लोकं म्हणू लागली, रेखानं झुरावं फक्त अमिताभसाठी आणि अमिताभनं प्रेमाची साद घालावी रेखासाठी…

आज ११ ऑक्टोबर महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस तर कालच १० ऑक्टोबर अभिनेत्री रेखाचा वाढदिवस होता. फिल्मी दुनियेतील रील लाईफ मधील केमिस्ट्री रीयल लाईफ मध्ये कशी जमते हे कुणालाच सांगता येणार नाही. सिनेमातील राज-नर्गीस, देवआनंद-सुरैय्या,गुरूदत्त-वहिदा रहमान यांच्या ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन प्रेमाच्या उदंड चर्चा झाल्या.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी केवळ पाच वर्षे (१९७६ चा ‘दो अंजाने’ ते १९८१ चा सिलसिला’) आणि केवळ नऊ सिनेमात एकत्र काम केले. 

त्यांच्या दोघातील नात्याच्या चर्चेने अवघी मायानगरी दुमदुमून गेली. या दोघांच्या प्रेमाच्या किस्स्यानी त्या काळातील सिने मॅगझीन भरलेली असायची. या दोघांचा रूपेरी प्रवेश तसा एकाच वेळी झाला. १९६९ सालच्या के ए अब्बास यांच्या ’सात हिंदुस्तानी’तून अमिताभचा तर मोहन सैगल यांच्या १९७० च्या ’सावन भादो’तून रेखा हिंदी सिनेमात दाखल झाली. या दोघांचा पहिला एकत्रित सिनेमा जरी ऋशिदांचा ’नमक हराम’ असला तरी त्यात ती अमिताभ ची नसून राजेशची नायिका होती.

खरं तर १९७२ या वर्षी या दोघांच्या ’एक था चंदर एक थी सुधा’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते. यातील ’ ये चेहरा ये जुल्फे’ या गाण्याचे शूटही झाले होते. हे गाणे यु ट्यूब वर उपलब्ध आहे. १९८३ साली ’फिल्म ही फिल्म’ मध्ये त्याची झलक पहायला मिळते. पण वितरकांच्या दबावाने फ्लॉप स्टार अमिताभला काढून टाकले व त्याच्या जागी संजय खानची वर्णी लागली. 

आता सिनेमाचे नाव ’दुनिया का मेला’ झाले. (नियतीचा खेळ पहा पुढे हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला तर ’जंजीर’ सुपर हिट ठरला) १९७६ साली या दोघांचा पहिला सिनेमा आला दुलाल गुहांचा ’दो अंजाने’. या सिनेमाच्या वेळी अमिताभ सुपरस्टार पदावर पोचला होता. 

रेखा मात्र अजूनही यशाच्या शोधात होती. या दोघांच्या पहिल्याच शॉटचा हा किस्सा आहे. 

या सिनेमाच्या शूटच्या वेळी रेखा खूप नर्व्हस होती. ती सारखे सारखे आपले संवाद विसरत होती. शेवटी कंटाळून एकदा अमिताभ तिला हात जोडून म्हणाला सुनिये..देवीजी जरा अपने डॉयलॉग ठिक तरहसे याद करके लिजिएगा!’ या सिनेमाला मर्यादित यश मिळाले. 

१९७७ या वर्षात या दोघांचा ’आलाप’ हा सिनेमा आला. ऋषिकेश मुखर्जी यांच्या या सिनेमावरची शोकात्म छाया अमिताभच्या त्या काळच्या इमेजला साजेशी नव्हती. त्या मुळे सिनेमा चांगला असून अपयशी ठरला.

पहिल्या दोन फ्लॉप नंतरचा प्रकाश मेहरा यांचा ’खून पसिना’ मात्र हिट ठरला. याच वर्षी प्रेमजी यांचा ’इमान धरम’ हा चित्रपट आला पण यात रेखा अमिताभची नव्हे तर शशी कपूरची नायिका होती. १९७८ सालच्या ’मुकद्दर का सिकंदर’ आणि ’गंगा की सौगंध’ या दोन्ही सिनेमांनी जबरदस्त यश मिळविले व हि जोडी प्रचंड लोकप्रिय झाली.

’मि.नटवरलाल’,’सुहाग’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर करीष्मा केला. १९८० साली गोल्डीचा ’राम बलराम’ आला. आणि १९८१ साली या दोघांचा ’सिलसिला’. या सिनेमा नंतर मात्र ते एकत्र आले नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतके आठ- नऊ सिनेमे या दोघांनी केले पण त्यांच्यातील आंतरीक ओढ पडद्यावर सहज दिसत होती. 

रेखाने झुरावे फक्त अमिताभ साठी आणि अमिताभे प्रेमाची साद घालावी फक्त रेखासाठी अशी सार्‍यांची भावना होती.पब्लिक जाम खूष होते या जोडीवर.

अठरा बरस की तू होने को आयी रे (सुहाग) सलाम-ए- इश्क मेरी जां (मुकद्दर का सिकंदर), परदेसिया ये सच है पिया सब कहते है मैने तुझको दिल दे दिया (मि. नटवरलाल) हमसे भूल हो गई हमका माफी, यार कि खबर मिल गई (राम बलराम) देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये, ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते(सिलसिला) हि या दोघांवर चित्रित गाणी आजही लोकप्रिय आहेत. 

अमिताभच्या सिनेमात नायिकांची भूमिका तशा दुय्यमच असायच्या. रेखाच्या हे लवकर लक्षात आले. १९८० सालच्या ’खूबसूरत’ पासून तिच्यात आमुलाग्र बदल झाला. ती भूमिकांची निवड चोखंदळपणे करू लागली. ऐंशीचं दशक तिच्यातील अभिनेत्रीकरीता महत्वपूर्ण ठरलं. १९८१ साली ’उमराव जान’ साठी ती राष्ट्रीय पुरस्काराची धनी झाली. तिच्या समकालीन अमिताभच्या नायिका परवीन बाबी, झीनत अमान व राखीला जे जमलं नाही ते रेखाने सिध्द करून दाखविलं.

गेल्या ४२ वर्षात अमिताभ- रेखा यांनी एकाही सिनेमात एकत्र भूमिका केली नाही पण पब्लिक मात्र या दोघांच्या सिनेमांचे अजूनही जबरा दिवाने आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा दोघांनाही ‘बोल भिडू’ परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– भिडू धनंजय कुलकर्णी  

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.