रस्त्यावर तयार झालेल्या पिकी ब्लाइंडर्स गॅंगने २० वर्ष इंग्लंडच्या अंडरवर्ल्डवर राज्य केलं……
वेबसिरीजचा जमाना आहे भिडू त्यामुळे दर महिन्याला, आठवड्याला नवीन नवीन वेबसिरीज येतंच असतात. त्यावर चर्चा होते, मिम्स होतात, डायलॉग व्हायरल होतात. वेबसिरीज आताच्या काळात सिनेमापेक्षा जास्त मार्केट खाऊन जाते. आजचा किस्सा अशाच एका वेबसिरीजवर, या वेबसीरिजने बरीच हवा केली, जगभरात तिला चांगलंच नाव मिळालं.
पिकी ब्लाइंडर्स हि वेबसिरीज बऱ्याच लोकांनी पाहिली असेल किंवा तुम्ही या वेबसिरीजचं नाव तरी ऐकलं असेल. तर हिपिकी ब्लाइंडर्स वेबसिरीज एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. या वेबसिरीजच्या कथेमध्ये थोडाफार बदल करून हि वेबसिरीज प्रदर्शित केली गेली. आज आपण या पिकी ब्लाइंडर्स टोळीबद्दल जाणून घेऊया.
१८९० ते १९१० अशी तब्बल वीस वर्ष या पिकी ब्लाइंडर्स टोळीने इंग्लंडच्या बर्मिंघम वर राज्य केलं. तर हि पिकी ब्लाइंडर्स नक्की कशी तयार झाली. इंग्लंडमध्ये वाढलेल्या आर्थिक मंदीमुळे आणि कामगार गटांवर केल्या जाणाऱ्या अन्यायातून हि पिकी ब्लाइंडर्स टोळी निर्माण झाली. या टोळीत १३ वर्षांपासून ते ३० वर्षांचे तरुण होते.
दरोडे, हिंसाचार, लूटमार, बेकायदेशीर बुकिंग आणि जुगारी अड्ड्यांवर मालकी यावर जबरदस्त पकड पिकी ब्लाइंडर्स टोळीने मिळवली होती. पिकी ब्लाइंडर्सची दहशत हि बर्मिंघम आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये होती. स्लॉगर या तिथल्या मोठ्या टोळीचं वर्चस्व मोडीत काढत ब्लाइंडर्सने आपलं राज्य तिथे निर्माण केलं.
पिकी ब्लाइंडर्स या टोळीने स्वतःचा पोशाख ओळख बनवला होता. जॅकेट, कोट, रेशमी स्कार्फ, बेल बॉटम पॅन्ट, लेदर बूट आणि फ्लॅट टोप्या.
या टोप्यांमध्ये ब्लेड लपवले जायचे आणि ते ब्लेड थेट शत्रूच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर मारले जायचे जेणेकरून शत्रूला काहीच दिसायला नको.
थॉमस गिल्बर्ट हा पिकी ब्लाइंडर्सचा सगळ्यात खतरनाक सदस्य होता. पण त्याने नाव बदलून केव्हिन मुनी केलं होतं. डेव्हिड टेलर, अर्नेस्ट हेन्स, हॅरी फोवेल्स आणि स्टीफन मॅकनिकल हे टोळीतले प्रमुख सदस्य होते. हॅरी फोवेल्स हा सगळ्यात कमी वयाचा म्हणजे १९ वर्षाचा मेंबर होता. त्याला बेबी फेस हॅरी म्हणून ओळखलं जायचं. दुचाकी आणि घर बळकावणे या गुन्ह्यात मॅकनिकल आणि हेन्स या दोघांनाही एक महिन्यासाठी अटक झाली होती.
हि टोळी कशी तयार झाली याबद्दल बर्मिंघमचा इतिहासकार कार्ल चीन सांगतो कि, १८५० साली बर्मिंघममध्ये रस्त्यांवर जुगार खेळलं जात आणि लहान मुलांचा तिथे मोठा राबता असे त्यातून हि पुढची पिढी घडू लागली होती. तिथल्या उच्च वर्गीय लोकांनी पोलिसांना सांगून हे सगळं बंद करायला लावलं. म्हणून पोलिसांनी तिथे जाऊन कारवाई करण्यास सुरवात केली तर त्या तरुणांनी लढा दिला.
पोलीस आणि हे तरुण मुलं कायम हाणामारी करू लागले, हि तरुण मंडळी रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्या लोकांना लुटू लागली. या तरुण मुलांमधल्या हिंसक मुलांनी एक टोळी तयार केली आणि तिला नाव दिलं पिकी ब्लाइंडर्स. पुढे अशा टोळ्या जागोजागी निर्माण झाल्या आणि पिकी ब्लाइंडर्स हि शिवी म्हणून या टोळ्यांना दिली जाऊ लागली.
पोलिसांनी या पिकी ब्लाइंडर्स टोळीचं वर्णन बेवडे आणि रस्त्यावर चोरी करणारे, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना वेठीस धरणारे, अपमान करणारे असं केलं होतं. कुख्यात गुंड बिली किंबर हा पूर्वीचा पिकी ब्लाईंडर होता. पिकी ब्लाइंडर्स टोळीतल्या अनेक सदस्यांनी पहिल्या महायुद्धात सहभाग नोंदवला होता. हेनरी लाइटफूट हे पहिले पिकी ब्लाईंडर होते ज्यांनी ब्रिटिश सैन्यात सहभाग नोंदवला आणि युद्धात भाग घेतला.
पिकी ब्लाइंडर्सच्या गँगने तयार केलेली पोषाखाची ओळख पुढे भरपूर लोकप्रिय झाली. टोळ्यांमध्ये वाढ होत गेली तेव्हा बर्मिंघम बॉईज या टोळीने राज्य गाजवायला सुरवात केली होती. गुन्हेगारी अंडरवर्ल्डमधून पिकी ब्लाइंडर्सने माघार घेतली आणि सबिना टोळीने बर्मिंघम बॉईज टोळीवर हल्ला केला. पुढे हे गॅंगवार सुरूच राहिले. १९२० च्या दशकानंतर पिकी ब्लाइंडर्स गायब झाले.
पण तब्बल २० वर्ष त्यांनी बर्मिंघमवर राज्य केले होते.
हे हि वाच भिडू :
- भारतातून पळून गेलेला दाऊद मुंबईच्या अंडरवर्ल्डवर इकबालच्या रूपात राज्य करायचा
- अंडरवर्ल्डचा अमजद खान, याच्या हत्येचा बदला म्हणून शर्मांनी राजनची निम्मी गॅंग संपवली..
- मुंबई अंडरवर्ल्ड मधील सगळेच डॉन तिला घाबरायचे, दाऊद तिला मावशी मानायचा..
- जगातला सर्वात डेंजर स्मगलर जो प्रेतांमधून ड्रग्ज सप्लाय करायचा…