घोडेबाजारवरून आठवलं, पवारांनी एकदा घोड्यांच्या रेसमध्ये ५ रुपये लावून अन् ५५ रुपये जिंकलेले

राज्याच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द चर्चेत आलाय. घोडेबाजार चर्चेत येण्याच कारण आहे राज्यसभेच्या निवडणूका. आत्ता या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले साडेबारा कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सन्माननीय सभागृहाचे आम्ही प्रतिनिधी आहे त्यामुळे घोडेबाजार हा शब्द वापरून अपमान करू नका अस त्यांनी सुनावलं आहे.

पण याच शब्दावरून शरद पवारांचा एक किस्सा आठवला. पवारांनी देखील एकदा घोड्यांच्या रेसमध्ये पैसे लावले होते अन् पवार जिंकले सुद्धा होते त्याचाच हा किस्सा.. 

तर ही गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली..

त्याकाळात विधानसभेत हाणामाऱ्या व्हायच्या नाहीत. अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या. प्रश्नोत्तरे व्हायची. एखाद्या शिस्तबध्द शाळेप्रमाणे अधिवेशनं चालायची. या शाळेचे हेडमास्तर म्हणजेच विधानसभेचे अध्यक्ष होते बॅ. शेषराव वानखेडे.

राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात जेष्ठ नेत्यांपैकी एक असलेले शेषराव वानखेडे सभागृहातील चर्चा गंभीरपणे चालाव्यात म्हणून आग्रही असायचे. पण त्यांची विनोदबुद्धी देखील ताजीतवानी होती. कधी विधानसभेत एखादी चर्चा तापली की वातावरण कसं हलकं करायचं आणि जर चर्चा त्यांना बरोबर ठाऊक होतं. 

असचं एकदा अधिवेशन सुरु होतं आणि प्रश्न विचारायला एक तरुण आमदार उभा राहिला. शरद पवार त्याच नाव. त्यांची विधानसभेतील ही पहिली किंवा दुसरीचं टर्म असावी. यशवंतराव चव्हाणांचा चेला अशी त्यांची ख्याती तेव्हाचं पसरलेली होती. आपल्या सरकारला प्रश्न विचारण्यातही ते मागे पुढे पहायचे नाहीत.

त्या दिवशी शरद पवारानां मुंबईच्या रेसकोर्स संदर्भात एक प्रश्न विधानसभेत उपस्थित करायचा होता. पण ते जेव्हा त्यांनी आपल्या प्रश्नाला सुरवात केली तेवढ्यात वानखेडे यांनी त्यांना थांबवलं आणि विचारलं,

“प्रश्नाचा अभ्यास झालाय का?”

शरद पवारांनी मान डोलावली. त्यांनी विधानभवनाच्या लायब्ररीमध्ये बसून मुद्दे काढून अभ्यास केल्याच सांगितलं. वानखेडे म्हणाले,

“ते सगळ ठीक आहे पण तुम्ही कधी रेसकोर्सला गेला आहात का यापूर्वी?”

बारामतीसारख्या आडगावच्या शेतकरी कुटुंबातून आलेले शरद पवार कधीही रेसकोर्सला गेलेले नव्हते. पुण्यात कॉलेजमध्ये असतानाही गावी परत जाताना रेसकोर्स दिसायचं पण तिथे घोड्याच्या शर्यतीवर पैसे लावले जातात आणि हा एक जुगार आहे असच त्यावेळी त्यांना वाटायचं. तसेचं संस्कार घरातून झालेले होते.

पवारांनी नकारार्थी मान डोलावली. वानखेडेनी आदेश दिला उद्या माझ्या घरी या. 

दुसऱ्या दिवशी शरद पवार त्यांच्या घरी गेले. तिथे वानखेडेनी त्यांना आपल्या गाडीत बसवलं. हे दोघे मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर आले. आत वानखेडे त्यांना आत घेऊन गेले. तिथली सगळी व्यवस्था समजावून सांगितली. पवार एखाद्या उत्साही विद्यार्थ्याप्रमाणे सगळ टिपून घेत होते. तेव्हड्यात प्रश्न आला,

“शरदराव घोड्याच्या शर्यतीवर पैसे लावायचे काय? “

शरद पवार घाबरून सांगू लागले,

“सर घरी कळाल तर मार खाव लागेल.”

पण शेषराव वानखडे ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हते. त्यांनी शरद पवारांच्या तर्फे एका घोड्यावर ५ रुपये लावले. ती शर्यत सुरु झाली. अनिच्छेने का होईना पण यात पडलेले पवार आता मात्र उत्सुकतेने आपल्या घोड्याच्या कामगिरी वर लक्ष ठेवून होते.

योगायोगाने पवारांच्या नावाने पैसे लावलेला घोडा जिंकला.

त्या ५ रुपयांचे ५५ रुपये झाले. विधानसभा अध्यक्ष आणि त्यांचा आज्ञाधारक शिष्य आमदार यांचा जल्लोष तेव्हा रेसकोर्सवर सगळ्यात जास्त होता.

खेळाच्या बाबतीत अगोदर पासून चौकस असणारे शेषराव वानखेडे पुढे जाऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले आणि पुढे अनेक वर्षांनी त्यांचा हा शिष्य शरद पवार देखील बीसीसीआयचा अध्यक्ष झाला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.