त्या विद्यार्थ्यामुळे शाहू महाराजांनी बहुजन मुलांसाठी मराठा बोर्डिंगची स्थापना केली.

पांडुरंग चिमणाजी पाटील हे महाराष्ट्राच्या कृषी आणि साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव. राजर्षी शाहू महाराजांच्या अगदी जवळचे म्हणून ते ओळखले जायचे. शाहू महाराजांचे ते आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या बुद्धिमत्तेवर महाराज कायम खुश असायचे. पांडुरंग चिमणाजी पाटील अर्थात पी.सी.पाटलांबद्दल आज माहिती जाणून घेऊया.  

१९ जून १८७७ रोजी कोल्हापूर येतील वडगावमध्ये पी.सी.पाटलांचा जन्म झाला. १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ सायन्स मध्ये प्रवेश घेतला. पुढे कॉलेज ऑफ सायन्स मधील कृषी विभाग काढण्यात आला आणि त्याऐवजी १९०६ मध्ये कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. या महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे ते पहिलेच विद्यार्थी होते. पुढे याच महाविद्यालयात ते अधीक्षक म्हणून राहिले.

शेतकीची पदवी परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेल्या पाटील यांना शासनातर्फे १९१२ मध्ये इंग्लंड, डेन्मार्क येथे शेतीविषयक पाहणी व अभ्यासासाठी पाठवण्यात आले. याच अभ्यासावर, अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठातून पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी एम. एस्सी. पदवी संपादन केली.

१९२४ मध्ये सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ हि पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. मुंबई विद्यापीठाने त्यांच्या कृषी अर्थशास्त्रावरील प्रबंधाबद्दल त्यांना सुवर्णपदक व डी. एस्सी. बहाल केली.

मुंबई विद्यापीठात डी.एस्सी करणारे पी.सी.पाटील हे पहिलेच विद्यार्थी होते.

परदेशात शिक्षण घेत असताना पी.सी.पाटलांनी यू.एस.ए., कॅनडा, जपान आणि जाव्हा या देशांतील कृषी क्षेत्र परिस्थितीचा सूक्ष्मपणे आढावा घेतला. शेतीबद्दल त्यांना विशेष आकर्षण होतं.

सध्या महाराष्ट्रभरात जी ऊस लागवडीची सरीची मांजरी पद्धत जी आहे तिचा शोध हा पी.सी.पाटलांनी लावला होता. त्यांच्या या शोधाबद्दल त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डी.लिट.पदवी देऊन सन्मानित केले होते. जुन्या मुंबई राज्याचे पहिले कृषीसंचालक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

त्यांच्या सुरवातीच्या शिक्षण काळात १८९९ मध्ये त्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची फार गैरसोय होत असे.

त्यावर उपाय म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी १८ एप्रिल १९०१ रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली.

शाहू महाराजांच्या या निर्णयानंतर अनेक बोर्डिंग्स उभ्या राहिल्या. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी हे पी.सी.पाटील होते.

पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी आपल्या “माझ्या आठवणी” या आत्मचरित्रामध्ये शाहू महाराज यांच्याबद्दल लिहिलेली एक आठवण.
इ. स. १८९९ सालीं कोल्हापुरांत प्लेगने कहर केला होता. महाराजांचा कँप पन्हाळ्यास होता. पन्हाळगडाच्या तटाखाली क्वारंटाइन बसविले होते. किल्ल्यावर जर कोणास जावयाचे असेल तर त्याला दहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागे. कोणी जरुरीच्या सरकारी कामासाठी परवानगी मिळविली असली तरी त्याला आपले कपडे फिनाइलच्या पाण्यात बुडवून मग वर जावे लागे.
हे जाणून महाराजांनी कारंटाइन ऑफिसरला हुकूम दिला होता की, जर सरकारी घोडेस्वाराबरोबर पी. सी. पाटील नांवाचा मुलगा आला, तर त्याला थांबवून ठेवू नये, व त्याचे कपडे फिनाइलच्या पाण्यात भिजवू नयेत. घोडेस्वार व तट्टावर बसलेला मी असे तेथे आलेले दिसतांच कारंटाइन ऑफिसर पुढे आला. त्याने सांगितले, “तुम्हांस वर जाण्याची परवानगी खुद्द महाराजांनी दिली आहे.” नंतर आम्ही राजवाड्यावर गेलो.
हि त्यांची शाहू महाराजांबरोबर अत्यंत भावनिक आठवण आहे.

 

पाटील यांनी १९०८ मध्ये कृषी निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर शेतीच्या नव्या अवजारांच्या व शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचारकार्यास प्रारंभ केला. त्यांनी नव्या अवजारांच्या बरोबरच नव्या खतांचा व बियाणांचाही प्रचार केला. लोखंडी नांगर व इतर औतांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन त्यांत आवश्यक त्या सुधारणा सुचवून व त्याप्रमाणे किर्लोस्कर आदि कारखान्यांकडून सुधारित औते तयार करवून घेऊन त्यांचा शेतकऱ्यांमध्ये त्यांनी प्रसार केला.  

पांडुरंग चिमणाजी पाटील हे शिक्षणप्रसारासाठी अहोरात्र झटले. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी, शिवाजी मराठा सोसायटी, सत्यशोधक समाज व रयत शिक्षण संस्थेशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा मान पटकावणारी ते पहिलेच व्यक्ती होते.
हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.