रात्रीच्या अंधारात हवेत उडणाऱ्या या ‘रशियन चेटकीणीं’ मुळे नाझी सैनिकांनी झोपणेच बंद केले होते.

नाही ही काही भूत,प्रेत,जादूटोण्याची कथा नाही.ही परीकथाही नाही. ही कथा आहे बलाढय जर्मन सैन्याची झोप उडवणाऱ्या रशियन महिला रेजिमेंटची. जर्मनीच्या नाझी सैन्याने या रेजिमेंटची येवढी धास्ती खाल्ली होती की त्यांनी या रेजिमेंटला ‘रात्रीच्या चेटकीणी’ असे नाव ठेवले होते.

या चेटकिणी रात्री येऊन आपला जीव घेतील या भीतीने नाझी सैनिकांनी रात्रीचे झोपणेच बंद केले होते.

या रेजिमेंटचे पूर्ण नाव ‘५८८ वे नाईट बॉम्बर रेजिमेंट’ असे होते.नंतर रशियाच्या तमान प्रातांत केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे या रेजिमेंटचे नाव बदलून ‘४६ वी तमान गार्डस नाईट बॉम्बर एविएशन रेजिमेंट’ असे ठेवण्यात आले.रशियन वायुदलाच्या या रेजिमेंटमध्ये फक्त महिलांचा समावेश होता. १९४१ साली स्थापन झालेली ही रेजिमेंट १९४५ पर्यंत कार्यरत होती.
images 39
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर अनेक रशियन महिला सैन्यात भरती झाल्या होत्या. महिलांना थेट युद्धभूमीवर लढण्याची परवानगीही होती. मात्र ती फक्त कागदोपत्री. महिलांना युद्धभूमीवर पाठवणे टाळले जायचे. याबाबत मेजर मरिना रासकोव्हा यांनी रशियाचे अध्यक्ष स्टालिन यांच्याशी बोलून महिला वैमानिकांची रेजिमेंट स्थापन करण्याची परवानगी मिळवली. यानुसार वायुदलात ३ महिला रेजिमेंट स्थापन करण्यात आल्या.

सुरवातीच्या काळात या महिला वैमानिकांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही.

त्यांना मुद्दामून जुने गणवेश,वापरलेले ढगळ बूट देण्यात आले. इतकेच नाही तर त्यांना रेडिओ,चांगल्या बंदुकी,रडार देण्याऐवजी पेन्सिल,पट्टी आणि फ्लॅशलाईट असे सामान देण्यात आले. असे असले तरीही या महिलांनी चिकाटी सोडली नाही.
आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९४२ साली थेट युद्धभूमीवर प्रवेश केला.पण तरीही या महिला वैमानिकांच्या समस्या संपल्या नव्हत्या.
या रेजिमेंटला पोलीकार्पोव्ह पो २ नावाचे विमान देण्यात आले होते. या विमानाची फ्रेम ही लाकूड आणि कॅनव्हास पासून बनवण्यात आली होती. यामुळे हे विमान खूप जड तर होतेच त्याशिवाय संथ गतीने उडत होते. गंमत म्हणजे युद्धाआधी अशा प्रकारची विमाने पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी वापरली जात.असे असले तरी या महिला वैमानिकांनी हार मानली नाही.

अशी जड विमाने घेऊनच त्यांनी नाझी सैन्याला धडकी भरवली .

त्यांना प्रशिक्षणा दरम्यान कळून चुकले की ही विमाने खूपच जड आणि संथ आहेत. पण त्याचवेळी त्यांना हेही कळाले की ही विमाने इंजिन बंद करून ग्लाइड केल्यास (तरंगत ठेवल्यास) त्यांचा आवाज कमी येतो.तसेच आकाराने लहान असल्याने शत्रूच्या रडारमध्येही दिसत नाहीत.झाले तर तमान रेजिमेंटच्या महिला वैमानिकांनी याच दोन गोष्टींचा फायदा घेण्याचे ठरवले.

PAY Night Witches

या महिला शत्रूचे ठाणे जवळ आल्यावर इंजिन बंद करून विमान तरंगत ठेवत. हे विमान तरंगत ईप्सित ठिकाणी पोचल्यावर अचूक अंदाज घेऊन बॉम्ब फेकत.या विमानांच्या बॉम्ब हल्ल्यांनी नाझी सैन्याची अक्षरशः भंबेरी उडाली.नेमकं काय होतय हे कळायच्या आताच सर्व काही राखरांगोळी होत असे. त्यांना सावरायलाही वेळ मिळत नसे.
नाझी वायुदल ‘लुफ्तवॉफ’ची विमाने तमान रेजिमेंटच्या संथ विमानांचा पाठलागही करू शकत नव्हती.
कारण नाझी विमाने वेगाने उडण्यासाठीच बनवली गेली होती. तमानच्या विमानांचा पाठलाग करायचा तर त्यांना स्वतःचा वेग कमी करावा लागणार होता पण वेग कमी केल्यास क्रॅश होण्याची शक्यता दाट होती.त्यामुळे नाझी सैन्याकडे अँटी एयरक्राफ्ट गन्सवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.
केवळ रात्रीच्या वेळी मोहिमा करणे ही या रेजमेंटची खासियत होती.रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शत्रूच्या ठाण्यांवर अचूक हल्ला केले जात असत.तमानची विमाने जवळ आली की नाझी सैनिकांना फक्त झाडू मारताना येणार आवाज यायचा.इंजिन बंद करून हवेत ग्लाइड करणाऱ्या या विमानांच्या लाकडी फ्रेमला वारा घासून असा आवाज निर्माण होत असे.त्याकाळात रात्रीच्या वेळी चेटकीण झाडूवरून आकाशात उडते अशी समजूत होती.

म्हणूनच नाझी सैन्याने त्यांना ‘रात्रीच्या चेटकीणी’ असे नाव ठेवले होते.

१९४२ ते १९४५ या कालावधीत या रेजिमेंटमध्ये एकूण २६१ महिला वैमानिक होत्या.या रेजिमेंटने ८०० हून अधिक मोहिमा फत्ते केल्या तर सुमारे ३००० टनांचा दारुगोळा वापरुन नाझी सैन्याचे १७ छोटे पूल,९ रेल्वे,२ रेल्वेस्टेशन,१७६ मिलिटरी गाड्या,१२ इंधन डेपो,११ टेहळणी दिवे हे उध्वस्त केले होते.एका मोहिमेत तर रशियन विमानातील बॉम्ब खाली पडण्या ऐवजी तिथेच लटकू लागला.यावेळी एका धाडसी महिला को-पायलटने अक्षरशः फिल्मी स्टाईलमध्ये हवेत उडणाऱ्या विमानातुन मॅन्युअली हा बॉम्ब खाली टाकला.
अनेक अडथळे असताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या रशियन महिला बलाढय नाझी सैन्याला पुरून उरल्या
  • पिनाक कल्लोळी (गोवा)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.