एका झटक्यात ४५० डाकूंना शरण यायला भाग पाडलं आणि देशाचं गृहमंत्रीपद पटकावलं…

सत्तरच्या दशकातला काळ. आज ज्या प्रमाणे नक्षलवादाच्या समस्येने देशाला भेडसावलंय त्याप्रमाणे त्याकाळात डाकूंचा उपद्रव प्रचंड वाढला होता. विशेषतः उत्तर भारताच्या जंगलात हातात बंदुका घेऊन  घोड्यावरून फिरणाऱ्या डाकूंनी मोठी दहशत निर्माण केली होती. अगदी त्याकाळचे सिनेमे देखील डाकूंवर बनायचे.

बुंदेलखंड आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात लोक दिवस ढवळ्या प्रवास करायला घाबरायचे. डाकूंच्या टोळ्या वाढत चालल्या होत्या. त्यांच्याशी होणाऱ्या लढाईत अनेक पोलीस कामी येत होते. काही प्रसंगी डाकूंना स्थानिक लोकांची मदत देखील व्हायची, अशा परिस्थितित त्यांना आवर कसा घालायचा हा प्रश्न सरकारला देखील भेडसावत होता.

त्याकाळी मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते, प्रकाश चंद्र सेठी. देशभरात त्यांना पीसी सेठी म्हणून ओळखलं जायचं. अनेक दिग्गज नेत्यांना बाजूला सारून मुख्यमंत्रीपद पटकावणाऱ्या पीसी सेठी यांना एमपीच्या राजकारणातले गाजलेले खिलाडी म्हणायचे.

आणीबाणीचा काळ. या अनुशासन पर्वात पीसी सेठी यांनी काँग्रेसची सगळी धोरणं राबवून दिल्लीच्या श्रेष्ठींना खुश ठेवलं होतं. असं म्हणतात की ते याकाळात रोज सकाळी आपल्या सचिवांना बोलवायचे आणि विचारायचे

“आज नाश्ते में क्या है?”

या प्रश्नाचा अर्थ की आज किती नसबंदी होणार आहेत आणि आज किती जणांना अटक होणार आहे?

पी.सी.सेठी यांनी मध्यप्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्था अत्यंत कडक बनवली होती. पण डाकूंवर न मिळवता येणारे नियंत्रण त्यांना प्रचंड सतावत होते. त्याकाळी गांधीवादाचा वापर करून डाकूंचे मनपरिवर्तनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. विनोबांच्या आवाहनानुसार अनेक डाकू शरण देखील आले होते. पण पी.सी.सेठी यामुळे खुश नव्हते.

त्यांच मत होतं हातात बंदुका घेऊन फिरणाऱ्या डाकूंशी अहिंसेची भाषा बोलताच येत नाही. अनेक पोलिसांचा खून पिणाऱ्या डाकूंना त्यांना कळेल अशा भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.

एकदा अशीच एक मोठी चकमक झाली. मध्यप्रदेश पोलिस दलावर डाकूंच्या टोळीने हल्ला केला होता. कित्येकजण शहीद झाले. मुख्यमंत्री पी.सी.सेठी यांचा संताप अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात पहिली फ्लाईट पकडून दिल्ली गाठली.

दिल्लीत नॉर्थ ब्लॉक मध्ये असलेल्या गृहमंत्रालयाच्या ऑफिसमध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेतली. संजय गांधींचे काहीस नेते म्हणून त्यांना दिल्लीकर ओळखायचे त्यामुळे त्यांचं वाढत असलेलं महत्व अधिकारीवर्ग जाणून होता. पण डाकूंचा प्रश्न कसा सोडवता येईल याच उत्तर त्यांच्याकडे देखील नव्हतं.

मुख्यमंत्री महोदय म्हणाले,

“डकैतों के छिपने के इलाकों में, यानी बीहड़ में भारतीय वायु सेना बम गिरा दे. टंटा ही खत्म.”

अधिकाऱ्यांना धक्काच बसला. नागरी वस्तीच्या भागात मुख्यमंत्री बॉम्बवर्षाव करा म्हणून सांगत होते. आजवर जगाच्या इतिहासात असं कुठं झालं नसेल. पी.सी.सेठी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला पण ते ऐकायच्या मनस्थिती मध्ये नव्हते. अखेर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही तुम्ही संरक्षण मंत्रालयाला भेट द्या असं सुचवलं.

पी.सी.सेठी त्या बैठकीतून उठले ते थेट नॉर्थ ब्लॉकमधून तरातरा चालत साऊथ ब्लॉक मध्ये असलेल्या संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या ऑफिसला येऊन धडकले. 

जगजीवनराम यांनी कुशलमंगल विचारत त्यांची चौकशी पाहुणचार केला. पीसी सेठींनी आपली एअरफोर्सच्या विमानातून डाकुंवर बॉम्बवर्षाव करायची आयडिया त्यांना सांगू लागले. बाबू जगजीवनराम देखील अचंबित झाले. त्यांनी देखील नकार दिला.

मग सेठी यांनी आपलं ब्रम्हास्त्र बाहेर काढलं आणि बाबू जगजीवनराम यांच्या कानात काही तरी सांगितलं. संरक्षण मंत्र्यानी नाखुशीने का होईना या प्लॅनला हिरवा झेंडा दाखवला.

दुसऱ्याच दिवशी एअरफोर्सच्या मुख्यालयात चंबळ मधल्या डाकूंच्या विरोधातल्या गुप्त ऑपरेशनची तयारी सुरु झाली. मुख्यमंत्री सेठी कॉलर ताठ करून भोपाळला परत आले. या मोहिमेची सगळी माहिती गोपनीय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पण गंमत म्हणजे तिसऱ्याच दिवशी हि बातमी लीक झाली. मध्यप्रदेशच्या सगळ्या वर्तमानपत्रात हेडलाईन होती,

“मुख्यमंत्री पी.सी.सेठी डाकुंवर बॉम्बहल्ला करणार आहेत.”

डाकूंच्या पर्यंत ही बातमी पोहचली. कधी नव्हे ते त्यांना धडकी भरली. त्यांच्या गुप्त मीटिंग्ज झाल्या. सरकार हे पाऊल उचलणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली. जीव वाचवण्यासाठी यातील अनेक डाकूंनी शरणागती पत्करली, तर कित्येक जण चंबळमधून पळून गेले.

एअरफोर्सने आपला प्लॅन कॅन्सल केला. पण मुख्य प्रश्न उरला की एवढी गोपनीय असलेली मोहीम लीक कशी झाली?

असं म्हणतात की मुख्यमंत्री ऑफिसमधूनच हि बातमी वर्तमानपत्राकडे फोडण्यात आली होती. सेठी यांच्या डोक्यात बॉम्बहल्ला करायचं नव्हतंच. त्यांनी एअरफोर्सच्या मदतीने डाकूंना भीती घालायसाठी हा सगळं उपदयव्याप घडवून आणला होता. बाबू जगजीवनराम आणि ते या दोघांनाच या मोहिमेचा अंदाज होता.

पुढच्या काही काळात चंबळचे तब्बल ४५० खुंखार डाकू मध्यप्रदेश सरकारकडे शरण आले.  सरकारच्या रेकॉर्ड मध्ये मात्र गांधीवादी प्रयत्नांनी हे डाकू शरण आले अशी नोंद करण्यात आली मात्र तिथल्या सगळ्यांना ठाऊक होतं की सेठींच्या बॉम्बहल्ल्याच्या भीतीने सगळे डाकू बंदुका टाकत होते.

पीसी सेठी यांच्या कामगिरीमुळे खुश होऊन त्यांना केंद्रात मंत्री म्हणून बोलवण्यात आले. पण लवकरच इंदिरा गांधींनी आणीबाणी मागे घेतली आणि निवडणूक लावल्या. त्यात काँग्रेसचा पराभव झाला.

ऐंशीच्या दशकात जेव्हा इंदिरा गांधींनी कमबॅक केलं तेव्हा देशात वाढलेला अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न, पंजाबचा प्रश्न, आसाम मधील असंतोष हाताळण्यासाठी इंदिरा गांधींनी चंबळच्या डाकूंना शरण आणण्याऱ्या पी.सी.सेठी यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.