शहाजी महाराजांनी शिवरायांच्या जन्मापूर्वी या किल्ल्यावर स्वराज्याची स्थापना केली होती

महाराष्ट्रात अनेक सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असे अनेक किल्ले आहेत जिथे शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या पाऊलखुणा दडल्या आहेत.

असच एक गाव म्हणजे पेमगिरी.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पेमगिरी येथे भीमगड उर्फ शाहगड हा किल्ला आहे. या यादव कालीन किल्ल्याची मुख्य ओळख म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजीराजांनी इथेच स्वराज्य निर्मितीचा पहिला प्रयत्न केला होता.

शहाजीराजे हे निजामशाहीचे सरदार होते. मलिक अंबर हा निजामशाहीचा कारभारी होता. त्याने शहाजीराजांची कर्तबगारी हेरून त्यांना मोठ्या हुद्द्यावर घेतले.

त्यावेळी सिंदखेडराजाचे जाधव आणि वेरूळचे भोसले ही दोन्हीही मातब्बर घराणी होती

त्यांच्यात सोयर संबंध जुळवेत म्हणून जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह जुळवून आणला.

मलिक अंबरच्या मृत्यूनंतर अहमदनगरची निजामशाही कमकुवत बनली.

निजामशाहीचा पूर्ण पाडाव करून संपूर्ण महाराष्ट्र आपल्या ताब्यात यावा म्हणून उत्तरेतले मुघल व दक्षिणेकडची आदिलशाही तयारीस लागली. मराठा सरदार यामध्ये विभागले गेले.

या संकटाच्या काळात मराठ्यांच्या स्वराज्याची निर्मिती होऊ शकते हे ओळखलं शहाजीराजांनी.

याची पहिली पायरी म्हणून निजामशाहीचा वारसदार असलेल्या अल्पवयीन मूर्तझा याला गादीवर बसवलं व महाराष्ट्राचा कारभार आपल्या हाती घेतला.

शहाजी महाराजांनी निजामशाही ताब्यात घेतली ती याच पेमगिरी किल्यावर. याच काळात राजमाता जिजाऊ गरोदर होत्या.

निजामशाही आदिलशाही आणि मुघल यांच्या चढाओढीत मराठ्यांची मोठी वाताहत झाली. शहाजी राजांच्या झेंड्याखाली एकत्र येण्यास इतर सरदारांनी नकार दिला. परकीयांची गुलामगिरी मोडून काढण्यासाठी शहाजी राजे प्रयत्न करत होते तो अयशस्वी ठरला.

उलट स्वकीयांकडूनच त्यांच्यावरच हल्ले होऊ लागले.

अशा या धामधुमीच्या काळात पेमगिरी किल्ल्यावर आपली पत्नी व होणारं मूल सुरक्षित असणार नाही हे ओळखून शहाजीराजांनी जिजाऊंना जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर हलवले.

याच शिवनेरी गडावर महाराष्ट्राची बंधने तोडणाऱ्या सुर्याहून तेजस्वी शिवरायांचा जन्म झाला.

जर शहाजी महाराजांचा स्वराज्याचा प्रयत्न सफल झाला असता तर शिवरायांचा जन्म पेमगिरी किल्ल्यावर झाला असता.

पेमगिरी गावाजवळ जुन्याकाळी चुन्याच्या खाणी प्रसिद्ध होत्या. त्याकाळी चुन्यात इथल्या येळुशीच्या दऱ्यातील ‘पेमगिरी’ कंद चुना प्रसिद्ध होता.

याच पेमगिरी गावात आणखी एक चमत्कार पाहायला मिळतो.

तो म्हणजे अनेक शतकानुशतके तिथे उभा असलेला महावट वृक्ष.

जवळपास अडीच तीन एकर असा पसरलेला हा वटवृक्ष त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. जवळपास १००च्यावर त्याच्या पारंब्या आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे.

 या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची ‘जाखाई-जाकमतबाबा’ ही लोकदैवते आहेत.

या लोकदैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. रामोशी समाजातील जाकमतबाबा एकदा या भागात आपली शेळ्यागुरे चरायला आले होते, तेव्हा त्यांच्यावर जंगली वाघाने हल्ला केला.

जाकमतबाबांनी त्याच्याशी झुंज दिली. आरडाओरडा ऐकून जाकमतबाबांची बहीण जाखाई देखील तिथे आली. तिने देखील आपल्या भावाला वाचवण्यासाठी वाघाशी लढा दिला.

या तुंबळ युद्धात जाकमत बाबा, जाखाई व वाघ हे तिघेही मृत्युमुखी पडले.

याच वडाच्या पायथ्याशी जाकमत बाबा आणि जाखाई देवी यांच्या मुर्त्या स्थापन केलेल्या आहेत. या दोघांनी लढताना वापरलेला कुऱ्हाडीचा दांडा देखील येथे खोचलेला आढळतो.

पुढे या कालांतराने या वटवृक्षाचेही दैवतीकरण झाले. या झाडाच्या कुणी मुद्दामहून फांद्या किंवा पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा बसली.

SAVE 20200605 181250

त्यामुळे झाडाचा कुणी विध्वंस करत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशालवटवृक्षात झाले.

जेव्हा जेव्हा या वटवृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला. त्या त्या वेळी त्या त्या लोकांना अद्दल घडली गेली, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

कारणं काहीही असोत, पण हा वट वृक्ष दिवसेंदिवस त्यामुळे विस्तारत गेला.

जवळपास शिवजन्मापासून किंवा त्याच्याही पूर्वी पासून पेमगिरी येथे पारंब्या रोवून उभा असलेला हा महावटवृक्ष महाराष्ट्रातला सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.