स्वत:चा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देणारी महाराष्ट्रातली गोटुल परंपरा…
अलीकडच्या काळात शहरी भागात बरेच जण टिंडर, हॅपन, वू, एल्स यांसारख्या डेटिंग ॲप्सचा वापर करतात आणि त्यामाध्यमातून आपल्या जोडीदाराची निवड करतात. काही जण लिव्ह इन मध्ये राहतात. काही जण लव्ह मॅरेज करतात तर बरेच जण अरेंज मॅरेज करणे पसंत करतात.
या सगळ्या जणांमध्ये डेटिंग ॲप्स वापरणारे किंवा लिव्ह इन मध्ये राहणारे स्वतःला जास्तच ॲडव्हान्स समजतात. आपल्या मर्जीने जोडीदार निवडतात. जोडीदार कसा असावा आणि जोडीदाराकडून काय हवं काय नाही हे सगळे निवडण्याची चॉईस त्यांच्याकडेच असते.
एका शब्दात, मिया बिवी राझी तो क्या करेगा काझी असा किस्सा असतो…
पण भिडूंनो आजकालच्या डेटिंग ॲप्सच्या पद्धतीपेक्षा सुद्धा जुनी डेटिंग पद्धत आपल्या भारतात आस्तित्वात आहे. ती म्हणजे गोंड आदिवासींची गोटूल पद्धत.
भिडूंनो आता हे गोटुल म्हणजे काय? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर गोटुल म्हणजे गोंड आदिवासींमध्ये जोडीदार निवडीचे केंद्र होय. या गोटुलांमध्येच गोंड जमातीतील मुलांना जमातीचे नियम, जोडीदार निवड करणे आणि सामाजिक जीवन कसे जगायचे हे शिकवले जाते. या गोटुलांमधूनच गोंड आणि गोंडांच्या सर्व उपजमाती आपले सामाजिक शिक्षण पुढच्या पिढीला हस्तांतरित करत आल्या आहेत.
हे गोटुल नेमकं असतं तरी कसं?
तर गोटुल म्हणजे गोंड आदिवासी पाड्याच्या जवळच बांबू आणि लाकडांपासून बनवलेली झोपडी असते. या झोपडीच्या भिंती चिकन मातीने लिपलेल्या आणि सारवलेल्या असतात. तसेच काही ठिकाणी गोटुल म्हणजे एक खुला मंडप असतो. या गोटुलचे नियम गोंड आदिवासींच्या प्रदेशानुसार वेगवेगळे असतात.
या गोटूलची सुरुवात गोंड आदिवासींचे देवता पहांदी पारी कुपार लिंगो यांनी केली अशी आख्यायिका सांगितली जाते. शेकडो वर्षांपूर्वी आदिवासी देवता कुपार लिंगो यांना गोंड आदिवासींच्या पाड्यावर कोणतीच शैक्षणिक आणि सामाजिक शिक्षण देणारी व्यवस्था दिसली नाही. तेव्हा कुपार लिंगो यांनी गावाच्या बाहेर बांबूपासून एक झोपडी तयार केली आणि त्यात गोटूलची सुरुवात केली.
कूपर लिंगो यांनी सुरु केलेल्या गोटूलमध्ये तरुण मुलं मुली आपापल्या जोडीदाराची निवड करतात, काही भागात सामाजिक कार्यक्रम आणि न्यायनिवाडा केला जातो. वेगवेगळ्या गोटूलमध्ये सामाजिक कामाच्या आणि जोडीदार निवडीच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार गोटुलचा वापर केला जातो.
छत्तीसगढ आणि गडचिरोलीच्या अबूजमाड जंगलातील गोंड आदिवासी जोडीदार निवडण्यासाठी या गोटूलचा वापर करतात.
अबूजमाडकच्या आदिवासी पाड्यांमध्ये गोंडी मुलं मुली संध्याकाळी गोटूलमध्ये एकत्र येतात. ते गोटूलमध्ये पारंपरिक गोंडी पद्धतीने नाचतात, गातात आणि जमातीचे सामाजिक संस्कार शिकतात. मुलं-मुली दररोज एकमेकांना भेटतात आणि समजून घेतात. या भेटींमधूनच मुलं मुली आपापले जोडीदार निवडतात.
एकमेकांची निवड केल्यांनतर दोन्ही जोडीदार आपली वेगळी झोपडी तयार करतात आणि त्यात एकांतवास अनुभवतात. एकमेकांना समजून घेतल्यानंतर ते दोघेही आपल्या मॅरीड लाइफला सुरुवात करतात.
या पद्धतीसोबतच जोडीदार निवडीची आणखी एक वेगळी पद्धत आहे.
काही गावांमध्ये मात्र जोडीदार निवडीचा पूर्ण अधिकार हा मुलींना असतो. अशा गोटूलमध्ये मुलीला इंप्रेस करण्यासाठी मुलं कंगवे बनवतात. मुलं आपापल्या परीने बेस्टम बेस्ट कंगवे तयार करतात. जेव्हा गोटूलमध्ये राहत असतांना मुलीला जो मुलगा आवडायला लागतो. मुलगी त्या मुलाचा कंगवा चोरी करते.
मुलाचा कंगवा चोरल्यानंतर मुलगी त्या कंगव्याने आपले केस विंचरते. केस विचारल्यावर केसांचा जुडा पाडून त्यावर कंगवा अडकवते. तो कंगवा बघून तिला आवडत असलेल्या मुलाचं नाव सगळ्यांना कळतं. त्यांनतर ते दोन्ही जोडीदार आपली नवीन झोपडी बांधतात आणि एकमेकांना समजून घेतात.
काही ठिकाणी जोडीदार निवडलेले जोडपे गोटूलमध्येच झोपतात तर काही ठिकाणी आपली स्वतंत्र झोपडी बनवतात आणि त्या झोपडीत राहायला जातात.
निव्वळ जोडीदाराची निवड करण्यासाठीच नाही तर सामाजिक शिक्षण देण्यासाठी आणि न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा गोटूलचा वापर केला जातो.
तरुण मुलांना जोडीदार निवडण्यासाठी बनवलेल्या गोटुलमध्ये लहान मुलांना जमातीचे सामाजिक आणि आर्थिक कामकाज शिकवले जाते. त्यात पारंपरिक वाद्य वाजववणे, गाणी गाणे, रंगरंगोटी करणे, शिकारीचे कौशल्य विकसित करणे या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात.
त्याचबरोबर पाड्यावर एखादी महत्वाची गोष्ट घडली असेल किंवा पाड्यावर एखादी गोष्ट सामुदायिकरीत्या करायची असेल तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी लोकं गोटूलमध्ये एकत्र जमतात. त्याचबरोबर पाड्यावरील कोणाचा वादविवाद सोडवायचा असेल तर न्यायनिवाडा सुद्धा याच गोटूलमध्ये केला जातो.
अशी आधुनिक सेक्स एज्युकेशनच्या तोडीची आणि काळाच्या पुढे असलेली ही गोटुल पद्धत नागरीकरणामुळे नष्ट होत चालली आहे.
गैरआदिवासी समाज वाढत्या गरजांमुळे आदिवासी भागामध्ये स्थायिक होत आहे. त्याच्यामुळे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. या नागरीकरणाच्या प्रभावामुळे गोटुलबरोबरच आदिवासींच्या अनेक कला आणि सांस्कृतिक गोष्टी नष्ट होत आहेत.
गोटुल पद्धतीला समजून न घेतल्यामुळे गैरआदिवासी या गोटुल पद्धतीला स्वैराचार म्हणून हिणवतात त्यामुळे आदिवासी समाजानेसुद्धा ही पद्धत बऱ्याच अंशी सोडून दिलीय. गैरआदिवासींप्रमाणे गोंडांमध्ये सुद्धा अरेंज मॅरेज आणि हुंड्याची पद्धत सुद्धा वाढायला लागली आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांना सामान मानणाऱ्या गोंड आदिवासी समाजात बरेच नागरी बदल होत आहेत.
सरकारच्या अनेक विकास योजनांमधून गावांमध्ये पक्क्या गोटुल भावनांचे बांधकाम केले जात आहे. या पक्क्या गोटूलचा वापर निव्वळ समाजभवनासारखा केला जातो. त्यात तबला, पेटी, कॅशियो सारखे आधुनिक पद्धतीचे वाद्य यंत्र सरकारी योजनांमधून दिले जातात. या आधुनिक गोटुलांमुळे पारंपरिक जोडीदार निवडीची पद्धत बऱ्याच प्रमाणावर नष्ट झालीय.
अलीकडच्या काळात काही आदिवासी पाड्यावर पुन्हा गोटूलचे पुनरुज्जीवन केले जात आहे. मात्र त्यात जोडीदार निवडीऐवजी पारंपरिक गोंडी शिक्षणच दिलं जातंय. त्यामुळे ज्या जोडीदार निवडीसाठी या गोटूलची निर्मिती करण्यात आली ती व्यवस्था पुन्हा रुजवणे दिवसेंदिवस कठीणच होत आहे.
हे ही वाच भिडू
- परदेशातले भिडू नाही तर लिव्ह-इन रिलेशनशिपचे ट्रेंडसेटर भारतातले आदिवासी आहेत
- आपला समाज लिव्ह-इन रिलेशनशिप स्विकारण्याचं धाडस दाखवेल का ?
- गोंडवनातील माडिया….