पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर.. मना खानदेश मा भलता मोठा मोठा ला राजकारणी शेतस
आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं एक परसेप्शन झालंय बघा. ते म्हणजे सगळं राजकारण घडतं ते पश्चिम महाराष्ट्रात. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे सोडून राजकारण आणि राजकारणी नाहीतच अख्या महाराष्ट्रात.
तर अरे मना भौ…खानदेश मा भलता मोठा मोठा ला राजकारणी शेतस.
आता हे पक्क्या खानदेशी लोकांना समजेल की मला काय म्हणायचंय! असो.
तर खानदेशात एक मोठे नेते आहेत. त्यांना ‘ज्वेल ऑफ इंडिया’ म्हंटल जातं. नावं त्यांचं अमरिशभाई पटेल. राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव… विकास आणि राजकारणाची सांगड घालून धुळ्याला ज्यांनी आकार दिला ते म्हणजे अमरिशभाई पटेल.
आज विधानपरिषदेची जागा बिनविरोध झाली त्याचं श्रेय आहे अमरीशभाईंच्या कामाला. त्यामुळे शांत आणि नम्र स्वभावाच्या अमरिशभाईंच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकावीच लागेल.
अमरिशभाई रसीकलाल पटेल. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होऊन सुरू केली. अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसी नेते होते. सलग १२ वर्ष त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलं.
पुढं १९९० मध्ये त्यांना काँग्रेसने शिरपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. मग काय ते आमदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर १९९५, २०००, २००५ अशी सलग २० वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली. या वीस वर्षांच्या काळात त्यांनी शिरपूरचा जो विकास केला म्हणता. संबंध भारतभर हा शिरपूरचा पॅटर्न फेमस झाला.
याच शिरपूर पॅटर्नमुळे अमरिशभाईंना ज्वेल्स ऑफ इंडिया म्हणूनही ओळखल गेलं.
शिरपूर आणि परिसरात काळ्या मातीच्या थरानंतर रेतीचा थर आणि त्या खाली पिवळ्या मातीचा थर आहे. पिवळी माती पाण्याचा निचरा खाली होऊ देत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी खोलवर मुरत नाही. बंधारे नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊन तापी नदीत मिळते. पावसाळ्याचे दोन महिन्यांनतर पुन्हा पाणीटंचाई होते. जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न हा यावरचा कायमस्वरूपी उपाय ठरला.
शिरपूर तालुक्यात राबविला गेलेल्या या जलसंधारण कार्यक्रमाअंतर्गत विविध नाल्यांमध्ये दीडशेपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात आले. दोन बंधार्यांमध्ये ५०० मीटरचे अंतर ठेवले गेले. एका नाल्यातील पाणी १८ ते २० ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले. बंधार्याची जाडी सुमारे पाच फूट, रुंदी सुमारे २० ते ३० फूट आणि खोली ४० फुटापेक्षा अधिक होती.
या बंधार्याचा उपयोग शेतकरी नाल्याच्या या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी रस्ता म्हणून करतात. पावसाचे पाणी पहिल्या बंधार्यात अडल्यानंतर तो भरल्यावरच दुसर्या बंधार्यात जाते. अशा प्रकारे सर्व बंधारे भरण्यास भरपूर वेळ लागतो आणि नाल्यातील पाणी नदीत वाहून जात नाही. ते पूर्णपणे जमिनीत आणि शेतात मुरते. परिणामी शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात राहते. जमिनीची भूक भागवली गेली की पाणी शिल्लक राहते. ४० फूट खोल बंधार्यात कोट्यवधी लिटर पाणी साचून राहाते. या पद्धतीमुळे परिसरातील कोरड्या झालेल्या विहिरी आणि ट्यूब वेल्सना पाणी उपलब्ध झाले. या बंधार्यांना दरवाजा आणि सांडवाही नसतो.
शेतीला बारमाही पाणी मिळावं म्हणून त्यांनी धुळ्यात सिंचन प्रकल्प राबवले.
पुढे २०१५ मध्ये अमरिशभाई धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य झाले. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अमरिशभाईंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती.
अमरिश पटेल यांनी ३० सप्टेंबर २०१९ रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०२१ पर्यंत होता.
पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च २०२० मध्ये नियोजित होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर २०२० मध्ये पार पडली आणि केवळ १२ महिन्यांसाठी निवडणूक लागली. या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो केवळ १२ महिन्यांसाठीच आमदार होईल हे निश्चित होतं. मात्र अमरिश पटेल यांनी पुन्हा दावेदारी दाखल करुन उरलेल्या १२ महिन्यांसाठीही आपणच आमदार असू, हे सिद्ध केलं.
अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला होता. पटेल यांना ३३२, तर अभिजीत पाटील यांना ९८ मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय होता.
आणि आता तर राज्यातल्या सहापैकी चार विधानपरिषद जागा बिनविरोध करायच्या ठरल्या. त्यात अमरिशभाईंचं नाव नसणं शक्यच नव्हतं. जागा बिनविरोध झालीय आणि अमरिशभाईंनी दाखवून दिलंय ते खानदेशाच्या जनतेच्या मनातले अनभिषिक्त सम्राट आहेत.
हे ही वाच भिडू :
- आया बहिणींवर हात टाकणाऱ्याला पत्रीसरकार मध्ये एकच शिक्षा होती..
- शिवरायांचा गनिमी कावा आणि गांधीजींचा मंत्र घेऊन सातारच्या पोरांनी पत्रीसरकार उभे केले
- “फिटलं म्हणा.. !” या घोषणेने क्रांतिसिंहांनी बीडच्या शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळवून दिली