एका खरोखरच्या जादूगाराने सत्य साईबाबांचं पितळ उघडं केलं होतं..

ऐश्वर्या राय. सचिन तेंडूलकर. सुनील गावस्कर. अर्जुन रणतुंगा. सनथ जयसूर्या. निर्मल चंद्र सूरी. गुंडप्पा विश्वनाथ. अटल बिहारी वाजपेयी.

या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे.

हे सगळे जण शिर्डीच्या साई बाबांच्या कथित दुसरे अवतार असलेले सत्य साई बाबांचे भक्त होते. या बाबांनी स्वतःच स्वतःला दुसरा अवतार घोषित केला होता. एवढच नाही तर शिर्डीतील प्रत्यक्ष दिसणारा साई बाबा… म्हणून सत्य साई बाबा. ओरिजनल नाव, सत्यनारायण राजू असं होत. 

आंध्रामधील पुट्टपर्थी गावात २३ नोव्हेंबर १९२६ ला या बाबांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच हुशार. संगीत, नृत्य, गाणं, लिखण, या सगळ्यांची आवड. या बाबांच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते, ते १४ वर्षांचे असताना त्यांना एका विंचूने डंख मारला. बराच वेळानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल झाला.

कधी तरी मध्येच हसायचं, मध्येच रडायचं, कधी शांतच व्हायचं अशा गोष्टी चालू झाल्या. असं सांगितले जाते कि या घटनेनंतर ते ओळख नसलेली संस्कृत भाषा देखील बोलायला लागले होते. हवेतून मिठाई आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टी जादूने काढून मित्रांना द्यायच्या.

डॉक्टरांना वाटले या बाबांना हिस्टीरिया झाला असेल, म्हणून उपचार केले पण फरक नाही. आई-वडिलांनी कितीतरी संत, ओझाओं दाखवल. अखेरीस २३ मे १९४० ला त्यांच्या दिव्यतेचा लोकांना अनुभव आला. सत्य साईनी घातली सगळ्यांना बोलावलं आणि चमत्कार दाखवला सुरुवात केली.

वडिलांना वाटलं हे काही तरी भुताखेताचा प्रकार असणार आहे. त्यांनी छडी घेतली न सत्यनारायणला विचारले, आपण कोण आहे? उत्तर आलं, साई बाबा. शिर्डीचे साईबाबा यांचा अवतार आहे. सत्यनारायण यांचा जन्म होण्याच्या ८ वर्षापूर्वी शिर्डीच्या साईबाबांच निधन झालं होत. लोकांनी पण त्यांच्या जादूकडे बघून विश्वास ठेवला. यानंतर श्रद्धाळूंनी बाबांच्या पायाशी लोटांगण घेतले आणि सुरु झाली सत्य साई बाबांची अगाध लीला…. 

यानंतर सत्य साई बाबांनी मद्रास आणि दक्षिण भारताच्या अन्य भागाची यात्रा केली, आपल्या भक्तांची संख्या वाढवली. प्रत्येक गुरुवारी भजन होऊ लागली. पुढे ती रोज होऊ लागली.

१९४४ मध्ये मंदिर बांधले…

भागात कीर्ती वाढतच होती. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी गावाजवळ भक्तांनी त्यांचं सत्य साईबाबांचं मंदिर बांधले. जे आज पुरातन मंदिरांपैकी एक आहे. त्यांचा सध्याचा आश्रम प्रशाति निलयमचे बांधकाम १९४८ मध्ये झाले. १९५७ मध्ये बाबा उत्तर भारताच्या दौऱ्यावर गेले.

त्यांच्या चमत्कार आणि भजनाच्या गाथा पंचक्रोशीत पसरत होत्या. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोक बाबांच्या व्यासपीठावर दिसू लागली. 

पण सत्य गोष्टीच एक वैशिष्ट्य असते, ते म्हणजे ती कधी ना कधी समोर येतेच. पुढे बरेच वर्षानंतर दुरदर्शनवर एक ॲवॉर्डचा कार्यक्रम होता. यात या सत्य साई बाबांनी ॲवॉर्ड दिला होता. त्यावेळी वर हवेत हात गोल फिरवला आणि त्यांच्या हातात एक हार आला. आपोआपच. अगदी दुरदर्शनवरच्या देवांच्या मालिकेत येतो तसाच.

हा हार त्यांनी ॲवॉर्ड जिंकणाऱ्या व्यक्तीला घातला. सगळे खूश झाले. पण जेव्हा त्या क्लिपला निरखून बघितले तेव्हा समजले की ज्या व्यक्तीने तो ॲवॉर्ड बाबांच्या हातात दिला होता त्यानेच तो हार हळूच बाबांच्या हातात सरकवला होता.

यानंतर हळू हळू बाबांच्या प्रत्येक जादूला निरखून पहिले जाऊ लागले. आणि एक एक गुपित बाहेर यायला सुरुवात झाली. तसही आजकाल इंटरनेटच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. ते हे बाबा काय चीज होते. आता बाबा दैवी अवतार कमी आणि जादूगारच वाटायला लागले होते.

या बाबांची अजून एक चमत्कारिक ट्रिक होती. हातातुन अंगारा काढण्याची. आशिर्वाद देण्यासाठी हात वर न्यायचा आणि गोल फिरवून तो हातातून भक्तांना काढून देत असे. पण यात ही गोम होती. अंगठ्या शेजारच्या दोन बोटांमध्ये खडूचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आणि थोडासा दाब देऊन तो फोडायचा. फोडल्यानंतर तो समोर असलेल्या भक्ताच्या हातात त्या खडूची पावडर अंगारा म्हणून टेकवायचे.

हा अंगारा मिळवण्यासाठी भक्तांची अक्षरशः रांग लागाची. काही काही भक्त तर अभिमान बाळगायचे कि हजारोंच्या गर्दीत बाबांनी अंगारा देण्यासाठी माझी निवड केली.

एका जादूगारानेच पितळ उघड केले….

पण त्याच हे पितळ उघड पाडलं ते जादुगार पीसी सरकार जूनियर यांनी. त्यांनी बाबांना भेटण्यासाठी जवळपास एक महिना प्रयत्न करून बघितले, पण जादुगार ऐकल्यावर त्यांना भेट नाकारायचे. सतत अर्ज रिजेक्ट व्हायला लागल्यावर या पी. सी. सरकारांनी एक सोंग रचले.  त्यांनी बंगालच्या एका उद्योगपतीच्या मुलाचा वेश करून अर्ज केला आणि लगेचच भेटायला वेळ दिली.

सरकार यांना एका खोलीमध्ये दर्शनासाठी बोलावले गेले. भेट झाल्यानंतर त्यांनी बाबांचा आशीर्वाद म्हणून काहीतरी देण्याची मागणी केली. बाबांनी त्यांना वाट बघायला सांगितली. आणि दुसऱ्या खोलीतून जाऊन २ मिनिटांनंतर बाहेर आले.

बाबा खोलीत गेल्याच्या वेळेत सरकारनी तिथे खोलीत असलेली एक मोकळी प्लेट आपल्या जवळ लपवून ठेवली. बाबांनी परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे हवेत हात फिरवून संदेश नावाची बंगाली मिठाई काढून दिली. सरकारना पण हेच हवं होत. कारण जादुगार असलेले सरकार आता बाबांची जादू बघणार होते.

सरकारांनी सांगितले

“मला संदेश नाही तर रसगुल्ले खायला आवडतात”.

ह्या सत्य साईबाबांनी पण संदेशला लगेच रसगुल्ल्यात बदलले. सरकारांनी मस्तपैकी रसगुल्ले खाल्ले आणि बाहेर येऊन दंगा केला तो काही दैवी अवतार नाही तर आमच्यासारखा जादुगार आहे. किंबहुना आमच्या पेक्षा खराब जादुगार आहेत. आणि जादू आली म्हणजे कोण दैवी पुरुष वगैरे होत नसते.

सरकार एवढ्यावरच थांबले नाहीत तर बाबांच्या समोरच त्यांच्यासारखेच हवेतून अंगारा आणि सोन्याची साखळी काढून दाखवली. यानंतर भक्तांनी सरकार यांना धक्के मारत आश्रमातून बाहेर काढले.

या घटनेनंतर देखील बाबांचा बोलबाला चालूच राहिला. बाबांनी भारताचे तात्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या समोर दूरदर्शनवर जादूचे प्रयोग केले. पण ते दूरदर्शनने कधीच सार्वजनिक केले नाही. मात्र बीबीसीने केलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये बाबांच्या या जादूची पोलखोल झाली.

नरेंद्र दाभोळकर / अनिसने  अंध-श्रद्धा निर्मूलनच्या सीडीमध्ये ते कसे हाथसफाई करून लोकांना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हा प्रकार घडला होता.

लैंगिक शोषणाचे आरोप… 

सिडनीचे बँकर डी. क्रेकर जवळपास पाच वर्ष बाबांच्या भक्त होत्या. पण २००० साली त्यांना सत्य परिस्थिती समजल्यानंतर द संडे एजमध्ये त्यांनी हे सगळे अनुभव शेअर केले होते.

त्यावर्षी क्रेकर भारतात आल्या होत्या. त्या सांगतात,

मला बाबांच्या हेतू विषयी शंका यायला चालू झाली होती. पण मी भारतीय परंपरेनुसार मी त्याचे चरणस्पर्श केले. पण जशी मी खाली झुकले तसे बाबांनी माझे डोक पकडलं आणि त्यांच्या मांडीमध्ये दाबले. त्याच दिवशी माझी शंका खात्रीमध्ये बदलली. मी माझ तोंड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा बाबांनी मला त्यांचे लिंग दाखवण्याचा प्रयत्न केला. या असल्या प्रकारामुळे मी पूर्ण हादरून गेले आणि या विरोधात बोलण्याचे ठरवले.

स्वीडनमध्ये राहणाऱ्या कोनी लारसन यांनी देखील टेलिग्राफ सोबत बोलताना त्यांच्यासोबत झालेल्या अश्लील वर्तनाचा उल्लेख केला होता. त्या जवळपास २१ वर्ष बाबांच्या भक्त होत्या. त्यांनी सरळ सरळ बाबा आपल्यला पाहून हस्तमैथुन करत असल्याचे सांगितले होते.

निधनानंतर सापडले घबाड…. 

वयाच्या ८६ व्या वर्षी २४ एप्रिल २०११ ला वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. पण निधन झाल्यानंतर, तब्बल दोन महिन्यानंतर सत्य साईबाबा यांच्या प्रशांती निलायम आर्शमाच्या यजूर मंदिर या खासगी खोलीतून मोठे घबाड सापडले होते. ९८ कि. सोने, ३०७ कि. चांदी आणि ११.५६ कोटींची रोकड ३८ कोटी रुपयांचे हिरे आणि विदेशी चलन असा सगळा माल या घाबडामध्ये होता. कालांतराने एकूण ४० हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले होते.

पी. सी. सरकार म्हणाले तसे, हातचालाखी करून दैवी अवतार होता आले असते तर या जगातील प्रत्येक जादुगार दैवी पुरुष झाला असता. पण या बाबांच्या जादूला अनेक जणांनी चमत्काराचे नाव दिले आणि त्यात सुरुवातीला संगीतेली सगळी मंडळी देखील होती.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Rakesh says

    Useless false information about Satya Saibaba take proper Information and post it.

  2. sachin jeughale says

    Sai Baba ni kiti hospital kadhale aani kiti lokana free tret karun jiw wachawale he pn sanga

Leave A Reply

Your email address will not be published.