लोकांना वाटायचं तब्बूऐवजी तिची बहीण बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालेल…

ही सिनेमाची दुनिया म्हणजे मोठी अजब दुनिया आहे! इथे ज्यांना खरंच करिअर करायचं असतं त्यांना मोठी इनिंग खेळता येत नाही, तर ज्यांना सिनेमात अजिबात काम करायची इच्छा नसते ते मोठे इनिंग खेळून जातात. असाच काहीसा प्रकार दोन बहिणी बाबत झाला होता. आपल्या हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात बहिणी बहिणी सिनेमात असल्याची खूप जुनी परंपरा आहे. 

साठच्या दशकामध्ये नूतन आणि तनुजा या दोन बहिणी लोकप्रिय होत्या नंतर करिष्मा कपूर आणि करीना कपूर या नव्वद च्या दशकामध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. दरम्यानच्या काळात ऐंशी च्या दशकात दोन बहिणी सिनेमाच्या क्षेत्रात आल्या होत्या. 

अभिनेत्री फराह आणि अभिनेत्री तब्बू! 

या दोघी मूळच्या हैदराबादच्या. फराह दिसायला अतिशय सुंदर. तर तब्बू ही तिच्या मानाने स्त्री सौंदर्याच्या व्याख्येत न बसणारी. थोडीशी टॉम बॉईश, सावळी, उंचीने अधिक, तर मोठ्ठ नाक असलेली! दोन बहिणीत सुंदरतेत जमीन अस्मान चा फरक.  

फराह मात्र ‘पोर पंध्राची कोर चंद्राची’ अशी होती. चवळीच्या शेंगेसारखी नाजूक आणि कोवळी कोवळी.  त्यामुळे सहाजिकच घरात तिच्याबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल, तिच्या करिअरबद्दल सर्वत्र चर्चा होत असे. ही पोरगी सिनेमात जाऊन नाव काढणार याची सर्वांना जणू खात्री झाली होती. देखणी  फराह त्या काळात तिच्या शाळेमध्ये सर्वात देखणी मुलगी होती.

तिचा नखरा, तिचा तोरा, तिची ऐट ‘जबरा’ होती. तिच्या तुलनेत धाकटी बहिण म्हणजे  ‘किस झाड की पत्ती!’.  

फराहाची आई आणि दिग्दर्शक विजय आनंद यांची पत्नी सुषमा आनंद या दोघी चांगल्या मैत्रिणी होती. फराह आणि तब्बू अभिनेत्री शबाना आजमीच्या भाच्या  होत्या. त्यामुळे फिल्मी पार्ट्यांना जाणं ही एक कॉमन गोष्ट होती.तब्बू लहान असतानाच तिच्या आई वडलांचा घटस्फोट झाला होता. ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी फराह आणि तब्बू मुंबईला एका फिल्मी पार्टीमध्ये गेल्या असताना तिथे देव आनंदची नजर या दोघींवर पडली.

पार्टीत देवआनंद येणार आहे हे ऐकून फराहला खूप आनंद झाला होता आणि ती जास्तच नटून सजून पार्टीला गेली होती. तब्बू त्यावेळेला अवघ्या १४ वर्षाची होती. ती आपल्या मोठ्या बहिणीला सोबत म्हणून तिथे गेली होती. सिनेमात काम करण्याचा तिचा कुठलाही इरादा नव्हता कारण तिला माहीत होते की पल्याकडे सिनेमात काम करण्यासाठी लागणारे सौंदर्य नाही.

‘फराहच्या सुंदरते पुढे तब्बू काहीच नाही’

हे वाक्य ती लहानपणापासून ऐकत होती. ‘होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक…’ अशीच तिची अवस्था होती. त्यामुळे आपल्या कडे कोणी पाहणार नाही याची तिला खात्री होती. पण म्हणतात ना जो ‘खरा’ ‘जोहरी’ असतो त्याची बरोब्बर नजर ‘हिऱ्या’वर पडते. त्या पार्टीत देवआनंदची नजर तब्बू वर पडली.

त्यावेळी देव आनंद त्याच्या नव्या चित्रपटाची ‘हम नौजवान’ स्टार कास्ट फायनल करत होता. या चित्रपटात त्याच्या मुलीच्या भूमिकेसाठी त्याला एका नव्या चेहऱ्याची गरज होती. तब्बूला त्याने पाहिले आणि त्याने मनोमन ठरवले की तिला आपल्या सिनेमासाठी साइन करायचे! ही बातमी ऐकून फराह नाराज झाली. 

कारण खरंतर तिला शंभर टक्के खात्री होती की आपणच सिनेमात जाऊ पण देव आनंदला मात्र तब्बू मध्ये हिरोईनचे मटेरियल दिसले. आपली निवड झाली नाही या पेक्षा तब्बू ची निवड झाली याचा तिला भयंकर राग आला होता!  नवकेतनच्या टीम ने तब्बूची स्क्रीन टेस्ट घेतली आणि तिचे सिलेक्शन देखील झाले! तब्बू ने त्यावेळी देव आनंद ला फराह देखील सिनेमात इंटरेस्टेड आहे असं सांगितले.

देव आनंदने दिग्दर्शक यश चोप्रांना फराह बाबत सांगितले. यश चोपडा त्यावेळी त्यांच्या नवीन चित्रपट ‘फासले’ जुळवाजुळवीत व्यस्त होते. या सिनेमात महेंद्र कपूर यांचे चिरंजीव रोहन कपूर नायक म्हणून असणार होते. यश चोप्रानी फराह खानची स्क्रीन टेस्ट घेतली. तिचं आरस्पानी  सौंदर्य त्यांना खूपच आवडलं आणि लगेच त्यांनी तिला या सिनेमाची नायिका बनवून टाकले. 

अशा पद्धतीने फराह ला ‘फासले’ या चित्रपटातून तर तब्बू ला ‘हम नौजवान’ या चित्रपटातून एन्ट्री झाली.  यानंतर फराह ला लागोपाठ सिनेमे मिळत गेले परंतु तब्बू मात्र फारशी कोणाच्या लक्षात आली नाही. पण दिग्दर्शक बोनी कपूर यांनी त्यांचा धाकटा भाऊ संजय कपूर सोबत तिला ‘प्रेम’ सिनेमासाठी साईन केले. 

हा सिनेमा तब्बल आठ वर्ष निर्मिती अवस्थेत होता. त्यापूर्वीच तब्बू ने एका तेलगू चित्रपटातून नायिकेच्या भूमिकेतून पदार्पण केले. नंतर बॉलीवूड मध्ये तिचा प्रवेश झाला. फराहकडे खरंतर सौंदर्य होतं पण अभिनयात ती फारशी निपुण नव्हती. 

फराहची रुपेरी पडद्यावरील इनिंग लवकर संपली. 

तिने दारासिंगचा मुलगा बिंदू त्याच्यासोबत लग्न केले नंतर ती छोट्या पडद्याकडे वळाली. आणि जिला म्हणजे तब्बू ला  सिनेमा मध्ये करिअर करण्याचे अजिबात इच्छा नव्हती तिने मात्र जबरदस्त करिअर सिनेमाच्या दुनियेत केले. ‘माचिस’ आणि ‘ चांदनी बार’ साठी तब्बूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तर ‘विजयपथ’,’विरासत’,’हुतूतू’,’अस्तित्व’,’चीनी कम’,’हैदर’ या सिनेमातील भूमिकांसाठी फिल्म फेअर अवार्ड मिळाले.  तिचा दृश्यम-२ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. 

काय गंमत असते पहा लहानपणी तिची सौंदर्यावरून कायम हटाळणी व्हायची ती तब्बू सिनेमाच्या दुनियेत मोठे करिअर करून गेली पण सौंदर्यवती म्हणून जिची लहानपणी कायम प्रशंसा व्हायची  ती फराह मात्र आपली आटोपशीर इनिंग करून निवृत्तही  झाली!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.