात तेरणा साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागातील सतीश मंदाडे आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा माजी अधिकारी व डोंबवलीचे तत्कालीन नगरसेवक मोहन शुक्ल यांनी पवनराजेंना मारण्याचा कट रचल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरांच्या सांगण्यावरुन हा कट रचल्याची CBI च्या आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलं आणि २००९ ला डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्याच मध्यरात्री डॉक्टरांना अटक केल्याची माहिती CBI ने दिली. नव्याने निवडुन आलेल्या लोकसभेत लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांनी खून खटल्यात खासदार पद्मसिंह पाटलांना अटक केली असल्याची माहिती दिली.
डॉक्टरांनी चौकशीत मात्र ते माझे नातलग होते त्यांना मी कशाला मारील असेच आणि इतकेच उत्तर दिले. कालांतराने डॉक्टरांना जामीन मंजूर झाला. २००९ च्या लोकसभेत मिळालेला विजय मात्र २०१४ च्या इलेक्शनमध्ये टिकू शकला नाही. मोदी लाटेत डॉक्टरांचे वर्चस्व संपले आणि तिथून सेनेचे रवी गायकवाड निवडून आले. २०१९ च्या लोकसभा इलेक्शनमध्ये ओमराजे निंबाळकरांनी विजय मिळवला. गेल्या पाच दहा वर्षात उस्मानाबादकरांनी राजकारणाचं स्थित्यंतर अनुभवल.
हे ही वाच भिडू.
- म्हणून ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशी देण्यात आली नव्हती.
- राज्यात सरकार कुणाचंही असो युपीमध्ये कायदा चालतो तो राजा भैय्याचाच !
- या पाच जणांच्या दहशतीने तुळशीबाग देखील ७ वाजताच बंद व्हायची !
- गावीत बहिणींच नाव काढलं तरी आज महाराष्ट्रातला प्रत्येकजण भितीने कापतो