लोकांची भाषा निवडता यायला हवी, दिठीचं तसच झालंय….

जानपदी हे सहसा कवितेला लागणारे विशेषण. शहरात राहून गावाबद्दल आणि शेती संस्कृती बद्दल त्यातले उच्चार, भाव भावना, संदर्भ याची नीट ओळख नसताना शहरातील लोकांनी शहरी दृष्टीने केलेली कविता म्हणजे जानपदी कविता ही जानपदी कवितेची सर्वसाधारण व्याख्या.

कथा, कविता, कादंबरीत असल्या गोष्टी पुण्यात राहून अनेक लोकांनी केल्या. (सदानंद देशमुख यांच्या एका बैलाचे नाव पुण्या आहे यातच सगळे आले.)

विनोद निर्मिती साठी द. मा.मिरासदार यांनी पण असे लिखाण केले. गावातील माणसांचे स्टिरीओटाईप बनवण्यात त्यांनी मोठा हातभार लावला.

पिक्चरचे उदाहरण द्यायचे झाले तर कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ असलाच पिक्चर होता.

पिक्चर ही खरे तर फ्रेम्सची भाषा. पण त्यात संवाद ही महत्त्वाचे. तुम्ही कोणत्या लोकांची गोष्ट सांगणार हे ठरले की मग त्या लोकांची भाषा निवडता यायला हवी.

दिठीचे तसेच झालंय.

पहिल्याच फ्रेमला “रामजी बाबा धाव रे” असा डायलॉग आहे. आता महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामीण भागात अशाप्रसंगी धाव हा शब्दप्रयोग केला जातो काय माहित. अशी कित्येक उदाहरणे देता येतील जसे की धरबंध, क्रियाकर्म, दिवेलागण, प्रलय, मुखाला हे शब्द ग्रामीण भागातील कोणत्या सामाजिक स्तरात वापरले जातात काय माहीत.

शशांक शेंडेचे पात्र रामजी (किशोर कदम)च्या पाया पडल्यावर रामजी जे “काय हे” म्हणतो ते अस्सल पुणेरी (पक्षी: डहाणूकर/डोंबिवली) “काय हे” आहे.

शशांक शेंडेचे पात्र रामजीला घरी पोहचवल्यावर ‘थोडा वेळ लवडा’ म्हणते. श्रमपरिहारसाठी थोड्या वेळ लोळण्याला ग्रामीण भागात ‘लवंडा’ म्हणतात.

हे असे शब्दप्रयोग आले की फ्रेममधला इंटरेस्टच निघून जातो.

चूल विझवण्याची पद्धत म्हंजे चुलितले लाकूड किती बाहेर ओढायचे, पाणी किती ओतायचे यात एक लय असते, प्रमाण असते. हे नीट माहीत नसले म्हंजे चूल विझन्याऐवजी चुलीत पाणी पडते.

आणि पार्श्वसंगीतकार कानेटकर यांना मजुराची लहान लहान पोरे कशी हसतात हे माहीत नसावे नाहीतर त्यांनी पिक्चर सुरू झाल्यावर ४५ मिनिट १७ सेकंदानी रामजीला जेव्हा लेकराचे बालपण आठवते तेव्हा नोकिया १६०० मधील लहान मुलीच्या हसण्याचा मोनोफोनिक आवाज वापरला नसता.

प्रेक्षकांची पर्वा न करता आपल्या आवडीचा सिनेमा करत राहणे हे आर्ट पिक्चरच्या दृष्टीने बरोबरच होते/आहे. पण याचा अर्थ आम्ही प्रेक्षकांचा विचारच करणार नाही असा नाही होत. हे भान तमिळ – मल्याळम सिनेमाला जास्त चांगले असे वाटते.

आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या या राज्यात तिथले कलाकार सुपरस्टार होतात आणि सिनेमे पण दर्जेदार असतात. त्यामुळे फहाद, सेतूपती, धनुष, मारी सेलवाराज, त्यागराजन कुमारराजा, मिष्किन, पा.रणजित अशी नावे इथल्या तरुण तरुणीच्या ओठांवर असतात.

आता एवढं करायचे म्हंजे कष्ट घ्यावे लागतात. आपण ऍपल १२ प्रो पर्यंत पोहचलो तरी नोकिया १६०० वापरणारा एक महाराष्ट्र मुंबई पुण्याच्या बाहेर आहे हे माहीत असावे लागते.

यवतमाळ कुठाय माहित असावे लागते नाहीतर अवघड होते. नाहीतर आपणच पिक्चर बनवायचे ( इथे बनवायचे याचा अर्थ माधुरी पुरंदरे यांना अभिप्रेत असणारा आहे. म्हणजेच बनवाबनवीतील बनवणे) आपणच त्याबद्दल चांगले चुंगले लिहून आणायचे.

आपणच इंस्टावर रडू रडू प्रमोशन करायचे हे काही खरे नाही गड्या…

  • अजित देशमुख

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. विजय सुशीला भाऊराव घाडगे says

    आपण खूप मुद्द्याचं लिहिला आहे. माझं बालपणी गावामध्ये गेले परंतु शहरांमध्ये राहत असल्यामुळे भाषा व थोडा परिणाम झाला आहे, परंतु आज जेव्हा आज-काल मालिका सिनेमा बघतो तेव्हा यातील फरक नक्की जाणवतो. भाषा टिकवायची असेल तर ती जशीच्या तशी वापरावी असं वाटतं. मालिका , सिनेमा बनवताना निर्मात्यांनी तो कोणत्या कालावधी मधला विषय आहे याचाही अभ्यास करावा आणि तशी भाषा वापरावी.

Leave A Reply

Your email address will not be published.