जग शेती शिकायला करायला इस्त्राइलला जातं, मात्र इस्त्राइलची लोकं या भारतीय माणसाकडं येतात

कमी पाण्यात करण्यात येणाऱ्या शेतीचं उदाहरण म्हणून जगभरात इस्राइलचे नाव घेतले जाते. इस्राइलमध्ये आपल्या भारतातले शेतकरी तर जातातच त्याचबरोबर सरकारी अधिकारी सुद्धा इस्राइलचे दौरे केल्याचे अनेक उदाहरणे सापडतील.

मात्र उत्तरप्रदेश मधील एक शेतकरी आहेत ज्यांची शेती पाहायला इस्राइलमधील शेतकरी येत असतात. त्या शेकऱ्याचे नाव आहे प्रेम सिंह. ते उत्तरप्रदेशमधल्या बुदेलखंडमध्ये सेंद्रिय पद्धतीनं शेती करतात.  

इस्राइल सोबतच अमेरिका, आफ्रिका देशांमधले शेतकरी सुद्धा प्रेम सिंह यांच्या शेतीला भेट देत असतात. नुसत्या भेटीच नाहीत, तर आतापर्यंत त्यांच्याकडे १८ पेक्षा जास्त देशातल्या शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे.

प्रेम सिंह यांच्या कुटुंबात पूर्वीपासून शेती केली जाते. मात्र, एमबीए झाल्यानंतर प्रेम सिंह यांनी शेतीऐवजी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या लक्षात आले की, नोकरी करून शेवटी काहीच उरत नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि परत शेती करण्याचा निर्णय घेतला.

जरी त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला असला तरीही ते ज्या भागातून येतात तो भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यांनी वडिलांसोबत पहिल्या वर्षी शेती केली. मात्र त्यांच्या लक्षात आले की या पद्धतीने शेती केली तर आपल्या हाती काहीच उरत नाही. रसायने, गाई-बैल यांचे खाद्य, बँकेचे कर्ज यातच सगळे पैसे खर्च होऊन जातात.   

त्यामुळे पारंपरिक शेती करून काहीच होणार नाही हे त्यांना माहित होते. त्यामुळे सिंह यांनी १९८९ मध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. 

ते गेल्या ३० वर्षांपासून २५ एकर सेंद्रिय शेती करतात. त्यांनी गेली ३० वर्ष अनेक प्रयोग केले आहेत त्याचमुळे ते यशस्वी ठरल्याचे सांगितले जाते. मुळात म्हणजे शेती करतांना आपल्यावर कर्ज झाले नाही पाहिजे अशी त्यांनी आखणी केली. गाई, बैलांसाठी विकत खाद्य आणणे बंद केले. बी बियाणे सुद्धा तयार करू लागले. शेतीच्या कामाला ट्रॅक्टरऐवजी बैलाचा वापर करू लागले. यामुळे या गोष्टीसाठी लागणारा  पैसा वाचु लागला. 

प्रेम सिंह हे फक्त शेतीवर अवलंबून राहिले नाहीत 

त्यांनी शेती बरोबरच शेतीत पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करून विकायला सुरुवात केली. शेती करताना प्रेम सिंह यांच्या लक्षात आले की, गहू मार्केट मध्ये थेट विकण्यापेक्षा तो दळून, पॅकिंग करून विकला तर त्याचे दुप्पट पैसे मिळतात. त्यामुळे सिंह यांनी १९९५ मध्ये फूड प्रोसेसिंग युनिट सुरु केले. 

सिंह यांनी गव्हाबरोबर इतर पिकांवर सुद्धा अनेक प्रयोग केले. त्यात कैरी पासून मुरंबा, लोणचं सारख्या गोष्टी तयार करून विकू लागले. २००७ पासून त्यांचे हे शेती मॉडेल पाहण्यासाठी दुरून लोक येऊ लागली होती. 

प्रेम सिंह यांचे शेतीतील यशस्वी प्रयोग पाहून कर्नाटक येथे २०१० मध्ये ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी सिंह यांनी केलेले भाषण हे सगळ्यांना आवडले होते. 

तेव्हा त्यांनी कलाम यांच्यासमोर, ‘कोणीच शेतकरी व्हा असं का सांगत नाही ?’ असा प्रश्न विचारला होता.     

प्रेम सिंह यांच्या मते आपण अगोदर पासून सेंद्रिय शेती करत आलो आहे. शेणापासून तयार झालेले खत हे आपण शेतीसाठी वापरत होतो. चुलीतली राख ही कीटकनाशके म्हणून वापरत होतो. आता तर अनेक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणं सुद्धा बंद केले आणि बाजारात मिळणारे खते टाकत आहोत. 

सिंह यांनी शेतीचे तीन भाग केले. पहिल्या भागात त्यांनी जनावरे ठेवली, दुसऱ्या भागात त्या जनावरांसाठी खाद्य लावले आणि तिसऱ्या भागात सेंद्रिय शेती केली. शेती करतांना पाणी, हवा, उष्णता, ऊर्जा यांचे संतुलन साधत शेती केल्याने ते यशस्वी ठरले असल्याचे सांगितलं जातं. 

प्रेम सिंह हे गाई, बैल बरोबर म्हैस, बकरी आणि कोंबड्या पाळतात. कोंबड्यापासून मिळणाऱ्या खतात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. बकरीच्या खतात मिनरल जास्त असतात. गाई आणि म्हशीच्या शेणापासून तयार होणाऱ्या खतात कार्बन असत. हे सगळं शेतात खत म्हणून टाकल्यास त्याचा अधिक फायदा होतो. 

सिंह हे शेतीतून उत्पादने थेट विकत नाहीत. गव्हाचं उदहारण घ्यायचे तर सिंह हे थेट बाजारात कधीच विकत नाही. 

गव्हाचे पीठ किंवा दलिया करून ते दिल्ली आणि आसपासच्या मोठ्या बाजारात विकतात. याच बरोबर त्यांच्या गावातील अनेक शेतकरी हे आपली पिके थेट बाजारात विकत होती. आता मात्र सिंह कुठल्याही शेतकऱ्यांना आपला माल प्रक्रिया केल्याशिवाय विकू देत नाहीत.

त्यांच्या शेतात काठिया जातीचा गहू पिकवतात. या गव्हाचे पीठ महाग असते. त्यांनी सुरु केलेल्या फूड प्रोसेसिंग युनिटमुळे अनेक महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. यामुळे जगभरातील शेतकरी हे प्रेम सिंह यांच्या शेतीवर रिसर्च करायला येत असतात. 

हे ही वाच भिडू   

 

    

Leave A Reply

Your email address will not be published.