वाजतगाजत आलेला पेटीएमचा आयपीओ, फुसका बार ठरलाय

येणार येणार म्हणत पेटीएमनं १८ नोव्हेंबरला शेअर मार्केटमध्ये एन्ट्री मारली. पेटीएम मार्केटमध्ये आणि तुमच्या आमच्या फोनमध्ये आलं तेव्हाही जितका गाजावाजा झाला नव्हता, तितका गाजावाजा पेटीएमच्या आयपीओचा झाला.

कंपनीचे सीईओ आशिष चौहान यांच्या मते पेटीएमचा आयपीओ हा आशिया पॅसिफिक फिनटेकमधला सगळ्यात मोठा आयपीओ आहे. कारण पेटीएमनं तब्बल १८ हजार ३०० रुपयांचं भांडवल उभं करत आपला आयपीओ मार्केटमध्ये लॉंच केला. त्यामुळं निश्चितच तो देशातला सगळ्यात मोठा आयपीओ ठरला.

मोठ्या प्रतीक्षेनंतर, १८ नोव्हेंबरला मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा लिस्टिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पेटीएमचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा आणि मुख्य वित्तीय आधिकारी मधुर देवराही उपस्थित होते. गुंतवणूकदारांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. साधारण १.३९ लाख कोटी बाजारमूल्य असलेल्या पेटीएमनं आयपीओसाठी प्रति शेअर २०८० ते २१५० रुपये अशी किंमत निश्चित केली होती. गुंवणूकदारांचा मोठा उत्साह आणि नफ्याच्या आशेनं १.८९ पटीनं पेटीएमचा आयपीओ सबस्क्राईब झाला होता.

त्यामुळं बंपर लिस्टिंगमधून गुंतवणूकदारांना किती फायदा होतोय याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं…

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) या दोन्ही बाजारांमध्ये शेअर सूचिबद्ध झाला. मात्र इश्यू प्राईसपेक्षा कमी किंमतीवर शेअरची नोंद झाली. बीएसईमध्ये शेअर १९५५ रुपयांवर, तर एनएसईमध्ये शेअर १९५० रुपयांवर लिस्ट झाला. त्यानंतर, पुढच्या तासाभरात बीएसईमध्ये शेअर १७७७.५० रुपयांपर्यंत पोहोचला, तर एनएसईमध्ये १७७६ रुपयांपर्यंत घसरण झाली. त्यामुळं, गुंतवणूकदारांना प्रति शेअर २०० रुपयांचं नुकसान सोसावं लागलंय.

आयपीओ म्हणजे काय भिडू?

थोडक्यात सांगायचं झालं, तर कंपनीनं आपली हिस्सेदारी विकणं. कंपनी सामान्य लोकांना विचारते की तुम्हाला कंपनीचा भाग व्हायचंय का? मग कंपनी त्या लोकांना शेअर विकत घ्या असं सांगते. यालाच म्हणतात आयपीओ (Initial Public Offering). जेव्हा कंपनी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये जाते आणि लोकांना कंपनीचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करते, तेव्हा लोक कंपनीचा हिस्सा होतात. साहजिकच कंपनीची ओनरशिप छोट्या छोट्या हिश्श्यांमध्ये विभागली जाते. जेव्हा कंपनीला नफा मिळतो, तेव्हा तो याच छोट्या छोट्या हिश्श्यांमध्ये विभागला जातो.

पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी आपली ४०२.६५ कोटी रुपयांची हिस्सेदारी विकली, तर अँटफिन होल्डिंग्स, अलिबाबा, एसव्हीएफ पार्टनर्स यांनीही आपला मोठा हिस्सा विकला आहे.

यावर्षी भारतीय मार्केटमध्ये झोमॅटो, नायका असे मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले. यंदा मार्केटमध्ये आलेल्या जवळपास ६० टक्के आयपीओंनी गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला. पेटीएम मात्र शेअर बाजारातल्या आपल्या एंट्रीलाच अपयशी ठरलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.